घरसंपादकीयअग्रलेखऐसी जिव्हा निकी...

ऐसी जिव्हा निकी…

Subscribe

‘ऐसी जिव्हा निकी। विठ्ठल विठ्ठल कां न घोकी॥ जेणें पाविजे उद्धार। तेथें राखावें अंतर॥ गुंफोनि चावटी। तेथें कोणा लाभें भेटी॥’ असे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. सध्याच्या उथळ राजकारण्यांच्या बाबतीत हे तंतोतंत लागू होते. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भर विधानसभेत केलेले वक्तव्य लज्जास्पद होते. त्याला तुकाराम महाराजांच्या अभंगातील या ओळी तंतोतंत लागू होतात. बिहार विधानसभेत मंगळवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातनिहाय जनगणना अहवाल सादर केला. त्यावेळी लोकसंख्या नियंत्रणाबाबत बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार हे मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत होते. मुलगी सुशिक्षित असेल तर कुटुंब नियोजनावर भर दिला जातो, हे त्यांना सांगायचे होते, पण सभागृहात हे सांगताना त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

हे सांगताना त्यांची देहबोली तसेच स्वरदेखील आक्षेपार्ह होता. विशेष म्हणजे विधानसभेत त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. विधानसभा अध्यक्षांनीदेखील हे वाक्य पटलावरून काढून टाकण्याचे औचित्य दाखवले नाही हे खेदजनक म्हणावे लागेल. अर्थात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मुख्य विरोधक असलेल्या भाजपने यावर जोरदार टीका केली, पण तेही दुसर्‍या दिवशी. प्रत्यक्षात नितीश कुमार यांनी केलेल्या वक्तव्याच्या वेळी त्यांनी केवळ ‘बघ्या’चीच भूमिका घेतली हेच धक्कादायक आहे. सुशिक्षित महिलांबद्दलचे वक्तव्य नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीने केले, त्याची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. त्याबद्दल विधानसभा अध्यक्षांना नोटीस पाठवून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कठोर कारवाई करण्यास आयोगाने सांगितले आहे.

- Advertisement -

बिहार विधानसभेचा इतिहास तसा वादग्रस्तच राहिला आहे. दंडुकेशाहीच्या बळावर जिंकून आलेल्या नेत्यांमध्ये नैतिकता आणि तारतम्य यांचा अभाव यापूर्वी अनेकदा पाहायला मिळाला आहे. म्हणून यापूर्वी खूप वेळा सभागृहाचा आखाडाही झाला होता. आता तशा प्रकारांमध्ये घट झालेली दिसत असली तरी लोकप्रतिनिधींमध्ये तारतम्याचा अभाव असल्याचे आजही दिसत आहे. ‘जिभेसारखा खतरनाक अवयव नाही. माणसं भांडतात, युद्धं होतात. नातेवाईक दुरावतात, अभक्ष्य भक्षण करतात, अपेय पान करावंसं वाटतं… हे सगळं जिभेमुळे. भाषा अत्यंत चांगली, पण जीभ वाईट असते,’ असे प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी म्हटले आहे. याचाच प्रत्यय नितीश कुमार यांच्या वक्तव्यातून आला आहे. नितीश कुमार यांनी आपल्या या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करत हात जोडून माफी मागितली आहे, पण शाब्दिक बाणाने जखमी झालेल्यांचा विशेषत: महिलांच्या आत्म्यावरचे घाव कसे भरून निघणार? पण बिहारच काय, ही स्थिती सर्वच ठिकाणी पाहायला मिळते.

काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला होता. त्यावर विरोधक आक्रमक झाले. त्याबद्दल अधीर रंजन चौधरी यांनी दिलगिरीही व्यक्त केली, पण अशा घटनांना महाराष्ट्रदेखील अपवाद नाही. यात आघाडीवर आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत. प्रसारमाध्यमांशी बोलताना बेधडक कोणालाही शिवीगाळ करणे, थुंकणे असले प्रकार ते करत असतात. केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे तर पत्रकार म्हणूनदेखील काही बंधने आपल्यावर आहेत याचे भान त्यांनी ठेवायला हवे, पण तसे होताना दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांचीदेखील तीच तर्‍हा आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्य विधानसभेत बहुमत चाचणी जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणादरम्यान अनावधानाने ‘साला’ हा शब्द उच्चारला गेला, पण लगेचच मुख्यमंत्री शिंदे चपापले आणि त्यांनी लगेच पीठासीन अधिकारी अ‍ॅड. आशिष शेलार यांच्याकडे पाहिले आणि माफी मागत शब्द मागे घेत असल्याचे सांगितले. त्यांचे हे सौजन्य वाखाणण्याजोगे आहे, पण त्यांचे समर्थक आमदार एखाद्याच्या श्रीमुखात लगावण्यापासून जीवे मारण्यापर्यंतची भाषा करतात आणि त्याची सरकारी पातळीवर दखल घेतली जात नाही हे अतिशय खेदजनक आहे.

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. तिच्या या व्हिडीओबद्दल ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा व्हिडीओ बनवला आहे. अशा प्रकारे नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग महिलांचे असे रूप तयार करण्यासाठी केला जात आहे. यातून व्यक्तीची विकृती लक्षात येते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार असो, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार असो की ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असो त्यांची अशी वक्तव्ये दुसरे काय दर्शवतात? कोणी कोणती भाषा वापरायची हे स्वातंत्र्य आपल्या देशात असले तरी कोणासमोर कोणते शब्द वापरायचे याचे तारतम्य ज्याने त्याने बाळगायला हवे.

उथळ भाषेमुळे चर्चेत राहता येत असले तरी ती चर्चा अभिमानाची नव्हे तर घृणेचीच असते. सोशल मीडिया खूपच संवेदनशील आहे. कुठल्याही गोष्टीचे लगेच पडसाद तिथे उमटतात. तेव्हा आपला ठसा उमटवायचा की हसे करून घ्यायचे हा विचार राजकारण्यांनी केला पाहिजे. वपुंनी म्हटल्याप्रमाणे – शब्द प्रत्येकाकडे असतात, कुणाकडे मन जिंकून घेणारे, कुणाकडे मन दुखावणारे…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -