Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय अग्रलेख बुडत्या बोटीतील राजकीय यादवी

बुडत्या बोटीतील राजकीय यादवी

Subscribe

आर्थिकदृष्ठ्या पाकिस्तान दिवसेंदिवस ढेपाळत चालला आहे. आपला हा शेजारील देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. महागाईने तर उच्चांक गाठला आहे. घरातील नित्योपयोगाच्या वस्तू खरेदी करणेदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. जनता अशी रोजीरोटीसाठी झगडत असताना पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेचे महानाट्य मंगळवारी पाकिस्तानात घडले. इस्लामाबादला उच्च न्यायालयात बायोमेट्रिक तपासणी प्रक्रियेतून जात असताना पाक रेंजर्सने त्या खोलीच्या काचा फोडून आणि दरवाजा तोडून आत घुसत माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केली. त्यांची अक्षरश: गचांडी धरली आणि गाडीत नेऊन बसवले. देशाच्या माजी पंतप्रधानांना अशी वागणूक केवळ पाकिस्तानातच मिळू शकते.

इम्रान खान यांची अटक अल कादिर ट्रस्ट विद्यापीठाशी संबंधित आहे. वस्तुत: इम्रान खान यांच्या नावावर अनेक घोटाळे आहेत. तेथील राजकारण्यांपासून सैन्यातील उच्चाधिकार्‍यांपर्यंत सर्वच भ्रष्टाचारात बरबटलेले आहेत. तोशखाना प्रकरण हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. या प्रकरणात इम्रान खान यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या कायद्यानुसार परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी म्हणजेच तोशखान्यात ठेवावी लागते. पाकिस्तान सरकारने २००२ पासून तोशखान्यामध्ये ठेवलेल्या भेटवस्तू आणि त्यांच्या लिलावाच्या सर्व नोंदी सार्वजनिक केल्यावर इम्रान खानच नव्हे तर इतर अनेक बड्या राजकारण्यांसह उच्चपदस्थ सरकारी अधिकार्‍यांनी त्याचा गैरफायदा घेतल्याचे उघड झाले. इम्रान खान यांनी अवघे २ कोटी रुपये भरून जवळपास १० कोटी रुपयांचा ऐवज आपल्या ताब्यात घेतला होता.

- Advertisement -

भ्रष्टाचारात राजकारणी आणि सैन्य अधिकारी आकंठ बुडालेले असल्याने कोणाला कोणत्याही प्रकरणात अडकवणे सोपे ठरते. त्यातही पाकिस्तानात लोकशाही नावापुरतीच आहे. सत्तेची सूत्रेही पाकिस्तानी सैन्याच्या हाती आहेत. पंतप्रधानांचा केवळ चेहरा असतो. सैन्याने थेट आपल्या हाती सूत्रे घेतली तर परदेशातून मिळणार्‍या रसदवर मर्यादा येतात. लोकशाहीचा पुरस्कार करणार्‍या देशात लष्करी राजवट ही आंतरराष्ट्रीय समुदायाला अमान्य आहे.

सन २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानचे २२वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. तेव्हाही पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने ते तिथपर्यंत पोहचल्याचेच सांगितले जात होते. नवा पाकिस्तान बनविण्याचे आश्वासन इम्रान खान यांनी दिले, पण इम्रान खान यांनी सत्तेवर येताच आधीच्याच राज्यकर्त्यांची री ओढली. आपले उखळ पांढरे करून घेतले आणि जनता दुर्लक्षित राहिली. भारतातील जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटविल्यानंतर त्यांनी विविध स्तरावरून त्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दखल घेतली गेली नाही. त्यातच सैनिकी अधिकार्‍यांचे इम्रान खान यांच्याविरोधात मत बनले आणि त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यात आले. तेथूनच इम्रान खान विरुद्ध सैन्य अधिकारी असे शीतयुद्ध सुरू झाले. पाकिस्तानात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात म्हणून ब्रिटन आणि युरोपीयन देशांची मदत घेण्याच्या तयारीत इम्रान खान यांची पीटीआय अर्थात पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ होती.

- Advertisement -

मार्चमध्येच इम्रान खान यांच्या अटकेचे नाट्य रंगले होते. इम्रान खान यांच्या अटकेसाठी इस्लामाबाद पोलीस जमान पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी धडकले होते. पीटीआयचे कार्यकर्तेही तिथे मोठ्या प्रमाणावर जमा झाल्यानंतर त्या परिसरात धुमश्चक्री झाली. त्यावेळी लागोपाठ दोन व्हिडीओ त्यांनी ट्विट केले. मी नागरिकांसाठी संघर्ष करीत आहे. मला काही झाले तरी हे युद्ध थांबणार नाही, असे त्यांनी एका व्हिडीओत म्हटले होते, तर दुसर्‍या व्हिडीओत त्यांनी थेट माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर ठपका ठेवला आहे. इम्रान खान यांना तुरुंगात टाकायचे आणि त्यांच्या तेहरीक-ए-इन्साफला खाली खेचायचे, तसेच विरोधातील सर्व खटले संपवण्याची हमी नवाझ शरीफ यांना देण्यात आली आहे, असा प्लॅन लंडनमध्ये तयार झाला आहे, असा दावा त्यांनी केला होता.

यानंतर २ महिन्यांनी इम्रान खान यांना अटक करण्यात आली. सैन्य दलातील एका अधिकार्‍याने आपल्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप इम्रान खान यांनी सोमवारी केला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली. याचे तीव्र पडसाद पाकिस्तानात ठिकठिकाणी उमटत आहेत. मंगळवारी रावळपिंडीतील सैन्याच्या मुख्यालयात जमावाने तोडफोड केली, तर बुधवारी रेडिओ पाकिस्तान, असोसिएट प्रेस ऑफ पाकिस्तान यांच्या इमारतीवर जमावाने हल्ला केला. ही स्थिती पाहता पाकिस्तानातील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

या सर्व घडामोडी अपेक्षितच होत्या. आर्थिक डबघाईस आलेल्या पाकिस्तानात राजकीय अराजकता माजण्याचीच शक्यता अधिक होती. आता घडतेही तसेच. आर्थिक गर्तेत सापडलेल्या श्रीलंकेत राजकीय अस्थिरता आणि जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला, पण हा शेजारील देश आता सावरत आहे. त्याला भारताची साथही लाभली, पण पाकिस्तान यातून सावरेल असे वाटत नाही. यामागे आर्थिक संकट आणि राजकीय रस्सीखेच एवढेच कारण नाही, तर पाकिस्ताननेच पोसलेल्या दहशतवादाचाही गंभीर प्रश्न आहेच. धुमसत असलेल्या पाकिस्तानला दहशतवादी कारवायांचा धोका वाढला आहे. जे पेरले ते उगवतेच, या न्यायाने पाकिस्तान प्रत्येक टप्प्यावर ठेचाळत आहे. जनतेच्या रोजीरोटीची तरतूद करण्याऐवजी राज्यकर्त्यांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. रोजगारनिर्मितीऐवजी दहशतवादावर भर दिला. यातून ना जनतेने धडा घेतला, ना राज्यकर्त्यांनी. म्हणूनच आता बुडत्या बोटीतील ही राजकीय यादवी पाहायला मिळत आहे.

- Advertisment -