बंड की उठाव…?

संपादकीय

दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठराव राज्यपालांच्या आदेशानुसार विशेष अधिवेशन घेऊन मंजूर करण्यात आला. या विश्वासदर्शक ठरावाच्या महत्वाच्या प्रसंगीदेखील ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना १६४ आमदारांचे पाठबळ लाभलं त्याचप्रमाणे काँग्रेसच्या बारा आमदारांनी ठरावाच्या प्रसंगी गैरहजर राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे मोठी मदत केली. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात विश्वासदर्शक ठरावाला सहकार्य करणार्‍या अदृश्य हातांचेही आभार मानले आहेत.

महाराष्ट्राची आगामी काळातील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने जाणार आहे याचे प्रतिबिंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावांमध्ये दिसून आले आहे. मात्र त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे त्याचे एक मर्मस्थळ म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांचे हे बंड आहे, की आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात त्याप्रमाणे हा शिवसेनिकांमधला उठाव आहे हा खरा प्रश्न आहे. बंड की उठाव यावरून परस्परविरोधी दावे केले जात आहेत, त्यातून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव्याच्या वेळी सभागृहात त्यांच्या स्वतंत्र शैलीमध्ये भाषण केले ते लक्षात घेता त्यांनी गेल्या पंधरा दिवसांमध्ये जे काही केले त्याला बंड न म्हणता सामान्य शिवसैनिकांमधील उठाव म्हणावे असे सांगितले. विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाषणाचा रोख लक्षात घेतला चार ते पाच वेळा शिवसेनेकडून आमदार झालेल्या मंत्र्यांनीदेखील काँग्रेस आघाडी सोबत असलेल्या सत्तेचा त्याग करून सूरत आणि गुवाहाटी यांची वाट धरण्याचा उल्लेख त्यांनी केला. यामध्ये प्रामुख्याने गुलाबराव पाटील यांचे भाषण सर्वसामान्य शिवसैनिकांच्या आवेशात झाले. त्यांनी सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना भाजप हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष त्यांनी करून दाखवला.

२०१९ मध्ये सत्तांतर झाले आणि शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन नैसर्गिक विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांनी आघाडी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र त्यानंतरच्या अडीच वर्षात राज्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची वाढ झाली तसेच भाजप सरकार विरोधी पक्षदेखील वाढला मात्र या तीनही पक्षांच्या तुलनेत मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्याकडे असूनही शिवसेना हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. अखेरीस आमदारांना स्थानिक मतदारांच्या पाठबळावर मतदारसंघातून निवडून यावे लागते आणि जर आमदारांची सरकार दरबारी असलेली कामे त्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री असताना मार्गी लागू शकली नाहीत, तर अशा सत्तेला काय अर्थ राहिला असा त्यांचा रोख होता.

सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी राज्यात पक्ष संघटना बळकट करण्यास सुरुवात केली होती आणि त्याला बर्‍यापैकी त्यांना यश येत होेते. भाजपविरोधी पक्षात असूनही सक्षम लढाऊ नेतृत्व आणि केंद्रीय पाठबळ यामुळे पक्ष संघटना बळकट आणि एकसंध ठेवू शकला, मात्र दुर्दैवाने मुख्यमंत्रीपदासारखे राज्यातले सर्वोच्च सत्ता पद हाती असताना शिवसेनेला पक्ष संघटनेची होणारी पीछेहाट काही रोखता आली नाही. याला शिंदे गटाच्या आमदारांनी प्रामुख्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर युवा सेना प्रमुख व राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना दोषी धरले. जर शिंदे गटाच्या आमदारांच्या भावना लक्षात घेतल्या तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियांमुळे सरकारमध्ये अथवा संघटनेमध्ये सक्रिय राहू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे, ती या आमदाराने मान्य केली. मात्र युवा सेना प्रमुख व माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पक्ष संघटनेमध्ये अधिक लक्ष घालणे गरजेचे होते ही जी काही या आमदारांची संतप्त भावना आहे ती रास्तच आहे.

ज्याप्रमाणे गुलाबराव पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ८० वर्षांचे असून त्यांच्या जिल्ह्यामध्ये तीन ते चार वेळा येऊन गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सातत्याने त्यांच्या जिल्ह्याचे दौरे केले, मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांना एकदाही आमच्या जिल्ह्याचा दौरा करावा, सर्वसामान्य जनतेच्या शिवसैनिकांच्या व्यथा वेदना जाणून घ्याव्यात, असे वाटले नाही. त्यांचे प्रकृती अस्वास्थ्य हे एक वेळ समजले जाऊ शकते, मात्र आदित्य ठाकरे तर तरुण आहेत, त्यांनी महाराष्ट्राचे दौरे का केले नाहीत. अशा कुठल्याच हालचाली गेल्या अडीच वर्षात होताना दिसल्या नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये त्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त होऊ लागली. आणखी दोन वर्षांनी जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा कोणत्या तोंडाने मतदारसंघात मते मागायची असा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे अखेरीस जो लढवय्या नेता आहे, जो सर्वसामान्य शिवसैनिकांची गार्‍हाणी ऐकून घेतो, अशा माजी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जर या आमदारांनी उभे राहण्याचे ठरवले तर त्यात गैर काय केले, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.

शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाच्या आमदारांनी केलेला हा उठाव मान्य नसून ते याची संभावना गद्दार, बैमानी, दगाबाज आणि बंडखोर अशांमध्येच करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार या आमदारांनी सूरतमधून अथवा गुवाहाटीमधून आपल्याशी बोलण्याऐवजी मुंबईत येऊन प्रत्यक्षात समोरासमोर म्हणणे मांडावे, मात्र एकूणच जर गेल्या पंधरा दिवसांमध्ये ही परिस्थिती लक्षात घेतली तर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे शिवसेना आमदारांच्या भावना जाणून घेण्यात कुठेतरी कमी पडले ही वस्तुस्थिती उद्धव ठाकरे यांनी मान्य करण्याची गरज आहे. सेनापती हा सर्वस्वीपणे त्याच्या सैन्याच्या बळावर युद्ध जिंकत असतो. एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे म्हणे अथवा बंडखोरीने म्हणा शिवसेनेचे विधिमंडळातील सैन्य हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी गेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्याच सरदाराकडून मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची वेळ आली. अजून तरी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे होणारे भविष्यातील नुकसान टाळण्याकरता सामंजस्याने, शांततेने आणि सलोख्याने या परिस्थितीतून मार्ग काढणे अत्यंत गरजेचे आहे.