Homeसंपादकीयअग्रलेखShiv Sena UBT : आत्मपरीक्षणासाठी स्वबळाची ओढ!

Shiv Sena UBT : आत्मपरीक्षणासाठी स्वबळाची ओढ!

Subscribe

लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेला आशावाद ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी विधानसभेच्या निवडणुकीत सपशेल निराशा करणारा ठरला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा सूर लावला जाणार हे स्पष्ट झाले होतेच. विधानसभेला विरोधकांच्या महायुतीची अवस्था सोबत ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली. त्याही वेळी स्वबळाचा सूर अधूनमधून ठाकरेंच्या शिवसेनेकडून लावला जात होताच. आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पुढील पाच वर्षात राज्यातील सरकारच्या ‘स्थिरतेला’ धक्का लावणे अशक्य असल्याचे महायुतीच्या शिलेदारांनी ओळखले आहे. परिणामी येत्या काळात राज्यातील फडणवीस सरकारला धक्का देण्याचे प्रयत्न निकालात निघाले आहेत. अशा परिस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेने ‘एकांगी पराभवाचे’ वास्तव स्वीकारले आहे. या पराभवातून ‘राजकीय’ धडे शिकण्यासाठी महापालिका ही विधानसभेच्या सहामाही परीक्षेनंतरची वार्षिक परीक्षेसारखी संधी म्हणून ठाकरेंची शिवसेना याकडे पाहत आहे. विधानसभेची मॅच सपशेल गमावल्यानंतर पालिकेचा चषक पणाला लावण्यात येत आहे. त्यातून ठाकरेंना शिवसेनेचे ‘राजकीय आत्मपरीक्षण’ करायचे आहे. आपण या लढाईत नेमके कुठे आहोत? हे ठाकरेंच्या शिवसेनेला पाहावेच लागणार आहे.

मित्र असलेल्या पाहुण्यांची काठी यजमानांच्या विरोधात कधी उगारली जाईल, हे सांगता येत नसल्याने पाहुण्यांच्या काठीचा आपल्याला उपयोग होणार नाही, याची शिवसेनेला कल्पना आलेली आहे. त्यातून आपली काठी किती मजबूत आहे हे पाहण्यासाठी महापालिकेच्या निवडणुकांची ही संधी म्हणून ठाकरेंची शिवसेना याकडे पाहत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला यंदाच्या महापालिका निवडणुकीत आपली पालिकांवरची पकड कायम ठेवण्यापेक्षा आपल्या अस्तित्वाची चिंता आहे. स्वत:चे राजकीय अस्तित्व कायम राखणे महत्वाचे आहे. त्यानंतर हे अस्तित्व मजबूत करणे, हा दुसरा टप्पा आहे. त्याही पुढे सत्ता आणि सत्ता कायम राखण्याचे राजकारण हे दूरचे पल्ले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातात यातील काहीच नाही. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने दिवा स्पप्न पाहाणे सोडून दिले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ‘राज्यातील वातावरण फिरले असल्याचा भ्रम’ किती पोकळ होता, हे शिवसेनेला अनुभवातून आलेले राजकीय शहाणपण आहे. शिवसेेनेच्या पराभवामागील कारणे ईव्हीएम, धार्मिक, सामाजिक ध्रुवीकरण अशी असल्याचे शिवसेनेचे म्हणणे होते. या गोष्टी लोकशाहीबाह्य होत्या. हे सगळे शिवसेनेने समजून घेतले आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातील स्वतःची नेमकी जागा ओळखण्याची आता त्यांना गरज आहे. त्यामुळे हा स्वबळाचा नारा ठाकरेंच्या शिवसेनेने देऊ केला आहे. ‘शिवसेनेची मुंबई’, ‘शिवसेनेचे ठाणे’, ‘शिवसेनेचे कल्याण डोंबिवली’ हे सर्व राजकीय भ्रम पाळण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला आता रस नाही. त्यापेक्षा जमिनीवरच्या वास्तवाला भिडण्याची तयारी ठाकरेंनी केली आहे. मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचेच आहे, अशी घोषणा शिवसेनेच्या संजय राऊतांनी करण्यामागे ठाकरेंची शिवसेना आता मित्र, विरोधक आणि स्वत:सह कोण किती पाण्यात आहे? हेसुद्धा पाहायला उतरली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला पालिकांमधील पराभवाची आता चिंता नाही. राजकारण करून पालिकेची सत्ता मिळवली तरी राज्याचा आणि केंद्रातील भाजपाचा अंकुश अशा सत्तेतही उपद्रव देणाराच असेल हेही शिवसेनेला माहीत आहे.

ठाण्यात एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या अस्तित्वाला आव्हान दिलेले आहे. त्यामुळे मुंबई पालिका राखण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे शहाणपण असल्याचे वरकरणी वाटू शकते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने राजकीय सत्तेची बाराखडी पालिकांच्या निवडणुकीतूनच शिकली होती. शिवसेनेने स्वबळाची केलेली घोषणा ही पुन्हा शून्यातून झेप घेण्यासाठी केलेल्या तयारीचा बिगूल आहे. उद्धव ठाकरेंकडे आता गमावण्यासारखे काही नाही, उरल्या सुरल्या वीस आमदारांचे संख्याबळ राज्यात भाजपच्या बलाढ्य बहुमतासमोर असून नसून सारखेच आहे. अशा परिस्थितीत हा राज्यातील सत्तेचा ‘सामना’ हरल्यातच जमा असल्याने आता आक्रमक खेळ करण्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील जनमतात आपले स्थान, ताकद ओळखण्यासाठी शिवसेनेने मित्र आपल्या सोबत आहेत हा भ्रम बाजूला केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिलेला स्वबळाचा हा नारा शिवसेनेसाठी म्हणूनच महत्वाचा आहे. सद्यस्थितीत महापालिकांमध्येही राजकीय सत्ता मिळेल की नाही, हा विषय दुय्यम आहे. आता हा शिवसेनेच्या अस्तित्त्वाचा लढा आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता शिवसेनेसाठी प्राणवायू इतकीच मोलाची आहे हे खरेच. मात्र त्यासाठी युती करून राजकीय तडजोड करण्यापेक्षा स्वत:चे संघटनात्मक बळ वाढवावे लागेल. ठाकरेंनी या वास्तवाचे भान ठेवणे अधिक महत्वाचे आहे. युती करून महापालिकेतील सत्ता मिळवली तरी मित्रपक्षांसोबत शिवसेनेला राजकीय तडजोडी करावी लागेल. केंद्र, राज्यातील दबावमुळे सत्ता जाण्याची सतत भीती असेल. राज्य आणि केंद्रातील सत्ताधार्‍यांकडून अडवणूक केली जाईल. त्यातून पालिकांतील सत्तेचे संतुलन राखताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दम निघून जाणार आहे. हे ठाकरेंच्या शिवसेनेने ओळखले आहे. त्यामुळे आता कोणाच्याही कुबड्यांचा आधार न घेता ठाकरेंच्या शिवसेनेला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे. त्यामुळे त्यांना आता मित्रांना दूर ठेवावे असे वाटत असावे.