Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय अग्रलेख बेदरकार वाहतुकीला बे्रक लावा

बेदरकार वाहतुकीला बे्रक लावा

Subscribe

महाराष्ट्रात अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ते रोखण्यासाठी सरकारकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत. त्यापैकी प्रमुख मार्गावरील ब्लॅक स्पॉट निश्चित करून तेथे आवश्यक ते बदल करण्याचे पाऊल उचलण्यात येत आहे. खरं तर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या वाढली तसे अपघातांचे प्रमाणही वाढीला लागले. या अपघातांमागे ‘बेदरकारपणा’ हे कारण निश्चित असल्याने त्यावर प्रसारमाध्यमांसह वाहतूक तज्ज्ञांनीही सरकारचे लक्ष वेधण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. आता या बेदरकारीला चाप लावण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून होत असून बेभान होऊन किंवा बेदरकारपणे वाहन चालविणे यापुढे अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे. सरकारचा हा निर्णय योग्य आहे, पण संबंधित यंत्रणा अपघात बेदरकारपणे वाहन हाकल्यामुळे झाला हे कसे ठरविणार, हा प्रश्न आहे. अनेकदा वाहनांचा अपघात नेमका कसा झाला हेच लक्षात येत नाही.

काही वेळेला इतर वाहनाच्या अपघाताला कारणीभूत ठरणारे वाहन निसटून जाते. अर्थात काही तरी निमित्ताने बेदरकारपणाला चाप बसत असेल तर तो महत्त्वाचा आहे. किंबहुना असा चाप बसलाच पाहिजे. हातात वाहन आले म्हणजे ते भन्नाट वेगानेच पळविले पाहिजे, अशी अनेक चालकांची मानसिकता असते. त्यातून चुकीचे ओव्हरटेक केले जातात. वाहतुकीचे म्हणून जे काही नियम आहेत त्याला हरताळ फासला जातो. काही वेळेला वाहतूक पोलीस किंवा आरटीओ अशा बाबींकडे दुर्लक्ष करतात. यात आर्थिक तडजोडीचा भाग असतो. त्यामुळे वाहनचालकांना या यंत्रणांचे बिलकूल भय राहिलेले नाही. उद्या बेदरकारपणा अजामीनपात्र गुन्हा ठरणार असला तरी तो गुन्हा दाखल होईपर्यंत तडजोडीचे अनेक प्रयत्न होतील ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

- Advertisement -

देशात दुचाकी आणि चारचाकी, तसेच अवजड वाहनांची संख्या ३० कोटींहून अधिक आहे. यात दुचाकींची संख्या अधिक आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सीएनजी, इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल मोठा आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्यासाठी अशा वाहनांची संख्या वाढणे गरजेचे आहे, परंतु अशी वाहने आली म्हणून अपघातांना आळा बसेल असे नव्हे. कारण वाहतुकीचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला जात नाही तोपर्यंत अपघात रोखणे अशक्यप्राय आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन देशभर रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. यासाठी काही लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत. वाहतूक निर्विघ्नपणे सुरू रहावी याकरिता सुसज्ज रस्ते गरजेचे आहेत, मात्र रस्ते गुळगुळीत किंवा चकाचक झाले म्हणजे वाहन ताशी शंभर किलोमीटरहून अधिक वेगाने पळविण्यास काही हरकत नाही ही मानसिकता घातक आहे.

पुणे आणि मुंबई शहर जवळ आणणारा द्रुतगती मार्ग तयार झाल्यानंतर त्यावर सुरू झालेला अपघातांचा सिलसिला डोके सुन्न करून टाकणारा आहे. मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविण्याची तेथे अहमहमिका लागलेली असते. यातूनच वाहने एकापाठोपाठ एक अशा क्रमाने एकमेकांवर आदळण्याचे खूप मोठे प्रमाण आहे. गेल्या २७ एप्रिल रोजी या मार्गावर १३ वाहने एकमेकांवर आदळण्याचा प्रकार घडला. यात स्वाभाविकपणे बेदरकारपणाच कारणीभूत होता. त्याशिवाय अपघात घडणे ९० टक्के अशक्यप्राय आहे. पुणे ते मुंबई अंतर कमी करण्यासाठी जसा प्रयत्न झाला तसा नागपूर ते मुंबई अंतर कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाचा पर्याय उपलब्ध करण्यात आला. अपेक्षेप्रमाणे याही मार्गावरून वाहने सुसाट धावू लागली आणि जे घडायचे ते घडत आहे. पाच महिन्यांत लवकर पोहचण्याच्या घाईत अपघातांच्या घटनांनी जवळपास हजारी गाठली आहे. यावर आता चर्वितचर्वण अपेक्षित आहे.

- Advertisement -

अपघाताच्या घटना वाढल्यानंतर तज्ज्ञांची समिती नेमण्याचा सोपस्कार पार पाडला जातो. त्यांच्याकडून येणारा अहवाल साचेबद्ध असतो. असे अनेक अहवाल आले, पण अपघातांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. अपघात रोखण्यासाठी चालकांची मानसिकता बदलली गेली पाहिजे आणि हे काम कसे पार पाडणार, हा सवाल आहे. लवकर पोहचण्याच्या घाईत घडलेल्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. अनुभव नसतानाही चालकाच्या हाती माहीत नसलेल्या रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी सोपविण्यात येते. दुचाकींची संख्या अफाट वाढलेली असताना बहुतांश दुचाकींचे चालक हेल्मेट न वापरण्याबरोबर वाहतुकीचे नियम न पाळण्याचा ‘आनंद’ घेतात. यातून वेडेवाकडे ओव्हरटेक केले जातात, जी वस्तुस्थिती वाहतूक तज्ज्ञांनाही मान्य आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये बेदरकार वाहन चालविणे अजामीनपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे. हे राज्य दुर्गम असल्याने रस्तेही अवघड वळणावळणाचे आहेत. तरीही तेथील अपघातांचे आणि त्यात मृत्युमुखी पडणार्‍यांचे प्रमाण भयावह आहे. हिमाचलप्रमाणे महाराष्ट्रातही असा कायदा आणण्याचे आणि तसा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या निर्णयाला कुणी विरोध करणार नाही, परंतु अशा नियमाने अपघातांना लगेचच आळा बसेल असे समजणे धाडसीपणाचे ठरेल. वाहनाचा वेग कमाल मर्यादेपर्यंत वाढविणे याप्रमाणे मद्यप्राशन करून वाहन चालविणे, रात्रीच्या प्रवासात वाहनाला अनावश्यक लावलेल्या प्रखर दिव्यांचा जास्तीत जास्त वापर करणे, समोरून वाहन येत असताना ओव्हरटेक करण्याचा फाजील आत्मविश्वास दाखविणे अशी एक ना अनेक कारणे अपघातांमागे आहेत. हा बेदरकारपणा रोखायला हवा.

- Advertisment -