घरसंपादकीयअग्रलेखविजयाचा शंख सावध वाजवा

विजयाचा शंख सावध वाजवा

Subscribe

पाच राज्यांतील निवडणुकांनंतर चार राज्यांपैकी तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आपल्या बाजूने लागल्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या बाहुंमध्ये स्फुरण चढले असून लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता ते हुप्पा हुय्या करू लागले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका या पुढील वर्षी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर असल्यामुळे लोकांचा कल कुणाच्या बाजूला आहे हे दाखवून देऊ शकतील, म्हणून पाच राज्यांतील या निवडणुकांना लोकसभा निवडणुकीअगोदरची सेमी फायनल, असे म्हटले जात आहे. या सेमी फायनलमध्ये भाजपची सरशी होताना दिसत आहे, पण निर्जीव झालेल्या काँग्रेसने तेलंगणामध्ये मोठी मुसंडी मारून राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली आपली ताकद दाखवून दिली आहे.

मिझोराममधील निकाल आज जाहीर होईल, पण सध्या तरी तीन राज्यांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करून भाजपने मोदी हैं तो मुमकीन हैं, हे दाखवून दिले आहे. सेमी फायनल जिंकल्याचा भाजपच्या नेत्यांना अतोनात आनंद झालेला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना तर गगन ठेंगणे झाले आहे, तर त्याचसोबत विरोधातील नेत्यांची सध्या भाजपवर टीका करण्यासाठी शब्दांची शोधाशोध सुरू असावी. त्यामुळे भाजपवर सातत्याने तोफा डागणारे ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे नेते तोंडसुख घेत आहेत. मोदींच्या जीवावर आपण मैदान मारू शकतो, असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे. आपण सेमी फायनल जिंकलो आहोत, आता फायनल आम्हीच जिंकणार, या विश्वासाने भाजप नेते जल्लोष करत आहेत, पण त्याच वेळी त्यांना या गोष्टीचा विसर पडला आहे की गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर असतानाही क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सलग १० सामने जिंकलेला भारतीय संघ फायनलमध्ये पराभूत झाला, हे अतिशय अनपेक्षित होते.

- Advertisement -

भारतच जिंकणार असे सगळ्यांना वाटत होते. याच शक्यतेचा उपयोग करून भारतीय संघ जिंकल्यावर त्याचा मोठा इव्हेंट करण्याची तयारी भाजपने केली होती, पण अनपेक्षितपणे भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पराभूत झाला आणि भाजपच्या इव्हेंटबाजीतील सगळी हवा निघून गेली. ज्या भारतीय खेळाडूंसोबत विजयी वर्ल्डकप उंचावण्याचे मोदींचे स्वप्न होते, त्याच भारतीय खेळाडूंचे त्यांना ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सांत्वन करावे लागले. भाजपच्या सर्व राज्यातील नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, मोदी हैं तो हर बार मुमकीन हैं, असे होत नाही. भारतीय संघ जिंकणार असे शंभर टक्के वाटत असताना तो संघ पराभूत झाला. सेमी फायनलमध्ये जिंकलेला संघ फायनलमध्ये हरला.

त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी हे लक्षात ठेवायला हवे की, आपण आता निवडणुकांची सेमी फायनल जिंकलो असलो तरी फायनलचा निर्णय वेगळा असू शकतो. त्यामुळे त्यांनी या विजयाचा शंख जपून वाजवावा. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षे भाजपची सत्ता आहे. त्यातही मध्यंतरी भाजपच्या हातून गेलेली सत्ता त्यांनी कोरोना काळात पुन्हा मिळवली. राजस्थानमध्ये सत्ता बदलाची परंपरा आहे. त्याच पक्षाला दुसर्‍या वेळी संधी मिळेल असे सहसा होत नाही. त्याच नियमाने त्या राज्यात काँग्रेसची सत्ता होती, ती गेली आणि तिथे भाजपची सरशी झालेली आहे. याला राजस्थानातील नव्या आणि जुन्या पिढीतील संघर्षही कारणीभूत ठरला. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्षामुळे या राज्यातील काँग्रेसच्या सत्तेचे विमान भरकटले, असे म्हटले तरीही ते वावगे ठरणार नाही. छत्तीसगड हे काँग्रेसच्या ताब्यातील राज्य भाजपला मिळाले आहे.

- Advertisement -

तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस आणि काँग्रेस यांची टक्कर झाली. चंद्रशेखर राव यांना आपले पंख पसरून पंतप्रधान होण्यासाठी दिल्लीच्या दिशेने झेप घ्यायची आहे. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रात शिरकाव करून मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्या माध्यमातून त्यांनी लार्जर दॅन लाईफ अशी आपली प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या राज्याच्या बाहेर पंख पसरू पाहणार्‍या या नेत्याचे काँग्रेसने पंख कापल्यामुळे दिल्लीकडे उड्डाण घेण्याचे अवसान त्यांच्यात किती उरेल हा प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी दक्षिण भारतातून सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचा फायदा त्यांना होताना दिसत आहे. भाजपने कर्नाटकात सगळी शक्ती पणाला लावूनही त्यांच्या हातून सत्ता गेली होती. आता राहुल गांधी यांनी तेलंगणामध्ये प्रचार केल्याचा काँग्रेसला फायदा झाला.

तीन राज्यांमधील विजयामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये जोश संचारला आहे, पण त्याच वेळी महाराष्ट्रातील नेते मात्र महाराष्ट्रात निवडणुका घेण्याविषयी सावध भूमिका घेत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवाच, या उद्धव ठाकरे यांच्या आव्हानासमोर मात्र ते ढिले पडताना दिसत आहेत. हीच महाराष्ट्रातील भाजपच्या विरोधकांची जमेची बाजू आहे. महाराष्ट्रात आम्ही सत्ता आणली, पण आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री बसू शकला नाही, तसेच राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर आपले काय होईल याची भाजपवाल्यांना शाश्वती नाही. त्यात आता पुन्हा शिंदे आणि पवार हे दोघे सत्तेत भागीदार आहेत. त्यामुळे जागावाटपात त्यांचेही समाधान करावे लागणार आहे. त्यामुळे मोदींमुळे बाहेरील राज्यांमध्ये भाजपला विजय मिळत आहे, पण महाराष्ट्रात मात्र काळजावर दगड ठेवून राज्य करावे लागते ही भाजपची खंत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -