Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeसंपादकीयअग्रलेखMumbai Nagpada News : जीवघेणी सफाई!

Mumbai Nagpada News : जीवघेणी सफाई!

Subscribe

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना उन्हाळ्यात सुरुवात होते. यासोबतच उन्हाळ्याच्या दिवसांतच खासगी नालेसफाईची कामे, इमारत सोसायटीतील सेप्टीक टाकीच्या सफाईची कामेही सुरू होतात. या कामासाठी असंघटित कामगारांना बोलावले जातात, साफसफाईच्या कामासाठी येणारे कामगार हे बहुतांशी गरीब गटातील आणि विशिष्ट अशा जातसमुहातील असतात. यातील अतिशय गरजू असलेले कामगारच या कामासाठी तयार होतात. शंभर ते पाचशे घरे असलेल्या एखाद्या मोठ्या सोसायटीत सेप्टीक टँकची संख्या मोठी असते. सोसायटीकडून एखाद्या खासगी कंत्राटदाराला हे काम सोपवले जाते. खासगी कंत्राटदाराकडून कामगार सुरक्षेशी संबंधित उपाययोजनांना फाटा दिला जातो. ठाणे, भिवंडी, कल्याण परिसरासह मुंबईतही सेप्टीक टँक किंवा नालेसफाई करताना कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सेप्टीक टँक किंवा साचलेले पाणी भरलेली टाकी साफ करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे सुरू केल्यानंतर अशा बंदिस्त टाक्या कित्येक महिने उघडलेल्या नसतात, या टाक्यांमध्ये केरकचरा कुजल्याने गॅसचा दबाव निर्माण झालेला असतो. टाकी साफ करण्याच्या एक तास आधी अशी टाकी आतील विषारी गॅस निघून जाण्यासाठी उघडून ठेवावी लागते.

उन्हाळ्यात बाहेरील तापमान वाढल्याने टाकीत गॅसनिर्मितीची प्रक्रिया वेगाने होत असते. अशा टाकीत सफाईसाठी उतरणार्‍या कामगारांना या कामाचे योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे असते. महापालिकांच्या साफसफाईच्या कामातील कामगारांना असे प्रशिक्षण, सूचना दिल्या गेलेल्या असता, त्याहीपेक्षा मुंबई, ठाणे, केडीएमसी, उल्हासनगर आदी महापालिकांमध्ये सक्शन पाईप वाहनाने टाकीतील गाळ कचरा काढला जातो. त्यामुळे अशा टाक्यांमध्ये कामगारांना उतरवण्याचे जीवघेणे काम कमी झाले ही दिलासादायक बाब आहे. परंतु खासगी कामात अद्यापही गरजू कामगारांना या धोक्याच्या कामात जुंपले जाते, त्यांना अशा कामांचे पुरेसे प्रशिक्षण नसते. कंत्राटदार किंवा काम देणार्‍या मुकादमाकडून हातमोजे, टॉर्च, गमबूट, हेल्मेट आदी प्राथमिक सुरक्षा साहित्यही बरेचदा पुरवले जात नाही. ऑक्सिजन मास्क ही खूप पुढची गोष्ट आहे. टाकीत उतरल्यावर अंदाज घेत सफाईचे काम करावे लागते. या टाकीत उतरण्याआधी टाकीत विषारी गॅस आहे का याची चाचपणी केली जाते. टाकी, मेनहोलचे झाकण उघडल्यावर काही वेळेनंतर त्यात माचिसची पेटती काडी टाकून पाहिले जाते. टाकीत विषारी गॅस असल्यास तो पेट घेतो आणि जळून जातो. त्यानंतर कामगारांना टाकीत उतरवले जाते, टाकीतले तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा जास्त असल्याने आणि मोकळी हवा नसल्याने कामगारांची घुसमट होते आणि श्वास कोंडून त्यांचा मृत्यू होतो. उन्हाळ्याच्या दिवसात सेप्टीक टाकी किंवा बराच काळ साचून राहिलेल्या बंद टाक्यांमध्ये वाढत्या उष्म्यामुळे विषारी गॅस वाढलेला असतो, अशा वेळी साफसफाईचे काम कमालीचे धोकादायक असल्याने योग्य रितीने सुरक्षा उपायांच्या निर्देशानुसारच कामाला सुरुवात करणे हिताचे असते, परंतु साफसफाईच्या खासगी कामात अशा पद्धतीची काळजी घेतली जात नाही. कुठल्याही साधनांशिवाय टाकीत उतरलेल्या कामगारांची शुद्ध हरपते, त्यानंतर या कामगारांना वाचवायला जे कामगार घाईने आत उतरतात तेही बेशुद्ध पडतात आणि त्यांचाही गुदमरून मृत्यू होतो.

नागपाड्यातील एका इमारतीची सेप्टीक टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या पाच कामगारांचाही सुरक्षा साधनांचा वापर न केल्याने आणि कामात योग्य ती काळजी न घेतल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. येथील बिस्मिल्ला स्पेस या इमारतीचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली. टाकीत उतरलेले कामगार आतमध्ये बेशुद्ध पडले होते, त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हे कामगार कंत्राटी कामगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासगी ठिकाणी काम करणारे असे कामगार बहुतांशी कंत्राटी आणि असंघटित गटातील असतात. त्यामुळे कामगार सुरक्षेचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. दुर्घटना घडल्यानंतर संबंधित ठेकेदार आणि मालकाकडून प्रकरण मिटवण्यावर भर असतो. अशा परिस्थितीत जुजबी मदत करून कामगारांची बोळवण केली जाते. बांधकामातील कामगार, धोकादायक ठिकाणी काम करणारे कामगार, कारखान्यात, उच्च तापमानात बॉयलरच्या संपर्कात असलेले कामगार, एमआयडीसीत हानिकारक वायू आणि पदार्थांच्या संपर्कात येणार्‍या कामगारांना जीविताचा धोका कायम असतो. कामगारांविषयी आपल्याकडे अनेक कायदे असतात, परंतु या कायद्यांची अंमलबजावणी पुरेशी होत नाही, त्यात कामगारांच्या हितासाठी असलेल्या योजनेतील अटींचा अडसर अनेकदा येतो. कामगार महाराष्ट्रातील रहिवासी नसल्यास त्याला सरकारी मदत मिळणे कठीण होते. वयोमान, वास्तव्य, कामाचा कालावधी, कामगार कायद्यानुसार नोंद असणे आवश्यक असते. या नोंदी पूर्ण करून संबंधित कामगाराला आर्थिक मदत मिळवण्यासाठी कामगार ज्या ठेकेदार किंवा मालकाकडे काम करतो, त्याने पुढाकार घेणे आवश्यक असते, परंतु अनेकदा पोलीस आणि कायद्याचा ससेमिरा टाळण्यासाठी मालकांकडून दुर्घटनेचे प्रकरण दडपून टाकले जाते, एका कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याची जागा घ्यायला दुसरा कामगार तयार असतो, त्यामुळे काम थांबत नाही, एखाद्या कामगाराच्या मृत्यूने व्यवस्था, मालक, सरकार कोणाचेही काहीही अडत नाही.