घरसंपादकीयअग्रलेखमुंबईकरांसाठी मोदींचा दौरा फलदायी

मुंबईकरांसाठी मोदींचा दौरा फलदायी

Subscribe

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा मुंबईकरांसाठी निश्चितच फलदायी ठरणार आहे. हा दौरा राजकीय हेतूने प्रेरित आहे हे उघड असले तरी त्यातून मुंबईकरांच्या पदरी बर्‍याच सकारात्मक गोष्टी पडणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबईकरांचा जो खडतर प्रवास सुरू आहे तो प्रवास काही प्रमाणात का होईना सुकर होण्यासाठी हा दौरा फलदायी ठरेल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे राजकीय दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच हातात पंचवार्षिक संपेपर्यंतचे सरकार असेल असे स्पष्ट करीत मोदींनी ‘सरकार पडेल’ किंवा ‘भाजपकडूनच सरकार पाडले जाईल’ अशी चर्चा करणार्‍यांना लगाम घातला आहे. मोदींच्या दौर्‍यापूर्वी शिंदे गट आणि भाजपमध्ये थोड्याफार कुरबुरी असल्या तरी त्या दौर्‍यानंतर बर्‍यापैकी कमी होतील अशी आशा या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये वाढली आहे.

त्यामुळे ‘मियां बीबी राजी तो क्या करेगा काझी’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. परिणामी आता विरोधकांसमोर नवीन मुद्दे शोधून काढण्याचे आव्हान असेल हे नक्की. मुंबईत आज सर्वाधिक गंभीर समस्या आहे ती वाहतुकीची. रस्त्यांवरील वर्दळीतून वाट काढत पुढे जाताना मुंबईकरांची रोजच त्रेधातिरपीट उडते. दुसरीकडे लोकलच्या क्षमतेपेक्षाही रोजचे प्रवासी अधिक असल्याने लोकलमध्येही प्रवास सुखकर होत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी मेट्रो रेल्वे मार्गिका २ अ आणि ७ चे लोकार्पण करण्यात आले. मुंबईकरांच्या दृष्टीने ही अतिशय स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल. मोदींच्याच दौर्‍यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे हेरिटेज नोडच्या ठिकाणी सध्या दिसत असलेली गर्दी कमी होणार आहे.

- Advertisement -

वाहतुकीच्या खोळंब्याबरोबरच मुंबईकरांना रोजच सामोरे जावे लागते अशी एक समस्या आहे, ती म्हणजे रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांची. महापालिकेने तात्पुरती डागडुजी करून हे खड्डे बुजवले असले तरी अधूनमधून ते उखडले जातच आहेत. शिवाय पुढील पावसाळ्यात पुन्हा एकदा खड्ड्यांच्या समस्येला मुंबईकरांना तोंड द्यावे लागेल अशीच परिस्थिती आहे. ही बाब लक्षात घेत मुंबईतील सुमारे ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामांचे भूमिपूजन मोदींच्या दौर्‍यात करण्यात आले. या काँक्रिटीकरणामुळे मुंबई खड्डेमुक्त होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत शहर भागात ७२ किलोमीटरचे, पूर्व उपनगरात ७१ किलोमीटरचे, तर पश्चिम उपनगरात २५४ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे डांबरीकरण केलेले रस्ते एक-दोन वर्षातच उखडून जातात.

किंबहुना हे रस्ते उखडतील अशीच व्यवस्था ते तयार करताना ठेकेदाराकडून केली जाते. जेणेकरून त्यांच्या दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा कोट्यवधींचा निधी लाटता येईल. शिवाय डांबरीकरणाच्या नावाने वरपली जाणारी टक्केवारी ही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील काही अधिकार्‍यांना गलेलठ्ठ करीत असते. त्यावर रामबाण उपाय म्हणजे काँक्रिटीकरण. काँक्रिटीकरणाचे रस्ते ३०-४० वर्षे जसेच्या तसेच राहतात हा अनेक शहरांचा अनुभव आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीसाठी लागणारा खर्चही या माध्यमातून वाचणार आहे. शिवाय डांबरीकरणातून होणार्‍या भ्रष्टाचारालाही चाप बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात ‘काँक्रिटीकरणामुळे डांबरीकरणाच्या नावाखाली काळे-पांढरे करणार्‍यांची दुकाने बंद होतील,’ असा टोला लगावला.

- Advertisement -

याशिवाय वरळी, वांद्रे, वर्सोवा, धारावी, मालाड, भांडूप, घाटकोपर या भागात दररोज २ हजार ४६४ दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्‍या १७ हजार कोटींच्या ७ प्रकल्पांचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या या प्रकल्पांची पायाभरणी उशिरा का होईना झाली ही समाधानाची बाब म्हणावी. या प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणार्‍या बायोगॅसपासून वीजनिर्मितीही केली जाणार आहे हे विशेष. आर्थिकदृष्ठ्या गरीब आणि सर्वसामान्य परिस्थितीतील रुग्णांना सध्या खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी होणारा खर्च परवडणारा नाही. सरकारी दवाखान्यांची संख्या कमी आहे. ही बाब लक्षात घेत २० नव्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यां’चे लोकार्पण करण्यात आले. यात वैद्यकीय सेवा पूर्णत: मोफत पुरवली जाणार असल्याने गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना खर्‍या अर्थाने दिलासा मिळणार आहे.

एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा हा केवळ भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांनाच बूस्ट देणारा ठरला असे नाही, तर सर्वसामान्य मुंबईकरांनाही विकासाचे स्वप्न दाखवणारा ठरला. हे स्वप्न सत्यात उतरले तर मुंबईकरही सत्ताधार्‍यांना डोक्यावर घेतील हेच खरे. मोदींच्या या दौर्‍यानिमित्त भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यासाठी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. दक्षिणी राज्यांमध्ये अभिनेत्यांचे कटआऊट लावतात, तितके मोदींचे भव्य कटआऊट मुख्य चौकांमध्ये मुंबईकरांना प्रथमच पाहायला मिळाले. थोडक्यात मुंबई मोदीमय करण्यात भाजप यशस्वी झाले असले तरी या दौर्‍याच्या माध्यमातून मुंबईच गुजरातला पळवून नेण्याचा डाव तर नाही ना, अशी भयशंकाही मुंबईकरांना डाचली नसेल तरच नवल. कारण यापूर्वीचा अनुभव बघता मोदींनी महाराष्ट्राची शान असलेल्या मुंबईकरिता तसे फार देदीप्यमान काम केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचे मोठे आव्हान निवडणुकीपूर्वी भाजपसमोर असेल इतकेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -