घरसंपादकीयअग्रलेखधुपाचा वास कुणाला झोंबतोय!

धुपाचा वास कुणाला झोंबतोय!

Subscribe

महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याची बातमी स्कायमेटबरोबरच भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना आणखी उकाडा सहन करावा लागणार आहे. वातावरणातील उष्मा वाढलेलाच आहे, पण दुसरीकडे राज्यातील सामाजिक वातावरणदेखील वेगळ्याच कारणाने तापत आहे. गेल्या जवळपास दीड-दोन महिन्यांपासून राज्यात जाती-धर्माच्या भिंती मजबुतीने उभ्या राहात असल्याचे पहायला मिळत आहे. याची सुरुवात रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरातील दंगलीने झाली. त्याच्या चौकशीसाठी एसआयटी अर्थात विशेष तपास पथक स्थापना करण्यात आले होते. एसआयटीने सुरुवातीला ७९ दंगलखोरांना अटक करण्यात आली होती. परिसरात अफवा पसरल्याने ही दंगल झाल्याचे एसआयटी तपासात समोर आले. अशाच काही घटना नंतर राज्यभरात घडल्या. मुंबईसारख्या संवेदनशील ठिकाणीदेखील रामनवमीला दोन गटांत संघर्ष झाला होता. मुंबईतील मालाड परिसरात दगडफेकीची घटना घडली होती. याप्रकरणी २० हून अधिक जणांना अटक करण्यात आली होती. हे सर्व काही पूर्वनियोजित होते, हे पोलीस तपासात उघड झाले.

अगदी अलीकडेच या दंगलीचे लोण अकोला शहरात पोहोचले. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या एका पोस्टमुळे तेथील वातावरण बिघडले. शहरात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. पोलिसांनी काही जणांवर गुन्हे नोंदवून ताब्यातही घेतले. आता या घटनेचीदेखील सखोल चौकशी होईल आणि त्यातून कदाचित काही धक्कादायक तथ्य समोर येईल, पण या सर्व घटनांतून काही प्रश्न निर्माण होतात. छत्रपती संभाजीनगरात रामनवमीच्या आदल्या दिवशी अफवा नेमक्या कशा पसरल्या की, त्या जाणूनबुजून पसरवल्या गेल्या? मुंबईतील दंगल पूर्वनियोजित होती, तर त्यामागचे करते-करविते कोण आहेत? अकोल्यात सोशल मीडियावर ती पोस्ट कोणी व का शेअर केली? या सर्व प्रश्नांची योग्य उकल होणे अतिशय गरजेचे आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. दंगली हाच भाजपच्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा आधार बनल्या आहेत. मतांचे ध्रुवीकरण करत राजकीय स्वार्थ साधला जात असल्याची टीका शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे, तर या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत, सरकारने देशभरात धार्मिक तणाव निर्माण करण्याची फॅक्टरी उघडली आहे. त्या फॅक्टरीची प्रयोगशाळा महाराष्ट्रात सुरू केली आहे, असे वाटत असल्याची टीका केली आहे.

- Advertisement -

एकीकडे सण-उत्सव साजरे करण्यास आता कोणतेही निर्बंध नसल्याचे शिंदे-फडणवीस सरकार म्हणत आहे, तर पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा थेट आरोपही विरोधकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हाच दावा केला आहे. रामनवमी आणि हनुमान जयंतीसारखे सण आणि त्यांच्या निघणार्‍या मिरवणुका या दंगली घडवण्यासाठीच असतात. आगामी २०२४ हे वर्ष दंगलींचे वर्ष असेल, असे माझे स्पष्ट मत असल्याचे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात म्हटले होते. यावरून सत्ताधार्‍यांकडून, विशेषत: भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील, या वक्तव्याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा, दंगली घडवण्याबाबत तुम्ही ठरवलं आहे का, असाही सवाल आमच्यासमोर उपस्थित होत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी संवेदनशीलता दाखवली नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. देशातील बारा ज्योतीर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात १३ मे २०२३ रोजी काही मुस्लिमांनी घुसण्याचा प्रयत्न केला, असे चित्र निर्माण केले गेले होते. ब्राह्मण महासंघाकडून एक पत्र पोलिसांना देण्यात आले, पण फार पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेचा तो एक भाग होता, हे स्पष्ट झाले. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळच असणार्‍या दर्ग्यात दरवर्षी उरुस भरतो. दर्ग्याला चादर चढवल्यानंतर डोक्यावर फुलांच्या माळा आणि चादर घेऊन त्र्यंबकेश्वर नगरीतून मिरवणूक काढली जाते. यंदादेखील तशीच उरुसाची मिरवणूक काढण्यात आली. उरुसातील सेवेकरी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या पायरीजवळ येऊन त्र्यंबकेश्वराला श्रद्धेने धूप दाखवतात आणि पुढे मार्गस्थ होतात. अनेक वर्षांपासून ही परंपरा पाळली जात आहे.

- Advertisement -

खरे तर धुपाच्या सुगंधामुळे सगळे वातावरण प्रसन्न होत असते, तर मग हा सुगंध कुणाच्या नाकाला झोंबत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कोणतीही शहानिशा न करता थेट अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍याच्या प्रमुखत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले, याचेच आश्चर्य वाटते. एकीकडे या सर्व घडामोडी सुरू असताना पोलिसांनी दोन्ही बाजूंची सलोखा बैठक घेत हा सर्व प्रकार गैरसमजातून झाल्याचे स्पष्ट केले आणि वाद मिटल्याचे सांगितले, पण तरीही हिंदू महासभेने बुधवारी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण केले. त्यामुळे दरवर्षी धूप दाखवण्यात येतो तेव्हा वाद होत नाहीत. यंदाच असा वाद का घातला जात आहे, असा प्रश्न आता उरुस आयोजकांना पडला आहे. हे सर्व पाहता राज्यात काहीतरी ‘बिघडतंय’, असेच वाटू लागलं आहे. क्लायमेट चेंजमुळे हवेतील उष्मा वाढला आहे, अवकाळी पाऊस पडत आहे, तर आता राज्यातील ‘अशा’ वातावरण बदलामुळे काळ सोकावू नये, म्हणजे झाले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -