माणूस या पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान आणि संवेदनशील प्राणी मानला जातो, परंतु सध्याच्या काळात घडणार्या क्रूर घटनांमुळे माणसाच्या मानवीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गेल्या दोन दिवसांतील काही घटनांकडे बघितल्यास माणसाने क्रूरतेची सीमा कशी ओलांडली हे लक्षात येते. इंजिनिअरिंगमध्ये वारंवार नापास होत असल्यामुळे जाब विचारणार्या आई-वडिलांचा मनात राग धरून मुलाने खून केल्याची घटना नागपूरमध्ये घडली. आईचा खून केल्यानंतर मुलाला पश्चात्ताप वगैरे अजिबातच झाला नाही. त्याच्या तासाभराने त्याने वडिलांवर चाकूने वार केले. नाशिकमध्येही थरकाप उडवणारी घटना पुढे आली. अल्पवयीन मुलीला फूस लावून भाच्यासोबत पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून दिंडोरीतील एकाने शेजार्यावर कुर्हाडीने वार करीत त्याचे शीरच धडावेगळे केले. इतकेच नव्हे तर ते शीर हातात घेऊन 300 मीटर चालत जात तो पोलीस चौकीत पोहचला. उत्तर प्रदेशात स्थानिक रहिवाशांच्या जाचाला कंटाळून एका युवकाने आईसह चार बहिणींची हत्या केली. शिवाय या हत्येची कबुली त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून दिली. अशा घटना का घडतात? लोकांमध्ये इतकी क्रूरता कशामुळे येते? माणसातील माणूसपण कुठे हरवत चालले? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने पडतात.
या घटना अचानक घडलेल्या नाहीत. यामागे अनेक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि भावनिक घटक कारणीभूत आहेत. पहिला आणि महत्त्वाचा घटक म्हणजे भावनिक अस्थिरता. माणसाचा मानसिक आरोग्याचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. ताणतणाव, अपयश आणि दबावाशी सामना करण्यासाठी आवश्यक असणारी मानसिक तयारी अनेकांकडे नाही. त्यातूनच क्षुल्लक कारणांवरून संताप आणि नंतर क्रूर कृत्य घडत असल्याचे दिसून येते. दुसरा मोठा घटक म्हणजे सामाजिक ताणतणाव आणि विभक्त कुटुंबपद्धती. पूर्वीच्या काळात मोठ्या कुटुंबांमध्ये माणसाला आधार मिळायचा, समुपदेशन व्हायचे. आज विभक्त कुटुंबांमुळे संवाद कमी झाला आहे. माणूस एकटा पडत चालला आहे. एकटेपणातून येणारी नैराश्याची भावना काही वेळा क्रूरतेला कारणीभूत ठरते. संस्कृती आणि मूल्यव्यवस्थेतील बदल हादेखील क्रूरतेचा एक स्रोत आहे. टीव्ही, ओटीटी आणि सोशल मीडियावरून दिसणारा हिंसाचाराचा अतिरेक लोकांच्या मनावर खोल परिणाम करतो. बालमन आणि तरुण पिढी या गोष्टी सहज आत्मसात करतात. ‘अॅनिमल’सारख्या चित्रपटात जेव्हा माणसाची मान कापण्याचे दृश्य अगदी सहजपणे दाखवले जाते, त्याच वेळी त्याचे अनुकरण करणारी पिढीही तयार होते. चित्रपटांचा समाजावर खोल परिणाम होतो. ते समाजाच्या विचारसरणी, वर्तन आणि जीवनशैलीवर प्रभाव टाकतात. काही चित्रपटांमध्ये हिंसाचार हा नायकाच्या यशाचा भाग म्हणून सादर केला जातो, जसे की नायकाने खलनायकाला मारहाण केली की शेवटी नायक विजयी ठरतो. अशा चित्रपटांमुळे हिंसा ही समस्या सोडवण्याचे साधन असल्याचा चुकीचा संदेश मिळतो. चित्रपटांतील क्रूरतेचा सर्वाधिक परिणाम तरुण आणि लहान मुलांवर होतो. लहान वयात ही दृश्ये पाहून मुले त्याचे अंधानुकरण करतात. हिरो किंवा व्हिलनसारखे वागण्याची प्रेरणा त्यांना या चित्रपटांमधून मिळते. काही वेळा ही प्रेरणा त्यांच्या वर्तनात हिंसकता निर्माण करते. अनेकदा गंभीर गुन्हे करणार्या व्यक्ती चित्रपटांमधील दृश्यांपासून प्रेरणा घेतात. उदाहरणार्थ चोरी, खून आणि छळ यांसारख्या घटनांमध्ये चित्रपटांतील हिंसेचा संदर्भ सापडतो. याशिवाय चित्रपटांतील हिंसेमुळे समाजात सहिष्णुता कमी होते. यासाठी देशभरात चित्रपट निर्मितीसाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे लागू करणे गरजेचे आहे.
आजच्या शिक्षण पद्धतीत माणुसकी, सहिष्णुता आणि नैतिकता यांना पुरेसे प्राधान्य दिले जात नाही. शालेय शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते सीमित झाले आहे. अपयश, अपमान किंवा संघर्षाचा सामना करण्यासाठी कोणती मानसिक तयारी कशी करावी हे शिकवले जात नाही. त्यामुळेच एक साधा प्रश्न विचारल्यामुळे पालकांचा खून करणे किंवा लहानशा वादातून शेजार्याचा जीव घेणे अशा गोष्टी घडतात. माणसाने तंत्रज्ञानात प्रगती केली, समाजव्यवस्था सुधारली, पण मानवी मूल्यांचा र्हास होत आहे. माणसातील नैसर्गिक दया, करुणा आणि सहिष्णुता कुठेतरी हरवली आहे. शाळा, महाविद्यालये आणि कार्यस्थळांवर मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. समुपदेशनासाठी विशेष तज्ज्ञांची नेमणूक करावी. शिक्षण पद्धतीत नैतिकता, करुणा आणि सहिष्णुता यांचा समावेश करावा. केवळ मार्कांचा पाठपुरावा थांबवून भावनिक आणि सामाजिक कौशल्यांवर भर द्यावा. शिवाय कुटुंबांमध्ये संवाद वाढवणे गरजेचे आहे. हिंसाचाराचा महिमा मिरवणार्या कार्यक्रमांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. माध्यमांनी सकारात्मक कथा अधिक प्राधान्याने दाखवाव्यात. आज घडणार्या क्रूर घटनांमुळे समाजावर मोठा आघात झाला आहे, मात्र या घटनांमागची कारणे समजून त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान, शिक्षण आणि कायदा यांचा योग्य वापर करून माणसातील माणुसकीला पुन्हा उभारी देणे शक्य आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने यासाठी जबाबदारी घेतली, तरच आपण या क्रौर्याच्या जाळ्यातून बाहेर पडू शकतो.