बेदरकारपणाचे बळी

संपादकीय

महाराष्ट्रात राजकीय सूडनाट्याचा कलगीतुरा शिगेला पोहचलेला असताना रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंतच्या काही तासांमध्ये घडलेल्या दोन भीषण घटना मन सून्न करणार्‍या ठरल्या. रविवारी रात्री अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते बैतुल मार्गावर निंभोरा फाटा येथे दुचाकीला धडकून अनियंत्रित झालेली कार या दुचाकीसह नाल्यात कोसळून ६ जण दगावले. तर सोमवारी सकाळी १० ते १०.४५ च्या सुमारास ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेली राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अंमळनेर आगाराची इंदूरहून अंमळनेरला निघालेली बस अनियंत्रित होऊन थेट नर्मदा नदीच्या पात्रात कोसळल्याने १२ जणांना जीव गमवावा लागला. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे हा अपघात घडला.

या दोन्ही अपघातांची समोर आलेली माहिती पाहता सकृतदर्शनी तरी यात चालकांचा फाजील आत्मविश्वास आणि बेदरकारपणा कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाचे धुमशान सुरू असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक ठिकाणी पूर आले आहेत. नदी, नाले दुथडी भरून वाहत असतात तेव्हा त्यावरील पुलावरून जाताना वाहनाचा वेग नेहमीपेक्षा कमी असला पाहिजे असा सर्वसाधारण संकेत आहे. अनेकदा पुलावरून थोडे पाणी वाहत असले तरी त्यातून वाहन सुसाटपणे हाकण्याचा आनंद (!) चालक घेत असतात. यातून काही वेळेला आयतेच अपघाताला निमंत्रण मिळते. २ ऑगस्ट २०१६ रोजी महाडच्या सावित्री नदी पुलावर दोन एसटी बसच्या झालेल्या अपघाताची आठवण यानिमित्ताने येते. ब्रिटीशकालीन हा पूल मुसळधार पावसात कोसळला. याची जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरिवली बसच्या चालकाला रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात कल्पना आली नाही. त्यामुळे या दोन्ही बस थेट नदीपात्रात कोसळून जवळपास ४० जणांना जलसमाधी मिळाली होती.

अनेकदा लांबच्या प्रवासाला सुस्थितीत नसलेल्या गाड्या पाठविण्यात एसटीचे अधिकारी धन्यता मानत असतात. अंमळनेर ते इंदूर हे अडीचशेहून अधिक किलोमीटर अंतर असलेल्या प्रवासासाठी सुस्थितीतील बस पाठविणे गरजेचे असताना फिटनेस संपायला जेमतेम १ वर्ष शिल्लक असलेली बस पाठविण्यात आली होती. अर्थात एसटीचे अधिकारी ही बस सुस्थितीत होती असाच निर्वाळा देणार यात शंका नाही. पण एक लक्षात घेतले पाहिजे की, व्यवस्थित देखभाल-दुरुस्ती न करता बस लांबच्या अंतरासाठी वापरण्यात येतात. या दुर्घटनाग्रस्त बसच्या बाबतीतही तसेच झाले असेल. अर्थात या बसच्या अपघातामागे कोणते तांत्रिक कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली आहे.

काही वेळेला चालकाला पुरेशी विश्रांत न मिळाल्याने कधी एकदा घरी पोहचतो या विचाराने तो बसचा वेग वाढवत असतो हे अनेक दुर्घटनांतून समोर आलेले आहे. नियमाप्रमाणे सेवेचे जे तास ठरलेले असतात त्यामध्ये वाहतूक कोंडी, तांत्रिक बिघाड यामुळे अडथळा येत असल्याने चालक आणि वाहकाचे सेवे (ड्युटी) चे तास वाढतात. यात चालकाचे संतुलन बिघडून अपघाताची टांगती तलवार प्रवाशांच्या डोक्यावर लटकत असते. वरकरणी ही बाब साधी वाटली तरी प्रवासी एका भीतीच्या सावटाखाली प्रवास करीत असतात, हे नाकारता येणार नाही. दुर्घटना घडल्यानंतर मृताच्या वारसांना, तसेच जखमींना मदत दिली म्हणजे सर्व संपते. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत हे संबंधितांपैकी कुणाच्याही लक्षात येत नाही.

एसटीचे अनेक चालक बेदरकारपणे किंवा निष्काळजीपणाने बस चालवितात हे लक्षात आलेले आहे. बसमध्ये प्रवासी असतात याचे भान न ठेवता टुकार रस्त्यांवरूनही बस वेगाने नेल्या जातात. याची कुण्या प्रवाशाने तक्रार केलीच तर थातुरमातूर कारवाई होण्यापलीकडे काही घडत नाही. त्यामुळे चालक बिनधास्त असतात. लांबच्या प्रवासासाठी योग्य आणि सुस्थितीतील बसच उपलब्ध केली पाहिजे. वाहन निर्जीव असले तरी त्याला विश्रांती ही पाहिजे. वर म्हटल्याप्रमाणे एसटीच्या बसना पुरेशी विश्रांती मिळत नाही. चालकही याबाबत नाराजी व्यक्त करीत असतात. एसटीच्या अशा अनेक फेर्‍या आहेत की त्यांच्या बसचे ऑईल थंड कधी होतच नाही, असे हे चालक सांगतात. सर्वसामान्य प्रवाशाला प्रवासासाठी एसटी हाच मुख्य आधार आहे. ग्रामीण भागात याची प्रचिती येते. तिकीट कितीही महागले तरी ते निमूटपणे घेऊन हा प्रवासी प्रवास करतो. मात्र त्यांच्यासाठी खिळखिळ्या बस असतात, हा ग्रामीण भागातील अनुभव आहे.

शहरी भागातील प्रवासासाठीसुद्धा भंगार बस पाठविण्यात येतात. आंतरराज्य प्रवास करणारी इंदूर ते अंमळनेर ही बस दहा वर्षांची जुनी असल्याने तीही यथातथाच असणार यात शंका नाही. प्रवासासाठी पैसे मोजणार्‍या प्रवाशाला सुस्थितीत नसलेल्या बसमधून प्रवास करायला भाग पाडण्याचा अधिकार एसटीच्या अधिकार्‍यांना नक्कीच नाही. एसटीचा कारभार हा कागदी घोडे नाचवून केला जात असल्याने गाड्यांच्या सुस्थितीकडे अधिकार्‍यांचे अजिबात लक्ष नसते. आरामात कार्यालयात बसून काम करणार्‍या एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपैकी कितीजण त्यांच्याच बसमधून प्रवास करतात, हा संशोधनाचा विषय आहे. खरं तर या अधिकार्‍यांसाठी महिन्यातील काही दिवस एसटी बसचा प्रवास अनिवार्य केला पाहिजे. तसे झाले तर गाड्या कशा चमत्कार झाल्याप्रमाणे सुस्थितीत धावतील ते पहा! लांब पल्ल्याच्या गाड्यांचे अनेकदा हेडलाईटही धडपणे काम करीत नाहीत. अशा गाड्या रात्री चालविणार्‍या चालकांचे खरंच कौतुक केले पाहिजे.

एसटीच्या कारभाराकडे शासनाने कधीच गंभीरपणे पाहिलेले नाही. महामंडळाचे बडे अधिकारी मुंबईच्या मुख्यालयात बसून राज्याचा कारभार पाहत असतात. महाराष्ट्राची एसटी हा पीएचडीचा विषय ठरू शकते, असे गमतीने म्हटले जाते, यातच सर्व काही आले. प्रवाशांचा बसमधील प्रवास निर्धास्तपणे व्हावा यासाठी नियोजन पाहिजे. एसटी हे प्रवासाचे अजूनही विश्वासार्ह साधन आहे. परंतु अधिकारी याकडे कानाडोळा करतात. अपघातानंतर सोपस्कार पार पाडले की अधिकार्‍यांचे काम संपते. इंदूर-अंमळनेर बस अपघातात चालकही दगावला असल्याने तेव्हा नेमके काय घडले, हे समजणार नाही. या अपघातानंतर एसटीने प्रवाशांची काळजी घेणारे निश्चित असे धोरण ठरविले पाहिजे. देखभाल-दुरुस्ती, चालकाला पुरेशी विश्रांती, बेदरकार चालकावर कठोर कारवाई याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. गुजरात, कर्नाटक यांच्या एसटीसमोर महाराष्ट्राची एसटी अगदीच दुबळी वाटत आहे. स्थावर आणि जंगम मालमत्तेचे गुणगाण गाण्याऐवजी सक्षम सेवा कशी देता येईल, याचा विचार झाला पाहिजे. एसटीच्या भंगार गाड्यांमुळे रात्रीचा प्रवास करण्यासाठी अलीकडे खासगी वाहतूक सेवेला अधिक झुकते माप दिले जातेय, याची जाणीव असू देत!