घरसंपादकीयअग्रलेखमोदीच मोदी चहुकडे !

मोदीच मोदी चहुकडे !

Subscribe

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या विविध टप्प्यांमध्ये मतदान सुरू झालेले आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असल्यामुळे तिथे होणारी विधानसभा निवडणूक ही मोदींसाठी प्रतिष्ठेची असते. कारण याच गुजरातमध्ये मोदींनी मुख्यमंत्रीपदाची हॅट्ट्रिक केली होती. तिथूनच त्यांचा पंतप्रधान बनण्याचा मार्ग प्रशस्त झाला होता. त्यामुळे गुजरातची विधानसभा निवडणूक मोदींसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठीच ते सध्या गुजरात विधानसभेच्या रणमैदानात उतरले आहेत. गुजरातमध्ये निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या सर्व्हेमध्ये भाजपचे पारडे जड दिसत होते, पण जनमत चाचण्यांवर विसंबून राहिले तर ऐनवेळी घोळ व्हायचा म्हणून मोदी स्वत: काळजी घेत आहेत. गुजरातमधील निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये असलेल्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग सोमनाथाची यथासांग पूजा केली. त्याला प्रसारमाध्यमांमधून सर्व मंगल विधींसह प्रसिद्धी देण्यात आली. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वत: पंतप्रधानांनी सोमनाथाची यथासांग पूजा करण्यातून बरेच अर्थ निघत आहेत.

जेव्हा माणसाला कुठल्याही गोष्टीबाबत अनिश्चितता जास्त सतावत असते, तेव्हा तो जास्त दैववादी बनतो. कारण अनिश्चिततेमुळे मनात निर्माण होणारी पोकळी भरून काढण्यासाठी त्याला दैवी शक्तीची गरज असते. नरेंद्र मोदी जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवतात तेव्हा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असतो. २०१४ साली त्यांनी जेव्हा लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा भाजपला बहुमत मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसव्यतिरिक्त एखाद्या अन्य पक्षाला बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. पुढे २०१९ची लोकसभा निवडणूक झाली तेव्हा मोदींना लोकांनी पुन्हा पसंती देऊन मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळाल्या. मोदींना लोकसभा निवडणुकीत यश मिळते, पण त्यांच्या प्रभावाचा थेट परिणाम विधानसभा निवडणुकांमध्ये हवा तसा पडताना दिसत नाही. कारण विधानसभा पातळीवर राज्यात भाजपला प्रभावी चेहरा सापडत नाही. त्याला मध्य प्रदेशसारखे काही तुरळक अपवाद आहेत. त्यामुळे भाजपला राज्य पातळीवर काहीतरी जोडतोड करून सत्ता आणावी लागते.

- Advertisement -

इंदिरा गांधी या त्यांच्या काळात लोकप्रिय पंतप्रधान होत्या, पण विधानसभा पातळीवर आज जशी पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींना मेहनत घ्यावी लागते, तशी त्यांना घ्यावी लागली नाही. आम आदमी पक्षाने अन्य राज्यांमध्ये आपला जलवा दाखवायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी मोदींना पहिला धक्का दिल्लीत दिला होता. कारण त्यावेळी मोदींची मोठी लाट असतानाही दिल्लीत त्यांनी केलेल्या प्रचाराचा उपयोग झाला नव्हता. आपला सुपर डुपर बहुमत मिळाले होते. त्यानंतर काहीही आसभास नसताना दिल्लीच्या बाजूला असलेल्या पंजाबमध्ये आपने आपली जादू दाखवली. काँग्रेस आणि भाजपला बाजूला सारत त्यांनी आपला मुख्यमंत्री बसवला. हाच आप आता गुजरातमध्ये उतरला आहे. पंजाबमध्ये त्यांनी आपली जादू दाखवली होती. कारण आता मतदारांना बदल हवा आहे. आपकडे नव्या संकल्पना आहेत. त्या लोकांना भुरळ घालत आहेत. यामुळेच लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे. दिल्ली आणि पंजाबची पुनरावृत्ती गुजरातमध्ये होईल की काय, ही शक्यता धुसर असली तरी ती नाकारता येत नाही.

सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपची मदार ही नरेंद्र मोदींवर असते. त्यामुळे निवडणूक कुठलीही असो, मोदींना मैदानात उतरावेच लागते. गुजरातमध्ये मोदी तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. त्यामुळेच त्यांना देशपातळीवर पाठवले तर ते भाजपचे भवितव्य उज्ज्वल करतील, असे वाटणारा भाजपमध्ये एक वर्ग होता. त्यामुळे मोदी राष्ट्रीय पातळीवर आले, पण जेव्हा पाच वर्षांपूर्वी गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक झाली, तेव्हा सरकारविरोधी मतदान होईल याची शक्यता बळावली होती. पुढे ती भीती प्रत्यक्षात उतरली. कारण सलग तीन वर्षे भाजपची गुजरातमध्ये सत्ता होती. काँग्रेस नाममात्र उरली होती, पण जेव्हा राहुल गांधी यांनी गुजरातमधील विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले तेव्हा त्याचा काही फारसा उपयोग होईल असे वाटत नव्हते, पण पुढे त्यांना गुजरातमधील देव पावले असेच म्हणण्याची वेळ आली.

- Advertisement -

कारण भाजपने भाजपशासित विविध राज्यांमधील मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार गुजरातच्या मैदानात उतरवूनही भाजपने मोठ्या मेहनतीने बहुमताची रेषा कशीबशी पार केली, तर काँग्रेस बहुमतापासून अगदी काही अंतर मागे राहिली. तो भाजपच्या नेत्यांसाठी आणि प्रत्यक्ष मोदींसाठी आश्चर्याचा मोठा धक्का होता. त्यामुळेच यावेळी मोदींनी काळजी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही कामाला लावले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन त्यांनी भारत जोडो यात्रा चार दिवस थांबवून गुजरातमधील काँग्रेसच्या प्रचारात भाग घेतला, पण यावेळी काँग्रेसच्या प्रचाराची मुख्य जबाबदारी काँग्रेसचे नव्याने निवडून आलेले राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे दिलेली आहे.

पंतप्रधानपदावर असलेले नरेंद्र मोदी हे गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत सर्वशक्तीनिशी उतरले आहेत. मोदी हे पंतप्रधान असले तरी ते सगळ्या पातळ्यांवरील छोट्या मोठ्या निवडणुकांच्या प्रचारात उतरत असतात. त्यावरून अहमदाबादमधील बेहरामपुरा येथे प्रचार सभेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींवर टीका करताना खोचक प्रश्न विचारला, तुम्ही शंभर तोंडाचे रावण आहात का, कारण मोदी सगळीकडे दिसतात. महापालिकेच्या निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत, सगळ्याच निवडणुकीत मोदींचा चेहरा पुढे केला जातो. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या नावे मत मागा, पालिकेत गरज लागली तर मोदी काम करायला येणार आहेत का, असा सवाल खर्गे यांनी केला होता. त्यांची ही टीका मोदींना चांगलीच लागली असणार यात शंकाच नाही.

कारण सगळ्याच ठिकाणी निवडणुकांच्या प्रचारासाठी आपल्यालाच उतरावे लागते याची मोदींना कल्पना आहे. त्यामुळे मोदींनी खर्गे यांच्या रावण टीकेला उत्तर दिले. मी खर्गे यांचा सन्मान करतो, पण हे रामभक्तांचे गुजरात आहे हे काँग्रेसला माहीत नाही. रामभक्तांच्या या भूमीवर खर्गे यांना ‘१०० तोंडाचे रावण’ म्हणण्यास सांगण्यात आले. कारण काँग्रेसला रामाचे अस्तित्व मान्य नाही. अयोध्येतील राम मंदिरावर त्यांचा विश्वास नाही हे आम्हाला माहीत आहे. त्यांना राम सेतूचीही समस्या आहे. आता काँग्रेसने रामायणातून रावण आणला आहे, असा हल्लाबोल मोदींनी खर्गे यांच्यावर केला. हा हल्लाबोल केला असला तरी भाजप आणि मोदी यांना सत्य लपवता येणार नाही. कारण प्रत्येक ठिकाणी भाजपला मोदींना उतरवावे लागते. प्रादेशिक पातळीवर त्यांना सक्षम नेतृत्व उभे करता आलेले नाही. तिथे त्यांना तोडफोड करून सत्ता आणावी लागते. महाराष्ट्र हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -