घरसंपादकीयअग्रलेखदोन हजारांच्या नोटांचा पाऊस!

दोन हजारांच्या नोटांचा पाऊस!

Subscribe

पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नागरिकांना मोठा धक्का देत दोन हजारांच्या नोटा सप्टेंबर अखेरपासून चलनातून बंद करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. आज अचानक बाजारात दोन हजारांच्या नोटा ‘अवतरत’ आहेत. कुठलीही छोटी-मोठी वस्तू घेण्यासाठी दोन हजारांची नोट बाहेर काढली जाते. अशा नोटा मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाल्याने व्यावसायिकांमध्ये सुट्या पैशांची अडचण निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा तसेच, त्या बदलून घेण्याचा पर्याय दिलेला आहे. मोठ्या खरेदीसाठी या नोटांचा पर्याय सुलभ वाटत असल्याने बहुतांश नागरिकांकडून सराफी पेढ्या, पेट्रोलपंपाबरोबरच किराणा, मेडिकलसह इतर व्यावसायिकांकडे नोटा खपविण्यात येत आहेत.

इतकेच नाही तर लवकरच शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याने अनेक पालकांकडून वह्या-पुस्तके व स्टेशनरी खरेदीसाठीही दोन हजारांच्या नोटा कटविण्याची शक्कल लढवली जात आहे. या सर्व प्रकारात रोख व्यवहारांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे दुकानदार-व्यावसायिकांची मात्र कोंडी झाली आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी काही व्यावसायिकांनी तर चक्क दुकानात, पेट्रोल पंपांवर फलक लावले आहेत. खरे तर नागरिकांकडून भीतीपोटी नोटा खपविण्यावर भर दिला जातो आहे. अर्थात या नोटा न स्वीकारणे हा देखील गुन्हा ठरु शकतो. शिवाय आरबीआयनेदेखील आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, दोन हजार रुपयांची नोट सध्या पूर्णपणे वैध आहे. तुम्ही खरेदी, व्यवहार यासाठी या नोटा वापरू शकता. असे असतानाही काही फायनान्स कंपन्या दोन हजारांच्या नोटा नाकारत आहेत, हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरत आहे.

- Advertisement -

या कार्पोरेट कंपन्या वरिष्ठांच्या तोंडी आदेशाचे दाखले देत नोटा नाकारताना दिसत आहेत. अशा कंपन्यांनादेखील तातडीने लगाम लावायला हवा. अर्थात आरबीआयच्या आदेशाचा गैरफायदाही काही व्यापार्‍यांकडून घेतला जात आहे. विशेषत: बाजार समित्यांमध्ये शेतीमाल खरेदी केल्यानंतर शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांच्या नोटा देऊन व्यवहार पूर्ण करण्याचा काही व्यापार्‍यांनी सपाटा लावला आहे. अचानक या नोटा कुठून येत आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दडवून ठेवलेल्या नोटा आता व्यवहार पूर्ण करताना काही व्यापार्‍यांकडून माथी मारल्या जात आहेत, अशी ओरड शेतकर्‍यांमधून होत आहे. शेतीमालाचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. असे असताना आता खरिपाच्या तोंडावर भांडवल व आनुषंगिक खर्चासाठी शेतीमाल विक्री होत आहे. मात्र व्यापारी देयके अदा करताना सर्रासपणे २ हजारांच्या नोटा देत आहेत.

मात्र शेतकर्‍यांनी नकार दिल्यानंतर काही ठिकाणी बाचाबाची झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांना ३ ते ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम देताना दोन हजार रुपयांच्या नोटा देण्यात आल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. आणखी एक बाब म्हणजे बँकेतही नोटा बदलण्यासाठी गर्दी होत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी आरबीआयने बँकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत. नोटा बदलण्यासाठी बँकेत आलेल्या लोकांना कमीत कमी त्रास व्हावा आणि त्यांच्या नोटा बदलून किंवा जमा करता याव्यात यासाठी पुरेशी तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरबीआयच्या निर्देशांनुसार, कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन विहित मर्यादेत दोन हजार रुपयांची नोट बदलू शकते. अर्थात नोट बदलीची प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आतापासूनच बँकांमध्ये गर्दी करणे संयुक्तिक होणार नाही.

- Advertisement -

बँकांमध्ये नोटा बदलण्याची व्यवस्था करण्याचे आदेश असताना काही नागरिक पोस्टातही नोटा बदलून मिळण्यासाठी आग्रही असतात. मुदत ठेव आणि तत्सम सेवा पोस्टातही सुरू असल्याने अनेकांना बँक आणि पोस्ट यांमधील फरक लक्षात येताना दिसत नाही. वास्तविक, रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, दोन हजार रुपयांची नोट फक्त बँका आणि आरबीआयच्या १९ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये (आरओ) बदलली जाऊ शकते. यामध्ये पोस्ट ऑफिसचा उल्लेख नाही. याचा अर्थ पोस्ट ऑफिसमध्ये नोट बदलण्याची सेवा उपलब्ध नाही. पण पोस्ट ऑफिस खात्यात दोन हजार रुपयांच्या नोटा नक्कीच जमा होऊ शकतात.

कारण मागे म्हटल्याप्रमाणे ही नोट लीगल टेंडर आहे. म्हणूनच ते घेण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. मात्र, ज्या पोस्ट ऑफिस खातेदाराने नोट जमा केली आहे, त्याच्या खात्याची केवायसी असणे आवश्यक आहे. या नोटा बदलण्याच्या प्रक्रियेमुळे सर्वसामान्यांची काही प्रमाणात अडचण झाली असली तरी खरी अडचण मात्र नोटांची साठवणूक करणार्‍या राजकारण्यांची झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी कोट्यवधींचा काळा पैसा बाजूला काढून ठेवण्यात आला. हा पैसा कमी जागेत लपवता यावा म्हणून दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आलेला आहे. मात्र अचानक या नोटा बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतल्याने आता बाजारात दोन हजारांच्या नोटांचा पाऊस पडताना दिसत आहे. या साठेबाजीला यापुढे कायमस्वरुपी लगाम घालायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -