घरसंपादकीयअग्रलेखबाईच्या नादानं देशभान गमावलं!

बाईच्या नादानं देशभान गमावलं!

Subscribe

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर निवृत्तीला सहा महिने बाकी असताना हनीट्रॅपमध्ये फसले. सहा महिने मोबाईलच्या माध्यमातून ते पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या एका महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला देशाला सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, अशी माहिती पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

वास्तविक, डॉ. कुरुलकर यांचा क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्याची प्रणाली, लष्करी अभियांत्रिकी साहित्य, अत्याधुनिक असे रोबोटिक्स तंत्रज्ञान, लष्करी वापरासाठी मानवरहित तंत्रज्ञान या विषयांमध्ये हातखंडा आहे. इतक्या बुद्धिमान आणि प्रतिष्ठित अधिकार्‍याकडून अशी घोडचूक होईल अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. याच हनी ट्रॅप प्रकरणात नागपूर येथील वायुदलातील कर्मचारी निखिल शेंडे याचे नावही पुढे आले आहे. कुरुलकरला शेंडेच्या मोबाईलवरून मेसेज आल्याचे तपासात उघड झाले आहे. पाकिस्तानी हेर झारा ही निखीलच्या नंबरवरून कुरुलकरला मेसेज करायची. झाराने निखिलचा नंबर का आणि कसा वापरला याबाबत एटीएसकडून तपास सुरू आहे. याचा अर्थ हे एक मोठे ‘रॅकेट’ आहे हे स्पष्ट होते. पाकिस्तानात सध्या अराजक माजले आहे. दुसरीकडे भारताची कोंडी करण्यासाठी चीन एकही संधी दवडताना दिसत नाही.

- Advertisement -

अशावेळी कुरुलकर अन्य देशांच्या संपर्कात होते आणि तिथून त्यांच्या अकाऊंटवर पैसेही येत होते, हे लक्षात घेतले म्हणजे नक्की कोणते कारस्थान शिजत होते, असा प्रश्न पडतो. त्यानंतर आता कुरुलकर याचे कनेक्शन नाशिकपर्यंत पोहोचल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे चिंतेत अधिक वाढ झाली आहे. यासंदर्भात एटीएसने त्यांच्या नाशिक युनिटला दोन मोबाईल क्रमांक पाठविले आहेत. त्याद्वारे तपास करण्याची सूचना केली आहे. नाशिकमध्ये देवळाली कॅम्प येथे डीआरडीओचे महत्त्वाचे युनिट आहे. त्यामुळे आता नाशिक येथील दोन मोबाईलचा वापर कोणाकडून केला जात होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण खात्यातील आणखी काही अधिकारी हनी ट्रॅपचे शिकार झालेले नाहीत ना, या गंभीर बाबीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्येही दिल्ली पोलिसांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करणार्‍या एका वाहनचालकाला अटक केली होती. तो पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीला गुप्त माहिती पुरवत होता.

देशाच्या थेट संरक्षणाशी संबंधित असलेले अधिकारी या मधुजालात कसे अडकतात, ते अडकत असताना त्यांच्यावर झालेले राष्ट्रप्रेमाचे संस्कार कोठे जातात, इतक्या मोठ्या पदांवर आणि संशोधन प्रणालीमध्ये सक्रिय शास्त्रज्ञांनी नेमकी कुठली माहिती शत्रू देशाला पुरविली, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. खरे तर संरक्षण क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम करणार्‍यांना हनी ट्रॅपमध्ये अडकू नये, याचे प्रशिक्षण दिलेले असते. युद्धनीतीशी संबंधित काही पुस्तकांमध्येही याचा उल्लेख आढळतो. यानुसार परदेशामध्ये दूतावासात गेल्यानंतर तेथे कशा पद्धतीने विशिष्ट महिला मोहिनी घालतात? लक्ष वेधून घेण्याचा कसा प्रयत्न करतात? अधिकार्‍याच्या स्थानिक भाषेत संवाद साधून कसे आपलेसे करण्याचा प्रयत्न होतो? यांचा उल्लेख या पुस्तकांत आहे. बी. रमण यांच्या ‘द काऊबॉयज ऑफ रॉ : डाऊन मेमरी लेन’ या पुस्तकातही याचा संदर्भ आढळतो.

- Advertisement -

मॉस्कोमध्ये तैनात असलेल्या एका भारतीय अधिकार्‍याचं एका रशियन डान्सरसोबत प्रेम जुळते. केजीबी ही रशियाची गुप्तहेर संस्था त्या डान्सरच्या माध्यमातून अधिकार्‍यांकडून माहिती उकळण्याच्या प्रयत्नात असते, पण ही माहिती देण्यास अधिकारी स्पष्ट नकार देतो. तो थेट दिल्लीला परतून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना याबाबत सांगतो. यानंतर संबंधित अधिकार्‍याला पुढे सावध राहण्याची सूचना देऊन माफ केले जाते. तेव्हापासूनच भारताच्या परराष्ट्र सेवेतील अधिकार्‍यांना इतर देशांमध्ये अशा प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर राहण्याची सूचना देण्यात येऊ लागली. ती आजतागायत कायम आहे.

लोकप्रिय लेखक पावलो कोएल्हो यांची ‘द स्पाय’ नामक कादंबरीही हनी ट्रॅपवरच आधारित आहे. यातील प्रमुख पात्र आहे ती म्हणजे माता हारी! हनी ट्रॅप हेरगिरीच्या इतिहासात आजवर सर्वाधिक चर्चा नेदरलँडची माता हारीचीच झाली आहे. पहिल्या महायुद्धानंतर तिला तिच्या कारनाम्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिचे खरे नाव मार्गारेट मॅकलियोड होते. आकर्षक नृत्यकलेत ती पारंगत होती. तिला नंतर फ्रान्सच्या फायरिंग स्क्वॉडने गोळी झाडून ठार केलं होतं. जर्मन लष्करासाठी हेरगिरी केल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता. यादरम्यान तिने अनेक फ्रेंच-ब्रिटिश अधिकार्‍यांच्या जवळ जाऊन गुप्त माहिती मिळवली, असाही तिच्यावर आरोप होता.

त्यामुळे हनी ट्रॅप हा काही नवीन प्रकार नाही. भविष्यात तो रोखला जाईल याची शाश्वती देता येत नाही. वास्तविक, पूर्वीच्या काळात लष्करी अधिकार्‍यांचा अन्य महिलांशी सहजपणे संपर्क होत नव्हता. त्यामुळे ते हनी ट्रॅपमध्ये अडकण्याची शक्यता धूसर होती, पण आताच्या सोशल मीडियाच्या काळात कुणाशीही अगदी सहजपणे संपर्क होऊ शकतो. संपूर्ण जग एका क्लिकवर जोडले जाते. त्यामुळे हनी ट्रॅपच्या बाबतीत यापुढे अधिक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. युद्धनीतीतही आता बदल होताहेत. त्या अनुषंगाने भारताला लष्करी कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करावे लागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -