घरसंपादकीयअग्रलेखसारे प्रवासी चढाओढीचे!

सारे प्रवासी चढाओढीचे!

Subscribe

महाराष्ट्रातील शिकल्या-सवरलेल्या राजकीय पुढार्‍यांचा तोल जाऊ लागला आहे. सर्वच घटनांचे राजकारण करण्याची स्पर्धा सर्वच पक्षांच्या नेत्यांमध्ये सुरू आहे. त्यातूनच सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी दिवसागणिक घसरत चालली आहे. याआधीही महाराष्ट्रात सत्तांतर, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप टीका होत होती. आचार्य अत्रे तर राजकीय नेत्यांचा खरपूस समाचार घेत असत, पण राजकीय सभ्यता कधी ढासळलेली महाराष्ट्राने पाहिलेली नव्हती. सध्याच्या सर्वच राजकीय पुढार्‍यांनी, सत्ताधारी-विरोधकांनी राजकीय सभ्यता टांगणीला ठेवल्याचे दिसत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्या दिशेने भरकटू लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर सुडाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेने याआधीही काँग्रेससह विविध पक्षांशी मैत्री केलेली होतीच, पण यावेळच्या नव्या युतीने भाजप डिवचले गेले. त्याची परिणती महाराष्ट्रात अडीच वर्षांतच मोठा राजकीय भूकंप होऊन सत्तांतरात झाली. राजकारणातील संघर्ष व्यक्तिगत पातळीवर जाऊन पोहोचला. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात राजकीय संघर्षातून खून-मारामार्‍या होऊ लागल्या आहेत. त्याचेही राजकारण होऊ लागले आहे. ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली. विनोद घोसाळकर यांच्या कुटुंबावर झालेला आघात मोठा आहे. घोसाळकर कुटुंबीय अजून त्यातून सावरलेले नाही. घोसाळकर कुटुंबीयांचे दुःख हलके करणे, त्यातून त्यांना बाहेर येण्यासाठी मानसिक आधाराची गरज असताना त्याचेही राजकारण केले जात आहे.

- Advertisement -

त्याचे भान सत्ताधारी आणि विरोधकांनी ठेवलेले नाही. परिणामी स्वत: विनोद घोसाळकर यांनाच, आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा असे सांगावे लागले आहे, यावरून राजकीय नेत्यांनी आपण करत असलेल्या राजकारणावर विचार करण्याची वेळ आली आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना अश्लाघ्य, बिनबुडाचे आरोप करून आमचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. अभिषेकवर होत असलेले आरोप म्हणजे मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा किळसवाणा प्रकार आहे, अशा वेदना आपल्या मुलाच्या जाण्याने दु:खात बुडालेल्या बापाला व्यक्त कराव्या लागत आहेत, हे महाराष्ट्रातील राजकारणाला नक्कीच शोभणारे नाही.

कल्याणमधील पोलीस ठाण्यातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्याच मित्रपक्षाच्या नेत्यावर गोळीबार केला. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. कायदा बनवणारा एक जबाबदार आमदारच कायदा हातात घेऊन कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यातच गोळीबार करतो, ही घटना धक्कादायक आणि समर्थनीय नाही. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वच्छ चारित्र्य, सुसंस्कृत राजकारणाचा टेंभा मिरवणार्‍या भाजपने खरे तर गणपत गायकवाड यांना त्वरित पक्षातून निलंबित करून कठोर कारवाईची भूमिका घेण्याची गरज होती.

- Advertisement -

त्याऐवजी भाजपचे वरिष्ठ नेते चिडीचूप आहेत, तर स्थानिक भाजपचे नेते गणपत गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसत आहे. या घटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यामुळेच दोघांनीही मृत्यूशी झुंज देत असलेल्या शहरप्रमुख महेश गायकवाड याच्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या घटनेनंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये असलेला संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

हा प्रकार वैयक्तिक वादातून झाल्याचे सांगत भाजपकडून सारवासरव केली जात असली तरी सत्तासंघर्षाची असलेली किनार सोयीस्कररित्या दुर्लक्षित केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अशी घटना घडली असती किंवा महाविकास आघाडीतील एखाद्या आमदाराकडून असे कृत्य घडले असते, तर भाजपने संपूर्ण महाराष्ट्रात रान उठवले असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीही आहेत. सत्ताधार्‍यांना वेगळा न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय, अशी फडवणवीसांची दुटप्पी भूमिका वारंवार दिसू लागली आहे. गणपत गायकवाड घटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे. या प्रकरणात राजकीय कोंडी झालेली असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हतबलताही लपून राहिलेली नाही.

अभिषेक घोसाळकरप्रकरणी थेट उद्धव ठाकरेंना उबाठाचा तिहार जेल होईल, अशी अप्रत्यक्षरित्या खुली धमकी देणार्‍या मुख्यमंत्र्यांना गणपत गायकवाड प्रकरणी भाजपला इशारा देण्याची हिंमत झाली नाही. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गट गणपत गायकवाड आणि अभिषेक घोसाळकर घटनेनंतर अधिक आक्रमक झालेला दिसत आहे. गेल्या काही दिवसातील महाराष्ट्रातील विविध गुन्हेगारी घटनांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही तोल जाताना दिसत आहे.

महाविकास आघाडी काळातील भ्रष्टाचार, घोटाळे, उद्धव ठाकरे यांना सत्ता आणि पैशांची असलेली हाव याचे आपण साक्षीदार असल्याचा साक्षात्कार आता मुख्यमंत्र्यांना झाला आहे. साडेचार वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांना ही उपरती झालेली आहे. त्या अडीच वर्षांच्या काळातील सत्तेत मुख्यमंत्री शिंदेही भागीदार होते. राज्यातील जनतेची इतकी काळजी होती, तर त्याचवेळी त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून जनतेसमोर असे प्रकार का आणले नाहीत, हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकार्‍यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी घोटाळे, भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केलेले आहेत. महाराष्ट्रातील भ्रष्टाचार संपवून जनतेच्या कल्याणाचे राज्य आणण्याचे खरोखरच मनापासून वाटत असेल, तर शिंदे अशा घोटाळेबाजांची साथ सोडण्याची हिंमत दाखवतील का?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -