शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळासमोरच शिवसैनिक शिवसैनिकाला भिडल्याचे दयनीय दृश्य बघायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिक शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन गटांत विभागले गेले आहेत. शिवसेनेतील फुटीपासून ते आजपर्यंत शिवसैनिक अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकलेत. मुख्यत्वेकरून शिवसेना शाखा ताब्यात घेण्यासाठी दोस्ती-यारी सर्वकाही विसरलेत. अनेक वर्षे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या शिवसैनिकांची हमरीतुमरीपासून एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंतची मजल गेल्याचे वेळोवेळी दिसले आहे. अगदी गेल्या आठवड्याचीच गोष्ट.
मुंब्य्रातील ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शिवसेना शाखा अनधिकृत ठरवून तिच्यावर आधी बुलडोझर फिरवण्यात आला आणि नंतर त्याच जागी कंटेनर ठेवून त्यात नवी शिवसेना शाखा सुरू करण्यात आली. अर्थातच या कंटेनर शिवसेना शाखेवर शिंदे गटातील शिवसैनिकांचा ताबा आहे. ही जागा बघायला थेट मुंब्य्रात गेलेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिंदे गटातील शिवसैनिकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. ठाकरे गटाने लावलेले बॅनर शिंदे गटाकडून फाडण्यात आले, उद्धव ठाकरेंविरोधात नारेबाजीही करण्यात आली, परिस्थिती चिघळत असल्याचे बघून पोलिसांनी बॅरिकेट्स लाऊन उद्धव ठाकरेंना अर्ध्या रस्त्यातूनच माघारी पाठवले. या घटनेचे पडसाद उमटले नसते, तरच नवल.
शिवसैनिकांसाठी राडा हा शब्द काही नवीन नाही. किंबहुना, महाराष्ट्राच्या राजकारणात राडा संस्कृती रूजवण्यात शिवसैनिकांचा हात दुसरा कुणीही पकडू शकणार नाही. मनसेचे खळ्ळ खट्याक हे दुसरे तिसरे काही नसून याच राडा संस्कृतीचे अपडेटेड व्हर्जन म्हणावे लागेल. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिला की, हातात जे काही मिळेल किंवा नाही मिळाले तरी दुकानांचे शटर खाली उतरलेच म्हणून समजा. बाळासाहेबांच्या एका शब्दावर आणि शिवसैनिकांच्या मनगटाच्या जोरावर मुंबईसह कुठलेही शहर क्षणार्धात थांबायचे. कुणीही अंगावर आले तर शिंगावर घ्यायची तयारी ठेवून असलेल्या शिवसैनिकांनी याच राडा संस्कृतीच्या जोरावर असंख्य गरजूंना न्याय मिळवून दिला.
काँग्रेस वा समाजवाद्यांसोबत झालेल्या शिवसैनिकांच्या राड्याच्या असंख्य आख्यायिका आहेत. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटानंतर उसळलेल्या दंगलीत हेच शिवसैनिक मराठी माणसांसाठी ढाल बनून उभे होते. शिवसेना शाखा या कधीकाळी न्याय निवाड्याचे, दाद-फिर्यादीचे केंद्र होती हे विसरता येणार नाही. बाळासाहेबांनंतर पक्षाची धुरा उद्धव ठाकरेंकडे आल्यानंतर नाही म्हटले तरी मागील दशकभरात शिवसेनेच्या मूळ स्वभाव प्रकृतीत झालेले बदल अनेकांनी अनुभवले. राडा संस्कृती मागे पडून सर्वसमावेशक सत्ताकारण प्राधान्यक्रमावर आले. काहींना हे बदल रुचले, तर काहींनी आधी राज ठाकरे आणि काहींनी अलीकडे पक्षातील फुटीनंतर शिंदे गटाची वाट धरून नवे नेतृत्व शोधले.
१७ नोव्हेंबर हा बाळासाहेबांचा स्मृतिदिन असल्याने या दिवशी त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून असंख्य शिवसैनिक दरवर्षी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर येतात. शिवसेनेतील फुटीनंतर बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करणार्या दोन्ही गटातील नेत्यांसाठी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळासमोर नतमस्तक होणे ही अतिव श्रद्धेची बाब बनली आहे. त्यानुसार वाद टाळण्याच्या नावाखाली स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील नेते, पदाधिकारी आणि इतर लवाजम्यासह शिवाजी पार्कात पोहोचले. मुख्यमंत्री असल्याने प्रोटोकॉलनुसार त्यांच्या सेवेत स्थानिक पोलिसांचा चोख बंदोबस्त तर होताच. शिवाय शिवाजी पार्क ज्या विधानसभा मतदारसंघात येते, त्या मतदारसंघाचे शिंदे गटातील स्थानिक आमदार सदा सरवणकर, खासदार राहुल शेवाळे यांच्यासोबत शिंदे गटातील शिवसैनिकांची फौजही होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊन गेल्यावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अॅड. अनिल परब, खासदार अनिल देसाई आपल्या शिवसैनिकांना घेऊन शिवाजी पार्कात हजर झाले. यावेळी शिंदे गटाच्या आरोपांनुसार ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृतिस्थळाचे गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केल्यावर वादाला सुरुवात झाली. यावेळी मुंब्य्रात उद्धव ठाकरेंना अडवण्यात पुढे असलेले शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, आमदार सदा सरवणकर आणि शितल म्हात्रे तेथे उपस्थित होते. त्यांना पाहून खवळलेल्या ठाकरे गटाच्या आणि शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये वादावादी सुरू झाली. यानंतर घोषणाबाजी आणि पुढे धक्काबुक्की सुरू झाली. घोषणाबाजी करत कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांच्या नेत्यांना एकमेकांपासून दूर नेले. तरीही ठाकरे गट आणि शिंदे गटातील शिवसैनिक स्मृतिस्थळावरून हटण्यास तयार नव्हते. या धक्काबुक्कीत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर असलेल्या लोखंडी रेलिंगचीही मोडतोड झाली. काही शिवसैनिक रस्त्यावरही एकमेकांना भिडले. सुदैवाने स्थानिक पोलिसांनी राज्य राखीव दलाची अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या राड्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर बाळासाहेबांचे विचार आणि संस्कार विसरल्याचा जोरदार आरोप केला. या दोन्ही गटातील नेत्यांचे दावे ऐकून एकेकाळी राडा संस्कृतीच्या जोरावर राज्यात पक्षाची पाळेमुळे मजबूत केलेल्या कडवट शिवसैनिकांनी तसेच सध्याच्या राजकारणात आपापला गट धरून सत्ताकारणाची स्वप्ने बघणार्या ताज्या दमाच्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे विचार आणि संस्कारांची उजळणी करत अंतर्मुख होण्याची गरज आहे.