Eco friendly bappa Competition
घर संपादकीय अग्रलेख सावळ्या भुईचा चंद्रोत्सव

सावळ्या भुईचा चंद्रोत्सव

Subscribe

केवळ भारतालाच नव्हे, तर जगाला ज्याची प्रतीक्षा होती, ते चांद्रयान-३ मोहिमेने साध्य केले. बुधवारी सायंकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरले आणि इस्रोने अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने नवा इतिहास घडवला. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचे हे यश आहे, त्याचे विस्मरण कोणालाही होणार नाही, हे निश्चित! भूतलावर जल्लोष झाला. देशभरात तर अक्षरश: दिवाळी साजरी झाली. प्रत्येक कानाकोपर्‍यात तिरंगा डौलाने फडकत होता. तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. इस्रोच्या मुकूटात आणखी एक मानाच तुरा खोवला आहे. कामगिरी फत्ते करून चंद्राचा दक्षिण ध्रुव पादाक्रांत करणारा भारत हा पहिला देश बनला आहे.

सन २०१३-१४ मध्ये मंगळावर यशस्वीपणे यान उतरवणारा भारत पहिलाच देश ठरला. अमेरिकेची नासा, रशिया आणि युरोपियन स्पेस एजन्सीसारख्या दिग्गज देशांना पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत कृत्रिम उपग्रह पोहचवता आला नव्हता, तो पराक्रम भारताने केला होता. या लौकिकाला साजेशी पुढील मोहीम इस्रोने आखली. चंद्र मोहीम इस्रोसाठी कठीण नव्हती, पण त्यातही अवघड आव्हान इस्रोने स्वीकारले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्याची योजना इस्रोने हाती घेतली. २०१९ मध्ये अगदी हाता-तोंडाशी आलेली पहिली मोहीम अयशस्वी ठरल्यानंतर त्यातून धडा घेत इस्रोने चांद्रयान-३ मोहीम हाती घेतली आणि यशस्वी करून दाखविली.

- Advertisement -

आम्ही मागील मोहिमेतील लँडिंग प्रक्रियेनंतरच्या डेटाचा अभ्यास केला. त्याच्या आधारे नव्या मोहिमेत सुधारणा केल्या. त्याशिवाय, आणखीही काही सुधारणा केल्याचे इस्रोचे माजी संचालक के. सिवन यांनी सांगितले होते. आजचे चांद्रयान-३ चे यशस्वी लॅण्डिंग ही त्याचीच परिणती आहे. ‘जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका, कारण फेल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग…,’ असे भारताचे मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले आहे. त्यांचे हे कथन इस्रोने सार्थकी लावले. एखाद्या गोष्टीचे वेड घेतल्याशिवाय इतिहास घडवता येत नाही, हेच इस्रोच्या शास्त्रज्ञांनी दाखवून दिले. इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचा आम्हाला अभिमान आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘चांद्रयान-३’चे १४ जुलै २०२३ रोजी दुपारी यशस्वीरित्या अवकाशात प्रक्षेपण झाले. त्यानंतर यशस्वीपणे मार्गक्रमण करत या यानाने महत्त्वाचे सर्व टप्पे पार केले. अखेर बुधवारी चंद्राच्या पृष्ठभूमीवर सॉफ्ट लँडिंग केल्याने इस्रोच्या या कामगिरीची सुवर्ण अक्षरात नोंद झाली. तिथल्या वातावरणाशी मिळते-जुळते ठरतील अशी उपकरणे तयार करणे, तिथल्या परिसरात फिरू शकेल असे रोव्हर तयार करणे हे आव्हान इस्रोने पेलले आहे. हेच खरे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौशल्य आहे आणि या कौशल्याचे कौतुक तर व्हायलाच पाहिजे. या मोहिमेच्या यशस्वीतेनंतर ‘स्वप्नात पाहिले जे, ते रूप हेच होते…’ असे या शास्त्रज्ञांनी म्हटले असेल. आता तेथील वातावरण, वायू, खनिजे यांचे अस्तित्व यासह अनेक गोष्टींचा अभ्यास या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

- Advertisement -

विक्रम लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची प्रक्रिया सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सुरू झाली आणि प्रत्येकाच्या जीवाची घालमेल सुरू झाली. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जगभरातून प्रार्थना केली जात होती. ही प्रार्थना फळास येण्यासाठी अवघे काही मिनिटे शिल्लक होती. हातातील मोबाईलमधील ओटीटी, व्हिडीओ आदी बघण्यापेक्षा बहुतांश जणांनी विक्रम लॅण्डर चंद्रावर उतरण्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यावर भर दिला. अखेर तो क्षण आलाच आणि… ‘जे न देखे दुनिया, ते देखे इंडिया’, हे वास्तवात उतरले… चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा तिरंगा फडकला. चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीन यानंतरचा चौथा देश ठरला आहे.

आपली मोहीम यशस्वी होण्यापूर्वी रशियानेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. रशियाचे लुना-२५ हे यान २१ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच उतरणार होते, पण दुर्दैवाने चंद्रावर उतरण्यापूर्वीच हे यान क्रॅश झाले. रशियाची ती मोहीम यशस्वी ठरली असती, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत हा दुसरा देश ठरला असता, पण शेवटच्या टप्प्यात मोहीम अयशस्वी ठरल्यावर काय होते, हे भारताने अनुभवले आहे. २०१९च्या त्या घटनेने संपूर्ण देश हळहळला होता. त्यामुळे रशियाला झालेल्या वेदनेची कल्पना तमाम भारतीयांना आहे, पण आता आपली ही मोहीम यशस्वी झाली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७४ साली पहिली अणूचाचणी केली.

त्यानतंतर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात मे १९९८ मध्ये राजस्थानच्या पोखरण येथे अणूस्फोटाची यशस्वी चाचणी घेतली होती. अमेरिकेसह जगातील कुठल्याही देशाला काहीही थांगपत्ता लागू न देता भारताने ही चाचणी केली होती. आता लक्ष आहे, ते इस्रोच्या नव्या मोहिमेकडे, गगनयान. भारत आता नव्या गगनयान अंतराळ मोहिमेसाठी सज्ज झाला असून गगनयान मिशनच्या सर्व्हिस मॉड्युल प्रोपल्शन सिस्टीमची अलीकडेच यशस्वी चाचणी घेण्यात आली. इस्रोचा धडाका बघता ही मोहीमदेखील नक्कीच यशस्वी होईल, असा तमाम भारतीयांना विश्वास आहे. चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यामुळे सध्या सावळ्या भुईचा चंद्रोत्सव सुरू आहे.

- Advertisment -