घरसंपादकीयअग्रलेखअवकाळीचा घाला शेतकर्‍यांच्या मुळावर!

अवकाळीचा घाला शेतकर्‍यांच्या मुळावर!

Subscribe

गेले दोन दिवस होळी आणि धुळवडीचा उत्सव एकीकडे साजरा होत असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसाने बळीराजा हवालदिल झाला आहे. मेघांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि सोबत सोसाट्याचा वारा यांनी राज्यात जोरदार धिंगाणा घातला आहे. यात पाळीव प्राण्यांसह शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तीन दिवसांपूर्वी हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. यावेळी मात्र ती तंतोतंत खरी ठरली. दुर्दैवाची गोष्ट अशी की, सलग दुसर्‍या वर्षी मार्चमध्ये बळीराजाला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे १९९२ शेतकर्‍यांच्या सुमारे १२०० हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले होते.

अनियमित पावसामुळे यंदा खरीप पिकांवर परिणाम झालाच होता. त्यापाठोपाठ आता अवकाळीमुळे रब्बी हंगामालाही फटका बसला आहे. पावसाबरोबरच गारपिटीने अनेक पिके भुईसपाट झाली आहेत. गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, द्राक्ष संत्री, आंबा, मका, ज्वारी या पिकांसमोबतच पालेभाजीला मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीला आलेल्या गहू, टोमॅटो, कांदा या पिकांची अक्षरशः वाताहत झाली आहे. नाशिक, ठाणे, पालघरसह आठ जिल्ह्यांमध्ये एकूण १३ हजार ७२९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी विधानसभेत दिली आहे. विशेष म्हणजे, अजून पूर्ण आकडेवारी सरकारच्या हाती आलेली नाही. त्यामुळे हा आकडा आणखी वाढणार, हे निश्चित.

- Advertisement -

या अवकाळी पावसाचा फटका प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. नाशिकमध्ये २६८५ हेक्टर गहू, भाजीपाला, द्राक्ष आणि आंब्याचे नुकसान झाले आहे. धुळ्यात ३ हजार १८४ हेक्टरमध्ये ज्वारी, केळी, पपईचे नुकसान झाले आहे. नंदूरबारमध्ये १५७६ हेक्टरवरील मका, गहू, हरभरा, केळी, पपई, आंबा यांचं नुकसान झाले आहे, तर जळगावमध्ये २१४ हेक्टरच्या गहू, मका, ज्वारी, केळी बाधित झाली आहेत. अहमदनगरमध्ये ४१०० हेक्टर मका, गहू, भाजीपाला वाया गेला आहे. पालघरमध्ये विक्रमगड आणि जव्हार भागात ७६० हेक्टर काजू आणि आंब्याचे नुकसान झाले आहे. शेतात नुसता चिखल झाल्याचे बळीराजाला भरल्या डोळ्याने पाहावे लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळल्याने नाशिक आणि परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आधीच हैराण आहे. सोलापुरात एका शेतकर्‍याने ५१२ किलो कांदा विकल्यावर त्याच्या हाती केवळ दोन रुपयेच आले.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा गाजल्यानंतर नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याची घोषणा सरकारने केली, मात्र तरीही कांद्याच्या दरातील घसरण कायम राहिली. त्यामुळे अनेक उत्पादकांनी कांद्याचे मोफत वाटप केले, तर नाशिकच्या येवला तालुक्यातील एका शेतकर्‍याने आपल्या दीड एकर शेतातील कांदा पीक जाळून टाकले. कांद्याप्रमाणेच द्राक्षाच्या दरातही घसरण झाली आहे. विशेषत: निर्यातयोग्य द्राक्षांच्या भावात घट झाली आहे. आधीच अवकाळी पावसाचे सावट आणि त्यात नाशवंत कृषिमाल असल्याने शेतकरी कमी भावात द्राक्षांची विक्री करत आहेत. अल्पभूधारक वगळता इतर शेतकरी पर्यायी पिकांचा विचार करू शकतात, पण आतापर्यंत केलेली गुंतवणूक आणि मशागतीचे काय? अवकाळी पावसाने तर सर्वच धुऊन नेले. गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी तसेच लहरी मान्सूनमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे सरकारी पातळीवर झाले तरी, अद्यापही अनेक शेतकर्‍यांच्या हाती भरपाई पडलेली नाही. त्यात पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, पण गेली दोन वर्षे निसर्गाच्या अस्मानी संकटाला तोंड देणार्‍या शेतकर्‍याला नेमकी भरपाई कधी मिळणार आणि त्याचे ‘अच्छे दिन’ कधी येणार, हाच खरा प्रश्न आहे. राज्यात आधीच सत्तेवरून रस्सीखेच सुरू आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याचे आता तरी दिसत आहे. मागील भरपाईच्या वेळीच राज्यात असेच राजकीय नाट्य सुरू होते. सत्तांतराच्या त्या घडामोडीत शेतकरी आणि त्याचे प्रश्न बाजूला पडले. आताही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर या नुकसानाची भरपाई मिळेल का, हा प्रश्न उपस्थित होतो. प्रत्येक राजकीय पक्ष सत्तेच्या राजकारणात मश्गुल आहे. केंद्राचा विचार करता ईशान्येकडील राज्यात सत्तास्थापनेत मोदी सरकार व्यग्र आहे.

दिवसेंदिवस महागाईच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत. राज्यात शिवसेनेतील दोन गट आणि भाजप यांच्यात कलगितुरा रंगला आहे. राज्यात शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्राकडून पथक कधी पाठविण्यात येणार, याची शेतकरी वाट पाहत आहेत. शेतकर्‍यांनी शेतीत ओतलेला पैसा वाहून गेला आहे आणि सरकारकडून आर्थिक मदत मिळण्याची प्रतीक्षा आहे. आधीच महागाईच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत. पेट्रोल-डिझेल-सीएनजीचे भाव कमी होण्याचे नाव घेत नाहीत. स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढले आहेत. कोरोना महामारीनंतर सर्वकाही बर्‍यापैकी पूर्वपदावर येत असले तरी, बेरोजगारीच्या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही. मोठे उद्योग प्रकल्प महाराष्ट्राला हुलकावणी देत, दुसर्‍या राज्यात जात आहेत. त्यात आता अवकाळी पावसाची भर पडली आहे. परिणामी, हा अवकाळी पावसाचा फटका शेतकर्‍याबरोबरच शहरातील सर्वसामान्य नागरिकांनाही बसणार आहे. धनधान्यांची कमतरता तीव्रतेने जाणवणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -