Eco friendly bappa Competition
घर संपादकीय अग्रलेख नवभूमी दाविन मी...

नवभूमी दाविन मी…

Subscribe

देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा भाषण केले. ९० मिनिटांच्या भाषणात त्यांचा नेहमीचा आवेश होताच, पण येणारे वर्ष लोकसभा निवडणुकीचे असल्याने भाषण प्रचारकी थाटातील असल्याचे लक्षात येते. राजकारणातील घराणेशाही, तुष्टीकरण इथपासून ते भारत २०४७ वर्षी म्हणजे स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करताना विकसित राष्ट्र म्हणून जगात ओळखले जात असेल, इथपर्यंत विविध विषयांवर भाष्य केले. भाषणात अनेकदा पॉज घेताना ‘मेरे देशवासियो’, ‘मेरे प्यारे परिवारजनो’ अशी वारंवार साद घालण्यासही ते विसरत नव्हते. अनेकदा समोरून उपस्थितांतून ‘मोदी, मोदी’ अशी नारेबाजीही होत होती. त्यामुळे विरोधकांनी मोदींचे राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण होते की प्रचार सभेतील भाषण होते अशी उद्या टीका केली तर आश्चर्य वाटणार नाही.

अर्थात काय बोलावे हा पूर्णपणे पंतप्रधानांचा अधिकार असतो तो त्यांनी पूर्ण केला. मोदींनी जेव्हा-जेव्हा लाल किल्ल्यावरून भाषण केले तेव्हा त्यांनी नव्या योजनांचे सूतोवाच केले आणि त्या योजना पूर्णही केल्या हे मान्य करावे लागेल. २०१४ च्या पहिल्या भाषणात त्यांनी स्वच्छ भारत, जन धन योजनेची घोषणा केली. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी २०१८ मध्ये त्यांनी आरोग्य विमा योजनेसह आयुष्यमान भारत योजनेची घोषणा केली, तर २०१९ मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) या घोषणेप्रमाणे २०२१ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली. शिवाय ७५ वेगवान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचेही सूतोवाच केले. यावेळी त्यांनी येत्या विश्वकर्मा जयंतीपासून पारंपरिक कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना राबविण्याची आणि त्यासाठी १३ ते १५ हजार कोटी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.

- Advertisement -

मोदींनी आतापर्यंत लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणांतून त्यांचा राजकीय अभिनिवेश लपून राहिलेला नाही. नव्या योजनांच्या घोषणा करण्याबरोबर राबविलेल्या योजनांवर किती खर्च झाला याची आकडेवारी देता देता विरोधकांना चिमटे काढण्याची संधी ते सोडत नसतात. यावेळी त्यांनी राजकारणातील तुष्टीकरणाबरोबर घराणेशाहीवरही शेलक्या शब्दात प्रहार करण्याची संधी साधून घेतली. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात राजकीय शेरेबाजी करण्याचे खरं तर काही कारण नाही. त्यासाठी प्रचार सभा आहेत, अन्य व्यासपीठं आहेत. आंतराष्ट्रीय घडामोडी, धगधगते मणिपूर यावर पंतप्रधान बरेच काही बोलतील ही अपेक्षा फोल ठरली. मणिपूरच्या मुद्यावरून संसदेचे काम होत नसताना पंतप्रधानांनी मणिपूरमधून शांततेच्या बातम्या येत असल्याचे सांगितले. ईशान्येकडील हे छोटे राज्य धगधगत असताना पंतप्रधानांनी त्यावर धोरणात्मक भाष्य करणे अपेक्षित होते, पण त्यांना तेथे झालेला शांतीचा साक्षात्कार अजब म्हणावा लागेल.

तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. असे असताना केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमध्ये जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी एकत्र प्रयत्न करणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. मणिपूरमध्ये भाजपचे सरकार नसते, तर आतापर्यंत तेथे राष्ट्रपती राजवट लागू झाली असती. काश्मीरच्या खोर्‍यातील दहशतवाद्यांची वळवळ थांबलेली नाही. तसेच संभाव्य आतंकी कारवायांच्या आरोपाखाली देशभर एनआयएकडून संशयितांची धरपकड सुरू आहे. हे लक्षात घेता देश भयमुक्त झाला असे म्हणणे धाडसाचे ठरेल. नक्षलवाद्यांच्या विघातक कारवाया कमी झाल्या असल्या तरी त्या थांबलेल्या नाहीत. आधीपेक्षा आता देशाच्या सीमा अधिक सुरक्षित असल्याचे सांगताना मोदींनी अप्रत्यक्षपणे अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

देशाच्या सीमावर्ती भागातील गावांना देशाचे शेवटचे गाव नव्हे तर प्रवेशद्वार असल्याचे ठरवून तेथील ६०० प्रमुखांना स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात सहभागी करून घेण्याचा निर्णय स्तुत्य म्हणावा लागेल. याशिवाय भाड्याच्या घरामध्ये राहणार्‍यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना बँकेच्या कर्जावरील व्याजात सवलत देण्याची पंतप्रधान मोदी यांनी केलेली घोषणा अनेकांना सुखावणारी आहे. जी-२० शिखर परिषदेच्या ठिकठिकाणच्या आयोजनानिमित्ताने जगाला भारतातील सर्वसामान्याच्या ताकदीबरोबर देशाच्या विविधतेचेही दर्शन घडत असल्याचे मोदींनी अभिमानाने सांगितले. रस्त्यांचे जाळे देशभर निर्माण केले जात असल्याचेही ते म्हणाले. हवाई उड्डाण क्षेत्रात महिला पुढे येत असल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले. जल जीवन मिशनचा उल्लेखही मोदी यांनी केला. महागाईचा आगडोंब उसळला असल्याने जनतेची नाराजी आहे.

यावर मोदी काय भाष्य करणार हा औत्सुक्याचा भाग होता, पण त्यांनी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरू आहेत इतकेच सांगितले. गेल्या स्वातंत्र्य दिनी मोदी यांनी देशासाठी ‘पंचप्रण’ची घोषणा केली. यावेळी त्यांनी भारत २०४७ मध्ये विकसित राष्ट्र असेल असे स्वप्न दाखविले आहे, पण भारताची चीनला मागे टाकणारी लोकसंख्या पाहता हे वाटते तितके सोपे नाही. भ्रष्टाचाराला गाडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे. भाषणात त्यांनी आपण आशीर्वाद मागण्यासाठी आल्याचे सांगितले. हा आशीर्वाद आगामी निवडणुकीसाठी मागितला असावा असे समजण्यास वाव आहे. आपण ज्या प्रकल्पांची घोषणा करतो त्यांचे उद्घाटनही आपल्याच नशिबी असते असे सांगत पुढील वेळी आपणच येथून पुन्हा भाषण करणार, असे मोदींनी सांगून टाकले, पण मी पुन्हा येईन, म्हणणार्‍यांना वेगळाच अनुभव आलेला आहे, हे मोदींनी पाहिलेले आहे.

- Advertisment -