घरसंपादकीयअग्रलेखनरेंद्र मेहतांचे पक्षालाच आव्हान!

नरेंद्र मेहतांचे पक्षालाच आव्हान!

Subscribe

मीरा-भाईंदर महापालिकेच्या भाजपच्याच एका नगरसेविकेने गंभीर आरोप केल्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अवघ्या दीडच वर्षात मेहता पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. पक्षाने त्यांना अंतरावर ठेवून त्यांचे विरोधक रवी व्यास यांना जिल्हाध्यक्षपदावर बसवले आहे. त्यामुळे डिवचल्या गेलेल्या मेहता यांनी समांतर पक्ष चालवत थेट भाजपलाच आव्हान देण्याचे काम सुरू ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदर शहरात आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात नरेंद्र मेहता आपली जवळीक दाखवण्यासाठी फडणवीस यांच्या अवतीभवती फिरत असताना दिसले. त्यातून फडणवीस यांची मेहतांशी असलेली जवळीक समोर आली. देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त असल्याने नरेंद्र मेहता यांच्याविरोधात पक्षाला काहीच कारवाई करता येईनाशी झाली आहे. मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये गटबाजी सुरू आहे. त्यात कार्यकर्त्यांची कोंडी होताना दिसत आहे.

जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांची नियुक्ती झाल्यापासून माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी वेगळी चूल मांडली आहे. आपल्या समर्थकांसह मेहता जिल्हाध्यक्षांनी ठेवलेल्या कार्यक्रमाला जात नसल्याचे दिसून येते. त्याऐवजी परस्पर वेगळे कार्यक्रम, बैठका घेत समांतर पक्ष चालवण्याचे काम त्यांनी सुरू ठेवले आहे. भाजपच्या ४३ व्या स्थापना दिनानिमित्त मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष रवी व्यास यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रभारी आमदार श्रीकांत भारतीय, माजी खासदार संजीव नाईक, आमदार गीता जैन यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- Advertisement -

दुसरीकडे, मेहता यांनी त्याचदिवशी पक्षाच्या जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन ठेवून जिल्हाध्यक्षांसह त्यांच्या समर्थकांना डावलून वेगळे शक्तिप्रदर्शन केले. मेहता यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमापासून वरिष्ठ नेते आणि स्थानिक कार्यकर्ते अनुपस्थित असल्याचे दिसून आले. मेहता यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये दिसणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री रवींद्र चव्हाण हेही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. भाजप जिल्हा कार्यालय इमारतीचे भूमिपूजन पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने केले असल्याचे सांगत मेहता स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांना एकप्रकारे आव्हान देत आहेत.

अवघ्या दोन नगरसेवकांसह अपक्ष म्हणून निवडून आलेले नरेंद्र मेहता यांना काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन आणि राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा या दिग्गजांमधील वादाने थेट महापौरपद मिळवून दिले. महापौरपदी विराजमान झाल्यावर मेहतांनी आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगले. अपक्ष म्हणून निवडून येणे शक्य नसल्याचे लक्षात आलेल्या मेहतांनी थेट भाजपची वाट धरली. महापौरपदावर बसवलेल्या तत्कालीन आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा पराभव करत आमदार बनलेल्या मेहतांनी भाजपला बहुमताने मीरा-भाईंदर महापालिकेची सत्ता मिळवून दिली. त्यानंतर मेहता यांनी भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्या आशीर्वादाने भाजपमधील आपली खुर्ची बळकट केली. मुंडे यांच्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी जवळ केले. त्यामुळे मेहता भाईंदरमधील ताकदवान नेते झाले.

- Advertisement -

मीरा-भाईंदर महापालिकेत सत्ताधारी टक्केवारीत गुंतलेले असतात. त्यात भाजप आणि नरेंद्र मेहता अपवाद राहिलेले नाहीत. त्याचबरोबर मेहता यांनी मीरा-भाईंदर शहरात अनेक जमिनींमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गुंतवणूक केली असून त्यात भाजपमधील काही बड्या नेत्यांची बेनामी भागीदारी असल्याचीही चर्चा शहरात आहे. मेहतांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित असलेले अनेक प्रकल्प सध्या वादात आहेत. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले असून चौकशीही सुरू आहे. ही गुंतागुंत सोडवण्यासाठी महापालिकेची सत्ता हाती असणे आवश्यक असल्याने कायमचा राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केलेल्या मेहता यांनी काही महिन्यातच घुमजाव करत पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात येण्याची धडपड चालवली आहे. ते आपल्या समर्थकांसह समांतर पक्ष चालवित आहेत.

मीरा-भाईंदरमधील बहुतेक सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मेहतांच्या पाठीशी आहेत. रवी व्यास जिल्हाध्यक्ष असले तरी त्यांना अनेक मर्यादा असल्याने त्यांना पक्षावर आपली पकड ठेवणे शक्य होताना दिसत नाही. व्यास यांच्या नेतृत्वाखाली आगामी मीरा-भाईंदर महापालिकेची सत्ता काबिज करणे भाजपला अशक्यच आहे, हे वास्तव आहे. आमदार गीता जैन भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्या तरी महापालिकेची सत्ता मिळवून देण्याइतपत त्यांची ताकद नाही. हे मेहता पक्के जाणून आहेत. म्हणूनच ते बिनधास्तपणे जिल्हाध्यक्षांना जुमानेसे झाले आहेत. मेहतांना थेट फडणवीस यांचाच वरदहस्त असल्याने त्यांचा मीरा-भाईंदर शहरातील भाजपमध्ये दबदबा आहे.

भाजपचे अनेक वरिष्ठ मेहतांच्या विरोधात आहेत, पण थेट फडणवीस यांचेच अभय लाभलेल्या मेहतांच्या दबदब्यापुढे भाजपचे राज्यातील भलेभले नेते हतबल असल्याचे चित्र आहे. त्यातूनच मेहतांनी समांतर पक्ष चालवून थेट पक्षालाच आव्हाने देण्याचे काम उघडपणे सुरू ठेवले आहे. त्यातूनच शहरात पक्षांतर्गत दुफळी माजली आहे. ही दुफळी भाजपला त्रासदायक ठरणार आहे. पक्षाचा स्वत:साठी वापर करण्यापासून सतत वाद निर्माण करणार्‍या मेहतांना बाजूला ठेवा, अशी मागणी भाजपमधून उघडपणे केली जात आहे, पण भाजप नेतेच हतबल असल्याचे चित्र दिसत असल्याने पक्ष नेतृत्वाला मीरा-भाईंदरमधील गटबाजी अजूनही सोडवता आलेली नाही. भविष्यात पक्षासाठी ती खूपच त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्ष नेमका रवी व्यास की नरेंद्र मेहता यांच्यासोबत आहे, हे चित्र स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -