घरसंपादकीयअग्रलेखभारतरत्नांची खैरात!

भारतरत्नांची खैरात!

Subscribe

भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून दिला जाणारा पुरस्कार आहे, त्यामुळे जसे इतर पद्मश्री पुरस्कार जास्त प्रमाणात जाहीर होतात, त्या तुलनेत भारतरत्न पुरस्कार होत नाहीत. त्याचे प्रमाण अगदी मोजके असते. काही वर्षे अशीही गेली आहेत की, त्यावर्षी भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला नाही. हा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला निश्चित करताना पुरस्कार समितीकडून अनेक निकष लावले जातात, त्यातून पुरस्काराची निश्चिती केली जाते. काही वेळा तर विशिष्ट नेत्याला भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केली जाते, तरीही ते सहजासहजी दिले जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी महाराष्ट्रातून होत आहे, पण त्याची केंद्र सरकार दखल घेताना दिसत नाही.

हिंदुत्ववादी मानले जाणारे सरकार बहुमतात केंद्रात आल्यानंतरही सावरकरांना भारतरत्न दिले जात नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारकडून पंधरा दिवसांच्या अवधीत चक्क ५ जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. त्यामुळे आश्चर्यच नव्हे तर अनेकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि त्या राज्यातील ओबीसींचे मोठे नेते दिवंगत कर्पुरी ठाकूर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यापाठोपाठ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारताचे दोन माजी पंतप्रधान दिवंगत चौधरी चरण सिंह आणि पी. व्ही. नरसिंह राव, तसेच भारतातील कृषीक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केले. भारतरत्न पुरस्कार इतक्या मोठ्या प्रमाणात कसे काय जाहीर झाले, असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. काँग्रेसच्या राजवटीत त्यांनी ज्या मान्यवरांच्या योगदानाची उपेक्षा केली, त्यांना सन्मानीत करण्याचा या मागे हेतू आहे की, काँग्रेसवर सरशी मिळवण्यासाठी हे पुरस्कार देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर जे आभार प्रदर्शनाचे भाषण केले, त्यातील बहुतांश भाग हा काँग्रेसवर टीका करणारा होता. अगदी पंडित नेहरूंनी भारतीयांना आळशी आणि कमकुवत म्हटले होेते. इतकेच नव्हे, तर नेहरू कसे आरक्षणाचे विरोधक होते, असे अनेक मुद्दे भरभरून उगाळण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी विरोधक आहेत, असा प्रचार राहुल गांधी यांनी त्यांच्या न्याय यात्रेत सुरू केला. ओबीसींची देशात मोठी संख्या आहे. त्याचसोबत बिहारसारख्या मोठ्या राज्यात भाजपला सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे बिहारमधील नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांची कोंडी करणे आवश्यक होते. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बिहारमधील राजकीय परिस्थिती बदलली.

मोदींच्या विरोधात देशातील विरोधकांची इंडिया आघाडी उभारून पहिली बैठक पाटणामध्ये घेणारे नितीश कुमार इंडिया आघाडीला पोरके करून भाजपच्या पंगतीला येऊन बसले. भारतरत्न पुरस्कारामुळे झालेले हे परिवर्तन मोदींनी पाहिले. लालकृष्ण अडवाणी यांना मानणारा एक वर्ग भाजपमध्ये आहे. कारण राम मंदिरासाठी रथयात्रा काढून देशात हिंदुत्वाची लाट अडवाणी यांनी निर्माण केली होती. त्यामुळेच पुढे बाबरी मशिदीचे पतन झाले. त्यानंतर लोकसभेत भाजपच्या दोन खासदारांचे दोनशे खासदार झाले. त्यातून भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार केंद्रात सत्तेत आले, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर अडवाणी यांच्यासोबत ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्यात आले होते. त्यामुळे मोदींविषयी नाराजी होती. अडवाणींना भारतरत्न जाहीर करून मोदींनी ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, असे मानण्यास वाव आहे.

- Advertisement -

राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव यांनी खर्‍या अर्थाने काँग्रेसला सावरले. कारण त्यावेळी सोनिया गांधी नवख्या होत्या. ज्या नरसिंह राव यांनी गांधी घराणे आणि काँग्रेससाठी बुद्धी आणि शक्ती पणाला लावली, त्यांची गरज संपल्यावर काँग्रेसने पार उपेक्षा केली होती. सगळ्या पंतप्रधानांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार दिल्लीत केले जातात आणि त्यांची समाधी दिल्लीत बांधली जाते, पण काँग्रेसने नरसिंह राव यांच्याबाबतीत तसे होऊ दिले नाही. त्यामुळे ज्यांनी काँग्रेससाठी स्वत:ला समर्पित केले, त्यांचे काँग्रेसने काय केले, असा प्रश्न आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग हे शेतकरी नेते होते, विशेष म्हणजे आणीबाणीच्या काळात त्यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात झुंज दिली होती. इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीविरोधात लढून आम्ही या देशातील लोकशाही वाचवली, असे भाजपचे नेते ठासून सांगतात. ते देशाचे दुसरे स्वातंत्र्य युद्ध होते. त्यामुळे जे आणीबाणीच्या विरोधात होते, त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असावा. भारतामध्ये जेव्हा अन्नाचा दुष्काळ पडला होता, तेव्हा कृषीशास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी धान्याच्या नव्या जाती निर्माण करून अन्नधान्याच्या बाबतीत देशाला सक्षम केले, पण इतकी वर्षे झाली तरी त्यांची दखल घेतली गेली नव्हती. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे, मोदींचे लक्ष आता चारसो पारचे आहे, त्यामुळे त्यासाठी जे शक्य आहे, ते सगळे करताना दिसत आहेत. त्यातूनच ही भारतरत्नांची खैरात तर होत नाहीना, असे वाटण्यास बराच वाव आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -