Eco friendly bappa Competition
घर संपादकीय अग्रलेख संभ्रमाचा भोपळा!

संभ्रमाचा भोपळा!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राष्ट्रवादीत फूट पडल्याचे जाहीररित्या नाकारले. अजित पवार आमचे नेते आहेत, पक्षात फूट पडलेली नाही, या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याला शरद पवार यांनी दुजोरा दिला. लोकशाहीत कुठल्याही पक्षाचे नेते वेगळी भूमिका घेऊ शकतात. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आहे, त्याला फूट म्हणता येणार नाही. अशी अजब प्रतिक्रिया शरद पवार यांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तर पुढे सातार्‍यात बोलताना आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला. पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी दिली होती. आता अजित पवार यांना मागूनही पुन्हा संधी मिळणार नाही, अशा शब्दात शरद पवारांनी ठणकावले. मागील दोन दिवसांपासून बापलेकीच्या वक्तव्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेते, पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट 2 जुलै 2023 रोजी फुटून भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत दाखल झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी या महायुतीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेऊन आता 2 महिने उलटतील. या दोन महिन्यांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. महायुतीत सामील होण्याआधी अजित पवार यांनी कुणालाही ताकास तूर लागू न देता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता आणि ३० जूनला ४० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासह संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावरच दावा केला होता. शिवसेना फुटीच्यावेळी शिंदे गटाकडून जी मोडस ऑपरेंडी वापरली तीच वापण्यात आली. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांनाच खुले आव्हान दिले. याला पक्षातील फूट म्हणायचे नाही, तर दुसरे काय म्हणायचे.

ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग अशा एक ना अनेक केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागल्याने राष्ट्रवादीचे नेते भयभीत झाले होते. त्यांच्या सांगण्यावरून अजितदादांनी शरद पवारांशी भाजपसोबत जाण्याच्या पर्यायावर चर्चाही केल्याचे समोर आले होते. परंतु शरद पवारांनी नकार दिला. त्यामुळे अजितदादांसह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचा हिरमोड झाला. तरीही अजितदादांनी हार न मानता पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत भेटीगाठी सुरूच ठेवल्या होत्या. याच दरम्यान पहाटेच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण? या विषयावर चर्चा छेडून, स्वत:चा राजीनामा स्वत:च नाकारून शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा एकदा तोंडघशी पाडले. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोपाळच्या भाषणात राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. दुसर्‍याच दिवशी दादा गट महायुतात सामील झाला. पक्ष फुटीनंतर या चिमण्यांनो परत फिरा रे…अशी साद घालण्याऐवजी कार्यकारिणीची बैठक बोलावून दोन्ही गटांनी आपापली शक्ती आजमावली. निष्ठावंताच्या खेळीयाडात अजितदादांच्या मागे 35 हून अधिक आमदार असल्याचे स्पष्ट झाल्याने शरद पवार चितपट झाले. वांद्य्रातील पक्षाच्या मेळाव्यात अजित पावरांनी थेट मुद्यालाच हात घातला. मला लोकांसमोर व्हिलन का केले जाते? वय जास्त झाले, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असे प्रश्न उपस्थित करत शरद पवारांना स्पष्ट शब्दात घरी बसण्याचा सल्ला दिला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाण्याचे आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाडांवर शाद्बिक बाण चालवले. सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा घाट घालण्यात आल्याचा दावा करून मनातली खदखदही व्यक्त केली. तर पलिकडच्या सभेतून सुप्रिया सुळेंनी सगळं काही खपवून घेईन, पण बापाचा नाद करायचा नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.

- Advertisement -

पक्ष फुटलाच नव्हता तर एका पक्षाच्या कार्यकारिणीच्या दोन सभा का झाल्या? आमदार दोन गटांत का विभागले गेले. शरद पवार गटाकडून अजितदादांसह इतर 8 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तरीही अजितदादा तुमचे नेते ठरतात. पावसाळी अधिवेशना दरम्यान विधानसभा अध्यक्षांकडे आम्हीच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, असे दावे दोन्ही गटांनी केले, एकमेकांविरोधात व्हिप बजावले. एका गटाने इंडिया आघाडीत राहून भाजपला विरोध करायचा अणि दुसर्‍या गटाने भाजपसोबत सत्तेत राहून सत्तेची मलाई खावी हे तांत्रिकदृष्ट्या तरी शक्य आहे का? अख्खा पक्ष विचारधारेच्या विरोधात जाऊन सत्तेत बसतो, दुसर्‍या गटातील एकही आमदार पक्षाध्यक्षांच्या सूचना ऐकत नाही आणि पक्षात फूट झाली नाही असे पवार बापलेक म्हणतात. असेच असेल तर पक्षाध्यक्ष या नात्याने पवारांनी आदेश दिल्यास अजितदादा गटातील 9 आमदार वगळून इतर 30 हून अधिक आमदार त्यांच्या बैठकीला येतील काय? याचा तरी त्यांनी खुलासा करावा. पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली या न्यायाने विचार केल्यास देशाच्या राजकीय इतिहासात कुठल्याही पक्षात फूट पडलेली नाही, असेच म्हणावे लागेल. आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत कुणावरही कारवाई न करता दोन्ही दगडांवर पाय ठेवून राजकारण करण्याची पवारांची ही तशी जुनीच खेळी आहे. तरीही सध्या ते स्वत:च एका संभ्रमावस्थेतून जात असावेत. परंतु जनता सुज्ञ आहे. ही जनताच तुमच्या संभ्रमाचा भोपळा एक ना एक दिवस फोडल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

 

- Advertisement -

 

- Advertisment -