चीनशी दोस्ती प्राणाशी गाठ!

संपादकीय

भारताचे शेजारी असलेले आणि भारताशी सांस्कृतिक नाते असलेल्या श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन देशांमधील परिस्थिती सध्या अतिशय बिकट झालेली आहे. या दोन्ही देशांमध्ये सध्या महागाईने कहर केलेला आहे. त्यामुळे लोकांसमोर कसं जगायचं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी आपल्याच राजकारणात आणि वर्चस्वाच्या लढाईत मश्गुल आहेत. लोकांच्या पोटापाण्याशी त्यांना काही देणेघेणे नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे जनतेचा उद्रेक होताना दिसत आहे. जगण्याचे सगळेच मार्ग बंद झाल्यामुळे सुरुवातीला सौम्य स्वरुपात आंदोलन करणारे लोक आता अधिक आक्रमक झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात आंदोलन करताना दिसत असून श्रीलंकेत त्याने परिसीमा गाठली आहे. सरकारविरोधी आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षांच्या राजेशाही निवासस्थानात प्रवेश करून तेथील जेवणाखाण्यापासून ते अगदी तिथे असलेल्या तरणतलावात यथेच्छ अंघोळ केली. काहींनी तेथील गाद्यांवर उड्या मारल्या.

लोकांचा आक्रमकपणा पाहून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान लोकांना आणि देशाला वार्‍यावर सोडून पळून गेले आहेत. त्यामुळे श्रीलंकेत सध्या अनागोंदी निर्माण झालेली आहे. श्रीलंका भारताच्या अगदी जवळ असल्यामुळे अशा अनागोंदीच्या वेळी जेव्हा लोकांचे खाण्याचेही वांदे होतात, तेव्हा ते जवळच्या देशात आश्रय घेतात. त्यामुळे श्रीलंकेतून असे बरेच लोक छुप्या मार्गाने भारतात आल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशाच प्रकारे बांगलादेशातील अनेक लोक पोटापाण्यासाठी छुप्या मार्गाने भारतात प्रवेश करतात. त्यानंतर इकडेच रोजीरोटीची सोय होऊन जाते. श्रीलंकेच्या राज्यकर्त्यांच्या बेफिकीरीमुळे आज त्या देशावर ही परिस्थिती आलेली आहे. पाकिस्तानातही फार वेगळी परिस्थिती नाही. जे आज श्रीलंकेत दिसून येत आहे, तेच उद्या पाकिस्तानात दिसले तर काही आश्चर्य वाटू नये. जसे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात लोकानी शिरून आपला निषेध व्यक्त केला. तसेच पाकिस्तानातील लोक काही काळानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानात शिरून आपला रोष व्यक्त करतील.

कोरोनानंतर एकूणच जागतिक परिस्थिती बदलली आहे आणि बिघडली आहे. कारण कोरोना काळात जी काही जागतिक मंदी आली, अनेक मोठमोठे उद्योग कोसळून पडले. अनेकांची उलाढाल मंदावली. कोरोना महामारीने अमेरिका, रशिया यांच्यासारख्या सुपर पॉवर देशांनाही हादरवून टाकले. त्यांच्या अर्थव्यवस्थांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून सावरताना त्यांची दमछाक झाली. कोरोनाने मोठ्या देशांची स्थिती खराब करून टाकली तर मग छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थेचे काय होणार हे स्पष्ट होते. त्यांची पुरती वाट लागली. कोरोनाच्यानंतर रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाले. गेले काही महिने ते सुरूच आहे, एका बाजूला अमेरिका, युरोपीय राष्ट्रे युक्रेनच्या बाजूने तर दुसर्‍या बाजूला रशिया अशी रेटारेटी सुरू आहे, पण त्याचा फटका जगातल्या छोट्या देशांना जास्त बसला. श्रीलंका आणि पाकिस्तान हे भारताचे केवळ शेजारी देश नव्हे, तर ते काही वर्षांपूर्वी भारताचाच भाग होते, पण या दोन देशांमधील राज्यकर्त्यांना दुर्बुद्धी सूचते आणि चीनच्या प्रलोभनाला बळी पडतात. भारत हा त्यांच्याशी सांस्कृतिकदृष्ठ्या जवळचा असल्याचे विस्मरण त्यांना होते.

चीनशी दोस्ती म्हणजे असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, अशी परिस्थिती आहे, पण त्यांना ते पटत नाही, शेवटी त्याची परिणती अतिशय घातक अवस्थेत होते, त्याचा अनुभव हे दोन्ही देश सध्या घेत आहे. या देशातील सामान्य जनता आलेल्या आर्थिक संकटात भरडून निघत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा पडला आहे. बाजारात वस्तूच उपलब्ध नाहीत, असल्या तर फारच कमी यामुळे महागाईने कहर केला आहे. बाहेरच्या देशातून वस्तू विकत घ्याव्या तर सरकारकडे परकीय चलन नाही. इंधनाचा प्रचंड तुटवडा आहे. अशा स्थितीत भारताकडून श्रीलंकेला हजारो टन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे, पण येथील सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष गोतबया राजपक्षे, पंतप्रधान रनील विक्रमसिंघे यांनी जनक्षोभाला घाबरून आपल्या निवासस्थानांमधून पळ काढला आहे. आर्थिक संकटात होरपळून निघालेली जनता राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानांमध्ये शिरून निषेध व्यक्त करत आहेत. पंतप्रधानांचे निवसास्थान जाळण्यात आले आहे. ही परिस्थिती पाहिल्यावर सध्या श्रीलंकेची किती वाईट अवस्था झालेली आहे हे लक्षात येऊ शकेल.

भारताच्या शेजारच्या छोट्या देशांना आपल्याकडे वळवून भारताच्या भोवती पाश आवळण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात आहे. पाच वर्षांपूर्वी निर्माण झालेले आर्थिक संकट हेरून चीनने श्रीलंकेत शिरकाव केला. श्रीलंकेने हंबनटोटा बंदराच्या विकासासाठी चीनकडून मोठे कर्ज घेतले होते. ते चुकते करण्यासाठी श्रीलंकेने स्वत:ची भागीदारी विकली. विरोधी पक्षाने विक्रमसिंघे सरकारवर देशाची संपत्ती विकल्याचा आरोप केला. त्यानंतर कर्ज चुकते करता येत नसेल तर बंदरावर आपली मालकी सांगण्यास चीनने सुरुवात केली, तेव्हा कुठे श्रीलंकेच्या राज्यकर्त्यांना जाग आली. त्यात पुन्हा श्रीलंकेतील सत्ता ही राजपक्षे कुटुंबाची खासगी मालमत्ता असल्याच्या आविर्भावात ही मंडळी वागत आहेत. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याविषयी खूप चीड आहे. विक्रमसिंघे सध्या सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचे गाजर दाखवून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसर्‍या बाजूला पाकिस्तानमध्येही काही फार वेगळी परिस्थिती नाही. इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान असल्यापासून त्यांना पंतप्रधान निवास भाड्याने लावण्याची वेळ आली.

सध्या पाकिस्तानवरही मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे. त्याखाली सामान्य जनता भरडली जात आहे, पण राज्यकर्ते खुशाल आहेत. या कर्जाच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानकडून पाक व्याप्त काश्मीरमधील गलगीट आणि बाल्टिस्तान चीनला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. पाकिस्तानने अगोदरच सियाचीनचा भाग चीनला देऊन भारतासमोर आव्हान उभे केले आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान चीनच्या नादाला लागून भारताशी गद्दारी करत आहेत, पण आता त्याचीच फळे त्यांना भोगावी लागत आहेत. आज श्रीलंकेमध्ये अनेक गोष्टींचा तुटवडा पडलेला असताना त्यांना भारत मदत करत आहे, त्यांना चीनने वार्‍यावर सोडले आहे. पाकिस्तानची जेव्हा चीन सगळ्या बाजूंनी कोंडी करेल तेव्हा त्यांना भारताची आठवण येईल. चीन हे महत्वाकांक्षी राष्ट्रे आहे, आशियातील आपला स्पर्धक असलेल्या भारताला त्याला रोखायचे आहे, त्यामुळे भारताभोवतीच्या देशांना तो दुबळे करून आपल्या ताब्यात घेत आहे, पण त्यात त्या देशांचेच नुकसान आहे हे त्यांना कळत नाही, हेच त्या देशांचे दुर्दैव म्हणावे लागेल.