घरसंपादकीयअग्रलेखझाले मोकळे आकाश...

झाले मोकळे आकाश…

Subscribe

देशभरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असताना दुसरीकडे उत्तराखंडमध्ये चारधाम प्रकल्पाचे काम करणार्‍या ४१ मजुरांवर काळाचे सावट पसरले होते. या प्रकल्पांतर्गत उत्तरकाशीच्या सिलक्यारा ते बारकोटदरम्यान पाच किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येत आहे. याच बोगद्यातील वरचा भाग १२ नोव्हेंबर रोजी म्हणजे अभ्यंगस्नानाच्या दिवशी कोसळला आणि त्यात ४१ मजूर अडकून पडले. त्यांना सुखरूपपणे बाहेर काढणे हे तितके सोपे नव्हते, परंतु प्रत्यक्षात या मजुरांचे प्राण वाचविणे हे मोठे आव्हानच बनले आहे, असे हळूहळू स्पष्ट व्हायला लागले. केवळ भारतीयच नव्हे तर विदेशी तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. दिवस-रात्र काम सुरू होते.

या ४१ मजुरांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली जात होती. बोगद्याच्या आत अडकून पडलेल्या मजुरांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात आले. त्यापाठोपाठ अन्न-पाणी, औषधे आणि वीजही उपलब्ध करून देण्यात आली. त्यांचा जेव्हा पहिला व्हिडीओ समोर आला तेव्हा ते सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनाच आनंद झाला. इतकेच काय त्यांच्या संपर्काची व्यवस्थाही केली होती. त्यामुळे ते आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकले. तोच एक आधार या मजुरांसाठी होता. आत अडकलेल्या मजुरांशी बोलून त्यांना धीर दिला जात होता. बाहेर या मजुरांना वाचविण्यासाठी अथक प्रयत्न करणार्‍यांसाठी तोच आशेचा किरण होता.

- Advertisement -

या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात आला, मात्र निसर्गापुढे अत्याधुनिकतेने गुडघे टेकले. अमेरिकेच्या ऑगर मशीनने ४८ मीटरपर्यंत दगड, मातीचा ढिगारा हटवला होता, पण ढिगार्‍यात अडकून त्याची पातीही बंद पडली, पण बचाव यंत्रणांनी हार मानली नाही. शेवटच्या टप्प्यातील १० मीटरचा बोगदा खणण्यासाठी हाताने बोरिंग करण्यास सुरुवात केली. यासाठी १२ रॅट मायनर्सचे पथक बोलावण्यात आले आणि त्यांच्या मदतीने हे सर्व मजूर सुरक्षित बाहेर आले.

‘उम्मीद पर दुनिया कायम है’, अशी हिंदीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय क्षणाक्षणाला येत होता. त्यामुळे सुटका नक्की होईल, हाच आशेचा दिवा त्या ४१ मजुरांबरोबरच बचावकार्य करणार्‍या प्रत्येकाच्या हृदयात तेवत होता. तब्बल १७ दिवसांनी म्हणजेच २८ नोव्हेंबरला संध्याकाळी उशिरा याच ‘दिव्यां’नी उत्तरकाशीचा परिसर उजळून निघाला आणि दिवाळी साजरी झाली. या सर्व मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली. केवळ हे ४१ मजूरच नव्हे तर त्यांचे कुटुंब आणि आप्त तसेच मित्रांसाठी हे आनंदाचे क्षणच ठरले.

- Advertisement -

बोगद्याबाहेर तब्बल ४० रुग्णवाहिका तैनात ठेवल्या होत्या. त्यातून या मजुरांना नजीकच उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम असल्याचा निर्वाळा देण्यात आला. बचाव पथकाच्या या मेहनतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सर्वांच्या संपर्कात राहून प्रत्येक घडामोडीची माहिती घेत होते. बोगद्यातून सुखरूप सुटका करण्यात आलेल्या मजुरांशीदेखील त्यांनी फोनवरून संपर्क साधला. त्यांचा हालहवाल जाणून घेतानाच त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. तसेच या मजुरांना निरोगी आयुष्यदेखील चिंतीले. बचावकार्य यशस्वीपणे राबवून सर्वांनी माणुसकी आणि टीमवर्कचा एक अनोखा मिलाफ घडविला असल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे या आनंदोत्सवाचे वातावरण असतानाच दुसरीकडे अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडले आहे. एका अर्थाने एका डोळ्यात आनंदाश्रू आणि दुसर्‍या डोळ्यात दु:खाश्रू अशी स्थिती आहे. राज्यात थंडीची चाहूल लागत असतानाच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नोव्हेंबरच्या अखेरीस दक्षिण भारतासह महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. हे संकट अजूनही शेतकर्‍यांच्या डोक्यावर आहे. राज्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सहा नागरिकांचा मृत्यू झाला. सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बुलडाणा आणि नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. खान्देशात ऊस, केळी, पपई, मका आणि तूर या पिकांना फटका बसला. विदर्भात संत्री, कापूस पिकांचे नुकसान झाले.

आधीच मान्सून कमी झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात अवकाळीमुळे बळीराजाची स्थिती दयनीय झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारी होऊन हवालदिल झालेला आपला बळीराजा टोकाचे पाऊल उचलत आहे. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रत्येक सरकार म्हणत असले तरी त्याचा फारसा लाभ शेतकर्‍यांना होताना दिसत नाही. दुष्काळ आणि अवकाळीमुळे महागाईचे चटके आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यात शेतकर्‍याबरोबरच नोकरदार किंवा रोजंदारीवर काम करणारा भरडला जाणार आहे.

आधीच गॅस, वीजबिल, धान्य, डाळी, खाद्यतेले यांचे दर वाढत असताना शैक्षणिक शुल्क व अन्य खर्चाचा भारही वाढताच आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालताना सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येत आहेत. शिवाय रोजगाराचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. या सर्वांनाही त्या त्या अंधार्‍या बोगद्यातून बाहेर काढण्याची गरज आहे. भारत आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे याचे कौतुक तर आहेच, पण सर्वसामान्यांच्या जीवनात साठलेला अंधार दूर होऊन आकाश मोकळे झाले पाहिजे, हीच माफक अपेक्षा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -