घरसंपादकीयअग्रलेखबेपर्वाईचे बळी!

बेपर्वाईचे बळी!

Subscribe

मुंबई ते पुणे अंतर जलद कापणारा द्रुतगती मार्ग आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग अजून किती बळी घेणार, याचे उत्तर कुणाकडेच नाही. त्या ठिकाणी घडणार्‍या अपघातांमागे वेगवेगळी कारणे आहेत, परंतु बहुतांश अपघात चालकांच्या बेदरकारपणामुळे झाल्याचे मान्य करावे लागेल. गेल्या रविवारी विद्यार्थ्यांची सहल घेऊन गेलेल्या बसला बोरघाट उतरताना रात्री अपघात झाला. हे सर्व चेंबूरमधील एका कोचिंग क्लासचे विद्यार्थी आहेत. सुट्टी असल्याने सर्वांना लोणावळा येथे नेण्यात आले होते आणि परतताना ब्रेक निकामी झाल्याने बस उलटली. यात दोघांचा हकनाक बळी गेला. इतर काहीजण जखमी आहेत. या मार्गावर काही भाग तीव्र उताराचा असल्याने वाहनाचे ब्रेक सुस्थितीत असल्याची खातरजमा चालकाने करून घ्यावी असे सर्वसाधारण संकेत आहेत.

या दुर्दैवी बसचे ब्रेक कमकुवत असल्याचे लक्षात आल्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी अशा स्थितीत बस घाटातून उतरवू नये अशी विनंती चालकाला केली होती. त्याकडे चालकाने दुर्लक्ष केले. त्यामुळे जे घडू नये ते घडले! त्यामुळे या अपघाताला चालक जबाबदार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या सहलींचा हंगाम सुरू आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सहली ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे आता ठिकठिकाणाहून उत्साहाने सहली निघू लागल्या आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहलींचे प्रमाण यात लक्षणीय आहे. यासाठी एसटीच्या बस प्रासंगिक करारावर घेतल्या जातात. तसेच खासगी बस, मिनी बस याही भाड्याने घेतल्या जातात. अनेकदा एसटी वगळता खासगी बसवरील चालक पुरेसा अनुभवी आहे किंवा नाही, हे पाहिले जात नाही. काहीवेळा नेहमीचा चालक उपलब्ध नसल्याने मालक एखाद्या नव्या किंवा रस्त्याची पुरेशी माहिती नसलेल्या चालकाच्या हाती बस सोपवून मोकळा होतो. बसचा चालक अनुभवी आहे का, याची बिलकूल खात्री करून घेत नाहीत.

- Advertisement -

अशातून मग अपघातासारख्या दुर्दैवी घटना घडतात. अलीकडे परप्रांतातील चालक कमी वेतनावर नोकरीत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यांना रस्ते धडपणे माहीत नसतात. कोकणात वळणावळणाच्या रस्त्यावर या चालकांची भंबेरी उडते हे अनेकदा दिसून आले आहे. मालकांनाही ही बाब माहीत असते. तरीही स्वस्तातील चालक नोकरीत घेऊन त्यांच्या हातात बस आणि पर्यायाने प्रवाशांचे जीव सोपवले जातात. रविवारच्या अपघातग्रस्त बसचा चालक मूळचा झारखंडचा असल्याची माहिती पुढे आली आहे. या घाटाचा पुरेसा अनुभव त्याला नसल्याने द्रुतगती मार्गाऐवजी तीव्र उताराच्या बोरघाटातून बस नेण्याची चूक त्याने केली. शिवाय सकाळी लोणावळ्याकडे जाताना वाटेत दोनदा बस बंद पडल्याचीही माहिती समोर आली आहे. मुलांचे जीव अशा बेदरकार चालकाच्या हाती सोपविण्याची मोठी चूक बसच्या मालकाने केली. सर्व प्रकरण केवळ चालकाच्या अंगावर शेकविण्यात अर्थ नाही. कारण चालक हा नोकर आहे, त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी इतर घटकांची आहे.

मुंबई ते पुणे हा देशातील सर्वाधिक रहदारी असलेल्या मार्गांपैकी एक आहे. राष्ट्रीय महामार्गाला पर्याय म्हणून द्रुतगती मार्ग अस्तित्त्वात आला. हा नवीन मार्ग सुसाट असल्याने चालक ताळतंत्र न ठेवता त्यावरून वाहने चालवतात, तर बोरघाट अवघड घाट समजला जातो. खोपोलीकडून जाण्यासाठी अनेक वाहने याच बोरघाटाचा वापर करतात. कालौघात या मार्गावरील काही वळणे सुसह्य करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी तो चालकाची, विशेषतः अवजड किंवा मोठे वाहन चालविणार्‍या चालकाची कसोटी घेणारा आहे. स्वाभाविक वाहन सुस्थितीत असण्याबरोबर चालकही अनुभवी असावा लागतो. वाहन तीव्र उतारावरून खाली उतरविताना ते ब्रेकच्या भरवशावर कधीच उतरवू नये असे सांगितले जाते. पहिल्या किंवा दुसर्‍या गिअरमध्येच ते उतरवले पाहिजे.

- Advertisement -

अवजड वाहन तर शक्यतो ‘स्पेशल’ गिअरमध्ये उतरविण्याचा निर्णय अनुभवी चालक घेत असतात. ब्रेकचा (अर्थात ब्रेक लायनर) आकार आणि अवजड वाहन याचा ताळमेळ कधीच बसत नसतो. त्यामुळे अनुभवी चालकांचा भरवसा ब्रेकपेक्षा पहिल्या, दुसर्‍या किंवा ‘स्पेशल’ गिअरवरच अधिक असतो, मात्र अलिकडे असे झाले आहे की चालक इंधन वाचविण्यासाठी वाहन चक्क बंद करून उतार उतरतात. याचा ताण ब्रेकवर येतो आणि त्यात ब्रेक निकामी होण्याचा धोका सर्वाधिक असतो. उतारावर वाहन बंद करू नये असे आवाहन वाहतूक विभागाकडून वारंवार केले जात असले तरी त्याकडे चालक दुर्लक्ष करतात. वाहतूक विभाग किंवा आरटीओ हा प्रकार कसा थांबविणार, हे कोडे आहे. अनेकदा प्रवासी वाहनेही उतारावर बंद करून उतरविण्यात येतात. आतील प्रवाशांना चालकाचा हा आगाऊपणा समजतोच अशातला भाग नाही.

रविवारच्या दुर्घटनेनंतर वाहतूक पोलीस सतर्क झाल्याचे सांगितले जाते. ही सतर्कता किती दिवस पाळली जाणार, की त्याचा सप्ताह, पंधरवडा ‘साजरा’ होणार हे स्पष्ट झाले पाहिजे. सध्या द्रुतगती मार्गावर वाहनचालकांचे प्रबोधन सुरू आहे. अशा प्रकारचे प्रबोधन फार्स अधून-मधून होत असतात. प्रबोधनात तडजोडीचा भागही मोठा असतो. ज्या ठिकाणी पोलीस असतात तेथे वाहनचालक शिस्तीत चालतात, पण पोलीस नसलेल्या ठिकाणी काय? पुरेसा अनुभव नसतानाही शिकाऊ चालकाला पक्के लायसन्स देण्याची सुविधा आपल्याकडे आहे. अवजड वाहनांवर अनुभव नसलेले चालक बसविले जातात. वाहनांची संख्या भरमसाठ वाढत असताना अनुभवी चालकांचा दुष्काळ आहे. तेव्हा वाहन नवशिक्या चालकांकडे द्यायचे आणि पुढे काय ते पाहू, अशी मालकांची मानसिकता आहे. बोरघाटातील ताज्या दुर्घटनेतून काही तरी शिकले पाहिजे. सहलीची बस घेऊन जाणारे चालक अनुभवी असलेच पाहिजेत, असा दंडक घालण्यात यावा.

शक्यतो एसटीच्या बस सहलीसाठी नेणे सुरक्षित समजले जाते, कारण चालक अनुभवी आणि रस्त्यांची पुरेशी माहिती असणारे असतात. पैशांच्या हव्यासापोटी गेल्या काही वर्षांत खासगी प्रवासी वाहतुकीचे पेव प्रचंड प्रमाणात फुटले आहे. गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ, होळी या सणांत खासगी वाहतूकदार प्रवाशांची लूट करतात. यावर टीका होते. पण बरेचसे वाहतूकदार बडी धेंडे असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. नाताळ सण आणि नव्या वर्षाचे स्वागत याकरिता शहरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात सहलीसाठी बाहेर पडत असतात. त्यांचाही कल एसटीपेक्षा खासगी बस भाड्याने घेण्याकडे अधिक असतो. अर्थात यावर आक्षेप असण्याचे कारण नाही, मात्र या बसचा चालक पुरेसा अनुभवी आहे किंवा नाही, याची चाचपणी करणे आवश्यक आहे. नाही तर संकटाला ते निमंत्रण ठरते. सहली घेऊन जाणार्‍या बस किंवा इतर दिवशी खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसच्या चालकांची वाटेत प्रामाणिक चौकशी झाली पाहिजे. चिरीमिरी घेऊन ‘सावकाश जा बाबा’ असा प्रेमाचा सल्ला देणारी यंत्रणा नको. यामुळे मालकांच्या मनमानीलाही चाप बसेल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -