घरसंपादकीयअग्रलेखराष्ट्रवादीचे दबावतंत्र!

राष्ट्रवादीचे दबावतंत्र!

Subscribe

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. त्याला सध्या पूर्णविराम मिळाला आहे. त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच असेल असं जाहीर करावं लागलं असून उद्धव ठाकरेच भावी मुख्यमंत्री असतील या घोषणेला आवर घालण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. राष्ट्रवादीच्या खेळीने उद्धव ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाला ब्रेक लागला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सर्वात मोठा फटका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला बसला. भाजपने एकनाथ शिंदेंच्या खांद्यावरून नेम धरून शिवसेनेचा गेम केला.

भाजपचं एवढ्यावरच समाधान झालं नाही. त्यांनी थेट शिवसेना ठाकरे परिवाराच्या हातातून हिसकावून घेतली. एकीकडे, पक्षात सुरू असलेली फूट रोखण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरत होते. दुसरीकडे, भाजपने शिवसेनेचा बुरुजच ढासळवला. अमित शहा यांनी स्वतः जातीने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे. ठाकरे गटाला कसंही करून नेस्तनाबूत करायचंच असा विडा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी उचलला आहे. त्यासाठी हरप्रकारचे प्रयत्न केले जात असून शिंदे गटाच्या माध्यमातून ठाकरे गटाला हादरे दिले जात आहेत. रविवारी अमित शहा एका लग्नसमारंभासाठी मुंबईत आले होते, मात्र यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. बैठकीत राज्यातील आगामी सर्व निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढवल्या जातील, असे आश्वासन अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती आहे.

- Advertisement -

एकाकी लढत देत असलेले उद्धव ठाकरे भाजपविरोधात आक्रमक मोडमध्ये आले आहेत. नव्या पक्षाला नव्या दमाच्या कार्यकर्त्यांसह जे काही उरले सुरले नेते आहेत त्यांच्या मदतीने उद्धव ठाकरे पुन्हा उभारी देण्याच्या कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे महासंकटात असताना महाविकास आघाडीचे घटक पक्ष सहानुभूती पलीकडे फारशी मदत करताना दिसत नाहीत. काँग्रेसची राज्यातील अवस्था दयनीय आहे. त्यांच्यातील नेत्यांमध्ये आपापसात फारसे चांगले संबंध नाहीत. काँग्रेसमधील कलगुतीरा सुरूच आहे. त्यामुळे काँग्रेस वाढीला खीळ बसली आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंची शिवसेना कमकुमवत झाल्याचा फायदा राष्ट्रवादीकडून उठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रवादीला महाराष्ट्रात नंबर वन व्हायचं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाची अवस्था लक्षात घेत राष्ट्रवादीकडून दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असून भाजपसोबत जाण्याची शक्यता असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेरल्या जात आहेत. राष्ट्रवादीविना महाविकास आघाडी भाजपला आव्हान देईल, अशी स्थिती नाही. ही पुरेपूर जाणीव असल्याने राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण केली जात असल्याची शंका आहे. काँग्रेस आणि ठाकरे गट संपला तर राष्ट्रवादी राज्यात मजबुतीने उभी राहील याचं गणित राष्ट्रवादीकडून बांधलं गेलं आहे.

- Advertisement -

दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाकरे गटाकडून भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील असा दावा गेल्या दीड-दोन महिन्यांपासून केला जात आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे, पण काँग्रेस ठाकरे गटाला थेट आव्हान देईल इतक्या ताकदीची उरलेली नाही. राष्ट्रवादीला मात्र स्वतःचा मुख्यमंत्री करायचा आहे. त्यासाठी अजित पवार भाजपसोबत जातील, असा पद्धतशीरपणे प्रचार केला जात असल्याची शंका आहे. त्यात उद्धव ठाकरेंची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची मनीषा राष्ट्रवादीला अडसर ठरण्याची भीती वाटत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून वज्रमूठ सभेचं नेतृत्व स्वत: करत असल्याचं चित्र उभं केलं जात आहे.

औरंगाबादच्या वज्रमूठ सभेत व्यासपीठावर उद्धव ठाकरेंसाठी अगदी वेगळी खुर्ची ठेवल्यावरून महाविकास आघाडीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे नंतरच्या वज्रमूठ सभांमध्ये सर्वच नेत्यांना समान खुर्च्या लावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे भावी मुख्यमंत्री असतील या घोषणा ठाकरे गटाला बंद करणं भाग पडलं. त्यासाठी अजित पवार यांच्या तथाकथित बंडखोरीचं भूत उभं करण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात उघडपणे वादविवाद सुरू झाले आहेत. दोघेही एकमेकांना खडे बोल सुनावत आहेत. त्यात अजित पवार यांची सरशी झाली आहे.

गेले काही दिवस उद्धव ठाकरेच भावी मुख्यमंत्री असतील असं वारंवार सांगत असलेल्या संजय राऊत यांना नमतेपणा घेत भावी मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा असेल, असं सांगावं लागत आहे. अजित पवार कोणतीही भूमिका शरद पवार यांच्याच सल्ल्याने घेतात, यात तिळमात्र शंका नाही. अजित पवार यांनी फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतल्यामागे शरद पवारच होते, असा गौप्यस्फोट काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याच पवारांनी आपल्या शैलीत खंडन केलं होतं. तसं झालं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली नसती, असं सांगत पवारांनी अप्रत्यक्षरित्या पहाटेच्या शपथविधीचं समर्थन केलं होतं. एकंदरीत उद्धव ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाला राष्ट्रवादीने ब्रेक लावला आहे. त्यासाठीच गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचं दबाबतंत्र सुरू होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -