घरसंपादकीयअग्रलेखशिवसेनेचा कोहिनूर!

शिवसेनेचा कोहिनूर!

Subscribe

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनामुळे शिवसेनेतील पहिल्या फळीतला आणखी एक दुवा निखळला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. एका सर्वसामान्य मराठी कुटुंबातील मुलगा ते राज्याच्या राजकारणासह केंद्रात अनेक महत्त्वाची पदे भूषविलेले मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्दही मोठी होती. शिवसेना नगरसेवक, मुंबईचे महापौर, विधान परिषदेचे आमदार, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री यासह त्यांनी अनेक पदे भूषवली होती.

सोबतच राज्यसभा सदस्य, केंद्रात अवजड उद्योगमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपल्या लक्षवेधी कार्याचा ठसा उमटवला होता. मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ या दिवशी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. त्यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच होती. गावाला दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर मनोहर जोशी अकरावीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले. त्यावेळी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. कीर्ति महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण, मुंबईच्या प्रसिद्ध व्हिजेटीआय इन्स्टिट्यूटमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी, एलएलबीची पदवी मिळवली. आधी मुंबई महापालिकेत क्लार्क आणि नंतर शिक्षकाची नोकरी केली.

- Advertisement -

समाजातील उपेक्षित, गरीब घरातील मुलांना तंत्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने जोशी यांनी १९६१ ला नोकरी सोडून कोहिनूर क्लासेसमधून व्यावसायिक जगतात पाऊल टाकले. सामाजिक कार्यात भाग घेण्यासाठी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात रूजू झाले. आरएसएसमध्ये असलेले जोशी शिवसेनेत येण्यामागची कहाणीदेखील रंजक आहे. अनेक व्यवसायांपैकी जोशी यांचा मोटार भाड्याने देण्याचा व्यवसायही होता. महाराष्ट्रातील मराठी माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी १९६६ ला शिवसेनेची स्थापना झाली.

त्यावेळी शिवसेनेत जाण्याचा कुठलाही विचार मनोहर जोशी यांच्या मनात नव्हता. १९६७ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यात सभा होती. त्यावेळी बाळासाहेबांचे बंधू श्रीकांत ठाकरे बाळासाहेबांची भाषणे रेकॉर्ड करत असत. या सभेसाठी बाळासाहेब आधीच एक कार घेऊन गेले होते. त्यामुळे रेकॉर्डिंगचे साहित्य घेऊन जाण्यासाठी दुसरी कार उपलब्ध नव्हती, त्यामुळे श्रीकांत ठाकरेंची मोठी अडचण झाली होती. यावेळी यशवंत पाध्ये यांनी मनोहर जोशींना कारची व्यवस्था करून देण्यासाठी शब्द टाकला. या शब्दाचा मान राखत जोशी स्वत: कार चालवून सामानासहीत श्रीकांत ठाकरेंना पुण्याला घेऊन गेले.

- Advertisement -

तिथे त्यांची बाळासाहेबांची पहिल्यांदा भेट झाली. बाळासाहेबांच्या विचारांनी जोशी खूपच प्रभावित झाले. तिथून पुढे दोघांची चांगली मैत्री झाली आणि मराठी माणसांसाठी स्थापन झालेल्या चळवळीत मनोहर जोशींनी स्वत:ला झोकून दिले. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच राडा हा शब्द पक्षाला आभूषणाप्रमाणे चिकटला होता. बाळासाहेबांकडूनच अरे ला कारे आणि ठोकून वाजवून काम करून घेण्याचे बाळकडू मिळालेल्या शिवसैनिकांच्या घोळक्यात मनोहर जोशी यांचा सभ्य आणि सुसंस्कृत चेहरा उठून दिसत असे. पक्षात पंत म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. बाळासाहेबांचे निकटवर्तीय असण्यासोबतच जोशी यांचे संघटन कौशल्य उत्तम होते.

१९९५ सालच्या निवडणुकीच्या निकालानंतर अपक्षांना आपल्या बाजूने वळवायचे काम मनोहर जोशींनी खुबीने केले. शिवसेनेला तेव्हा भाजपपेक्षा ८ जागा जास्त मिळाल्या होत्या. मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू असताना सुधीर जोशींना मुख्यमंत्री करावे अशी शिवसैनिकांची इच्छा होती, मात्र युतीचे सरकार मनोहर जोशी जास्त कार्यक्षमपणे हाताळू शकतील, याची जाणीव असलेल्या बाळासाहेबांनी मोठ्या विश्वासाने युतीची सूत्रे जोशींच्या हाती सोपवली आणि मनोहर जोशी हे राज्यातील पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री झाले.

जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच मुंबईतील ५० हून अधिक उड्डाणपूल, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, १ रुपयात झुणका भाकर, एसआरए, कृषी क्षेत्रासाठी अ‍ॅग्रो परिषद, मराठी चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेेले, मात्र जावयाला भूखंड वाटपाच्या आरोपानंतर ‘वर्षा’ आणि ‘मातोश्री’तील तणाव टोकाला गेला होता. त्यावेळी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करून मला भेटायला यावे. हा बाळासाहेबांनी एका चिठ्ठीतून पाठवलेला निरोप मिळताच क्षणाचाही विलंब न लावता जोशींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पद गेले परंतु त्यांची निष्ठा ढळली नाही. पुढे त्यांचा लोकसभा अध्यक्षपदापर्यंतचा प्रवासही बाळासाहेबांच्या भरभक्कम पाठिंब्याच्या जोरावरच झाला. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या हाती पक्षाची सूत्रे सोपवल्यावर नव्या पिढीतील नेते पुढे आले.

जोशी सक्रिय राजकारणातून बाजूला पडले, शिवसेनेच्या जाहीर मेळाव्यात व्यासपीठावर अवमान सहन करावा लागला, तरी मनोहर जोशींनी आताच्या स्वार्थी आणि सत्तालोलूप नेत्यांप्रमाणे पक्ष बदलाचा विचार केला नाही की शिवसेना नेतृत्वावर अविश्वासही दाखवला नाही. विशेष म्हणजे जोशींनी इतर नेत्यांप्रमाणे आपल्या कुटुंबातील कुणी राजकीय उत्तराधिकारी निर्माण केला नाही. शिवसेनेचा सुवर्णकाळ अनुभवलेला हा नेता होता. शिवसेनेत उभी फूट पडल्यावर जोशी ठाकरेंच्या बाजूने की शिंदेंच्या असे प्रश्न उपस्थित होऊ लागले होते, मात्र कुणालाही न दुखावता बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हीच ओळख त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली. सध्याच्या राजकीय वातावरणात एकमेकांवर दिवस-रात्र चिखलफेक करण्यात मग्न असलेल्या भ्रष्ट आणि दर्जाहीन नेत्यांच्या गर्दीत मनोहर जोशी यांच्यासारखा राजकारणातला कोहिनूर शिवसेनेला पुन्हा मिळणे नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -