Homeसंपादकीयअग्रलेखSocial Media Trolling : स्त्रीचारित्र्याचे मारेकरी!

Social Media Trolling : स्त्रीचारित्र्याचे मारेकरी!

Subscribe

एखाद्याची मानहानी करणे, चारित्र्यहनन करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करणे, समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र पोस्ट करणे, एखाद्याचे खासगी जगणे समाजमाध्यमांवर जाहीर काढणे, त्याच्या चर्चेचे गुर्‍हाळ सुरूच ठेवणे, त्यावर आक्षेपार्ह टीका टिप्पणी करण्याला सोशल मीडियात ‘ट्रोलिंग’ असे हायटेक नाव दिले जाते. मात्र हे ट्रोलिंग महिला आणि पुरुषांच्या बाबतीत वेगवेगळे असते. पुरुषांच्या ट्रोलिंगमध्ये पुरुषार्थावर हल्ला केला जातो तर महिलेच्या बाबतीत चारित्र्य हे सॉफ्ट टार्गेट असते. आपल्याकडे पुरुषांना ‘नामर्द’ ठरवणे हे मानहानीचे अखेरचे टोक असते. तर याच मर्दानीपणाला जोडून पुरुषांच्या लैंगिक संदर्भाने ही मानहानी संबंधित पुरुषांच्या संपर्कात असलेल्या महिलांशीही जोडली जाते. केवळ लैंगिक संदर्भानेच आपल्याकडे एखाद्याची ‘मर्दानगी’ ओळखण्याची पद्धत असल्याने यापलीकडे पुरुषांच्या कर्तृत्वाचे इतर संदर्भ दुय्यम ठरवले जातात. पुरुषांच्या बाबतीत अशी परिस्थिती असताना महिलांच्या संदर्भाने मात्र परिस्थिती अजून बिकट होते. महिलांना कायदा आणि कौटुंबिक किंवा सामाजिक सुरक्षेचे अधिकार पुरुषांच्या तुलनेत अधिक असतात, हे खरे आहे. मात्र चारित्र्यहनन किंवा लोकलज्जा जाहीर करण्याचा धोका पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक असतो. याबाबत महिला सॉफ्ट टार्गेट असतात, एखाद्या महिलेच्या एखाद्या विधानाचे विविध अर्थ काढून चारित्र्यहननात विकृत आनंद मानणारे ट्रोलर्स, पत्रकारितेच्या नावाखाली पितपत्रकारिता चालवणारे खंडणीखोर यूट्युबर्सनी पत्रकारितेची अपरिमित हानी केली आहे. या ‘अनैतिक’ टीआरपीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी या ‘अनैतिक’ पत्रकारितेची लागण मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांनीही स्वत:ला करून घेतली आहे. त्याचे परिणाम एखाद्याच्या खासगी आयुष्याचा सार्वजनिक कार्यक्रम बनवून चर्चा करत चघळत बसणे, चारित्र्यहननाच्या आरोपाबाबत एखाद्यावर मीडिया ट्रायल चालवण्याचे प्रकार आपल्याकडे नवे नाहीत.

समाजमाध्यमांना धरबंदच नसल्याने तिथे कोणीही कोणावरही चिखलफेक करू शकतो. या चिखलफेकीच्या खेळातून आपण कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहोत, कोणाला आयुष्यातून उठवत आहोत, संबंधितांच्या ‘नागरिक आणि व्यक्ती’ म्हणून असलेल्या अधिकारात शिरण्याचा प्रयत्न करत आहोत, याचे भान समाजमाध्यमांनी बरेचदा गुंडाळून ठेवलेले असते, अशा प्रवृत्तीला विरोध केल्यास अभिव्यक्तीच्या नावाने गळे काढणार्‍यांची संख्याही मोठी आहे. सोशल मीडियावर अकाऊंट असल्यावर एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनात विनाकारण, विनापरवानगी शिरकाव करणे किंवा एखाद्यावर आरोप करून चारित्र्यहनन करण्याचे प्रमाणपत्र आपल्याला मिळाले असल्याचा अविर्भाव समाजमाध्यमावर पहायला मिळतो. एखाद्याची जाहीर बदनामी केल्यावर ‘तो’ किंवा ‘ती’चे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, त्या व्यक्तीचे करिअर, कुटुंब, नातेसंबंध, प्रतिष्ठा धुळीला मिळू शकते. त्यातून ती व्यक्ती स्वत:चे जगणे नाकारण्याची टोकाची भूमिका घेऊ शकते, याचे भान सोशल मीडियाची हाताळणी करणार्‍यांना अनेकदा नसते, बरेचदा गंभीर, सुदृढ चर्चेपेक्षा थिल्लरपणा आणि जाहीर अवमान, मानहानी आणि अवहेलनेतच अनेकांना रस असतो. एखाद्याची वेदना, त्रासात आनंद घेणार्‍यांना निश्चितच माणूस म्हणता येणार नाही. चारित्र्य ही व्यक्तीची संपूर्णपणे व्यक्तिगत बाब आहे. मात्र चारित्र्याच्या आपल्या संकल्पना या लैंगिक किंवा शारीरिक जाणिवेच्या पलीकडे जात नाहीत, त्यामुळे समाजमाध्यमांवर विकृत ट्रोलर्सच्या टोळ्यांना चघळायला खाद्य मिळते.

सद्यस्थितीत महाराष्ट्रासमोर असलेले प्रश्न तुलनेने गंभीर आहेत. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना हवालदिल केले आहे. कल्याण त्यानंतर पुणे अशा शहरांमध्ये लहानग्यांवरील अत्याचार आणि हत्येच्या घटना वाढल्या आहेत. त्याआधी परभणी प्रकरणातील आंदोलनकर्त्याचा मृत्यू अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या विषयावर माध्यमांमध्ये गंभीर चर्चा होणे अपेक्षित होंते. पण ‘चारित्र्यहननाच्या’ विषयावर माध्यमांचे पडदे आणि वर्तमानपत्रांचे रकाने भरून गेले आहेत. सिनेक्षेत्रातील रुपेरी वलयामुळे त्याकडे सामान्य वाचक किंवा प्रेक्षक आकर्षित होतो. परिणामी राजकारण आणि सिनेक्षेत्र, सोबतच चारित्र्यचर्चा अशी तिहेरी किनार असलेली बातमी टीआरपीच्या दृष्टीने ‘महत्त्वाची’ असते. अशा बातमीचा टीआरपी शेतकर्‍यांच्या अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाच्या बातमीच्या तुलनेत जास्त असल्याने तिला अधिक महत्त्व दिले जाते. माणसांना दुसर्‍यांच्या खासगी जीवनात डोकावायला आवडत असते, जर ती महिला असेल तर या डोकावण्यात कुतूहल आणि ‘लंपट’ असे औत्सुक्य असते. एखाद्याला सामाजिक आरोपी, गुन्हेगार ठरवून आपण कसे चारित्र्यवान आणि धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहोत, अशी स्वत:ला खात्री देता येते. माणसांना दुसर्‍याला दोष देण्याचे अधिकार कायम स्वत:कडे हवे असतात, त्यातून सामाजिक चर्चामधून त्या व्यक्तीची ‘ट्रायल’ सुरू होते. या ट्रायलमध्येच अशांना रस असतो, दिलेला दोष खरा आहे किंवा नाही, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांना रस नसतो, असे ट्रोलिंग किंवा ट्रायल चालवणार्‍यांचे हेतूही काही स्वच्छ असतात असे नाही, त्यांना केवळ तात्पुरते मनोरंजन आणि चिखलफेक करण्याची मिळालेली संधी सोडायची नसते. आपण स्वत: नखशिखांत बरबटलेलो असल्याने इतरही आपल्यासारखेच बरबटलेले आहेत हे सांगण्याची ही केविलवाणी धडपड असते. मात्र इतरांवर पातळी सोडून सार्वजनिक चव्हाट्यावर दोषारोप करणे योग्य नाही. असे दोषारोप शिक्षेपेक्षाही भयंकर वेदना देणारे असतात. याचे भान अनेकांना नसते. बदनामीसाठी केवळ कुठले तरी निमित्त पुरेसे असते, आरोपातील सत्य, तथ्य दुय्यम असते. एखाद्याच्या व्यक्तिगत जीवनावर आरोप करण्याचा अधिकार कुणालाही नाही, एवढे समजले तरी खूप झाले. त्याच वेळी अशा बेताल प्रवृत्तीच्या लोकांना सरकारनेही चाप बसवणे आवश्यक आहे.