एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाल्यापासून क्रिकेट चाहते आणि तज्ज्ञांकडून दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातील पहिला प्रश्न म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफचा करार वाढणार का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन अर्थात रोहित शर्मा कर्णधारपदी राहणार का? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) झटपट निर्णय घेत यापैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर अगदी चुटकीसरशी दिले आहे. बीसीसीआयने राहुल द्रविड आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफसोबतचा करार वाढवल्याने द्रविडच यापुढे भारतीय संघाचे प्रशिक्षक असतील.
द्रविड यांच्यासोबतचा करार नेमका किती कालावधीसाठी वाढवण्यात आला याचे स्पष्ट उत्तर बीसीसीआयने दिले नसले तरी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जून २०२४ मध्ये होणार्या टी-२० विश्वचषकापर्यंत द्रविड प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळतील हे मात्र निश्चित आहे, तर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर अजून अंतिम निर्णय व्हायचा आहे. वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही पातळ्यांवर सर्वोत्तम कामगिरी करूनही एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक हातातून निसटल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही कमालीचे नाराज आहेत. दोघांची ही नाराजी लपून राहिलेली नाही. याचे कारण म्हणजे फॉर्मात असलेल्या या दोन्ही अनुभवी शिलेदारांचा हा बहुधा शेवटचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक होता.
पुढचा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक हा दक्षिण आफ्रिकेत २०२७ साली होणार आहे. तोपर्यंत रोहितचे वय ४० वर्षे आणि विराट ३९ वर्षांचा असेल. या दोघांनाही भारतीय संघात स्थान असेल किंवा नसेल काही सांगता येत नाही. त्यामुळे मोठी संधी गमावल्याची दोघांनाही जाणीव आहे. यातूनच नव्या पिढीच्या हाती सूत्रे सोपवताना रोहित आणि विराटने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. सध्या हे दोघेही लंडनमध्ये विश्रांती घेत असून त्यांनी सफेद चेंडूच्या क्रिकेट प्रकारातून तूर्तास आपल्याला वगळावे, अशी विनंती बीसीसीआयला केल्याचे कळते. बीसीसीआयनेदेखील ही विनंती मान्य केली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर जात असून तेथे १० डिसेंबरपासून २ कसोटी सामने, ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी के. एल. राहुल आणि टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, मात्र कसोटीत रोहित आणि विराट हे दोघेही संघात सामील असून कसोटीचे नेतृत्व रोहितच करणार आहे. रोहित आणि विराट या दोघांनीही मागील वर्षभरापासून टी-२० सामना खेळलेला नाही. मागील टी-२० विश्वचषक हा ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये झाला होता. या विश्वषचकात १० नोव्हेंबर २०२२ रोजी उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड एकमेकांना भिडले होते. हा या दोघांचाही अखेरचा टी-२० सामना होता. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यापासून दोघांनीही टी- २० पासून दूर राहणेच पसंत केले. तेव्हापासून कधी हार्दिक पंड्या, कधी जसप्रीत बुमराह, कधी के. एल. राहुल तर कधी सूर्यकुमार यादव भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सांभाळत आहेत.
बीसीसीआय आगामी टी-२० विश्वचषक २०२४ साठी नवीन भारतीय संघ तयार करत आहे. नव्या संघ बांधणीच्या उद्देशानेच बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी युवा क्रिकेटपटूंची निवड केली आहे. त्यानुसार आगामी टी-२० विश्वचषकात हार्दिक पंड्याच या नव्या संघाचे नेतृत्व करेल, असे म्हटले जात होते, परंतु बीसीसीआयच्या मनात वेगळेच काहीतरी सुरू आहे. हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. याच कारणामुळे तो दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यालाही मुकला आहे. विश्वचषकापर्यंत तो तंदुरूस्त होऊन भारतीय संघात परतेलही, परंतु हार्दिकऐवजी रोहितनेच विश्वचषकात भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करावे, असे बीसीसीआयला वाटत आहे. यासाठी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी रोहितची मनधरणी करत असल्याचे समजत आहे.
रोहितच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा हेतू यामागे असल्याचे दिसत आहे. भलेही मला कर्णधार केले नाही तरी चालेल, परंतु तळ्यात मळ्यात न करता अवघ्या ६ महिन्यांवर आलेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व कुणी करावे याचाही ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी इच्छा स्वत: रोहित शर्मानेच बीसीसीआयकडे व्यक्त केली होती. त्यानुसार बीसीसीआयने रोहितच कर्णधारपदी असावा हे जवळपास निश्चित केल्याचे समजत आहे. कर्णधारपदाची जबाबदारी शिरावर आल्यापासून स्वत: रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय संघाची बांधणी केली होती.
प्रत्येक खेळाडूवर ठरावीक जबाबदारी सोपवणे, त्यांच्या कौशल्याचा अचूक वापर करून घेणे आणि ड्रेसिंग रूममधील वातावरण मोकळे ठेवणे या त्रिसूत्रीच्या जोरावरच भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. दुर्दैवाने या जोडगोळीला विश्वचषक वा जागतिक कसोटीचे अजिंक्यपद मिळवण्यात यश आले नाही. द्रविड यांना टी-२० विश्वचषकापर्यंत प्रशिक्षकपदी कायम ठेवावे, अशी बीसीसीआयकडे मागणी करणार्यांमध्ये रोहित शर्माच पुढे होता. त्यामुळे आता बीसीसीआयच्या इच्छेचा मान राखून रोहितने भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदी कम बॅक करावे आणि या जोडगोळीने मिळून तमाम भारतीयांचे विश्वचषकाचे लांबलेले स्वप्न पूर्ण करावे, हीच क्रिकेेटप्रेमींची इच्छा.