साक्षर केरळमध्ये काळ्या जादूचा पगडा

नरबळीनंतरही काहीच फायदा होत नसल्याने सिंग दाम्पत्य पुन्हा रशिदच्या चरणी गेलं. रशिदवर त्यांची प्रचंड श्रध्दा होती. ग्रहांचा प्रकोप आणि इतर फालतू कारणं देत रशिदने अंधश्रध्देत अखंड बुडालेल्या सिंग दाम्पत्याला आणखी एका महिलेचा बळी दिला पाहिजे, हे पटवून दिलं.

देशात सर्वाधिक साक्षरता असलेलं राज्य म्हणून केरळ राज्याचा अभिमानानं उल्लेख केला जातो. त्याच केरळमध्ये दोन महिलांचा नरबळी घेतल्याचं, इतकंच नाही तर एका महिलेचं मांस विधीपूर्वक खाल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. याघटनेतील मूख्य सूत्रधार तथाकथित भोंदूबाबा विकृत मनोवृत्तीचा आहे. तर पैशांच्या मोहापायी भोंदूबाबाच्या जाळ्यात पती-पत्नी आणि दोन्ही मृत महिला अडकल्याचे स्पष्ट होताना दिसतंय. त्यातूनच केरळमधील आर्थिक विषमताही समोर आली आहे. मुंबईतही तीन वर्षांच्या चिमुरडीचा नरबळी दिल्याच्या संशयावरून एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. सार्‍या देशाला हादरवून टाकणार्‍या आणि काळिमा फासणार्‍या या घटना आहेत. केरळमधील थिरुवल्लाजवळील कोझेंचेरी तालुक्यातील एलंथूर या खेड्यात नरबळीचा प्रकार घडला आहे. गावातील मोहम्मद शफी ऊर्फ रशीदने स्थानिक वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीत सर्व दुःखे घालवून श्रीमंत करू असा दावा केला होता.

ही जाहिरात वाचून भागवल सिंग आणि त्याची पत्नी लैला यांनी रशिदची भेट घेतली. त्यावेळी रशिदने दोघांना श्रीमंत व्हायचं असेल तर एका महिलेचा बळी देऊन त्याचं रक्त शिंपलं पाहिजे, असं सांगत बळीसाठी महिला शोधून आणण्याच्या कामाला जुंपलं. रशिदवर असलेला विश्वास आणि झटपट श्रीमंत होण्याच्या मोहाने पछाडलेल्या भागवल आणि शैलाने नरबळीसाठी सावज शोधायला सुरूवात केली. सिंग दाम्पत्याच्या नजरेत एक महिला आली. त्यांनी तिला आपल्या घरी बोलावलं. त्यानंतर रशिदने तिला पैशांचं आमिष दाखवून सिंग दाम्पत्याच्या मदतीनं त्या निष्पाप महिलेची निर्घृण हत्या केली. तिच्यावर अत्याचारही केले. त्यानंतर विधीच्या नावाखाली अघोरी कृत्य केलं.

नरबळीनंतरही काहीच फायदा होत नसल्याने सिंग दाम्पत्य पुन्हा रशिदच्या चरणी गेलं. रशिदवर त्यांची प्रचंड श्रध्दा होती. ग्रहांचा प्रकोप आणि इतर फालतू कारणं देत रशिदने अंधश्रध्देत अखंड बुडालेल्या सिंग दाम्पत्याला आणखी एका महिलेचा बळी दिला पाहिजे, हे पटवून दिलं. त्यानंतर आणखी एका महिलेला फसवून घरी आणलं गेलं. यावेळी तिची अत्यंत निर्घृणपणे, थंड डोक्यानं हत्या करण्यात आली. तिच्यावरही अत्याचार करण्यात आले. तिच्या शरीराचे एक दोन नव्हे तर तब्बल 56 तुकडे करून घरच्या अंगणात पुरण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे दुसर्‍या महिलेची हत्या केल्यानंतर तिचे मांस खाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. पहिल्या महिलेचा कुणी शोध न घेतल्याने ही हत्या खपून गेली होती. त्यामुळेच मारेकर्‍यांनी दुसरी हत्या करून नरबळी देण्याचा बेत आखला होता. पण, दुसरी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे आल्यानंतर शोध सुरू झाला.

त्यानंतर नरबळीची थरकाप उडवणारी घटना उजेडात आली आहे. गुन्हा कधी लपत नसतो, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं. गायब झालेल्या दुसर्‍या महिलेच्या मोबाईल फोनच्या लोकेशनवरून पोलीस सिंग दाम्पत्याच्या घरापर्यंत पोचले. सुदैवाने सिंग यांच्या शेजार्‍याने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात महिला आढळून आल्यानंतर पोलिसांनी सिंग दाम्पत्यासह भोंदूबाबा रशिदच्याही मुसक्या आवळल्या. दोन्ही महिलांचे मृतदेह सिंगच्या घराच्या अंगणात पुरले होते, तेही पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे नरबळींची घटना समोर आली. नरबळी प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद शफी हा विकृत मनोवृत्तीचा आहे. शफीने या कटाची योजना तयार केली आणि हत्या केली. भगवाल सिंह आणि त्याची पत्नी लैला या दोघांनी त्याला साथ दिली. नरबळी देण्यासाठी दोन्ही महिलांना पैशांचं आमिष दाखवून आणलं गेलं होतं. रोजलीला पॉर्न चित्रपटात अभिनय करण्यासाठी 10 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पदमाला सेक्सुअल सर्व्हिससाठी 15 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. शफीवर बलात्कार, चोरी आणि हत्येचा प्रयत्न अशा 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. शफी हा सहावी नापास आहे. त्याने 17 व्यावर्षी घर सोडले आणि वेटर, ट्रक चालक आणि मॅकॅनिक म्हणून काम केले आहे.

ही घटना ताजी असताना मुंबईत एका परदेशी नागरिकाला नरबळीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आपल्यावर कुणीतरी काळी जादू केली असा एका परदेशी नागरिकांचा संशय होता. मुंबईत येऊन त्याने एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा नरबळी दिला. याप्रकरणात पोलीस तपास करत असून त्याबाबत आणखी खुलासा होणं बाकी आहे. नरबळीच्या या दोन्ही घटनांनी देश हादरून गेला आहे. त्यातच केरळसारख्या शिक्षणात सर्वात अग्रेसर असलेल्या राज्यात काळिमा फासणारी, निर्घृण नरबळीची घडलेली घटना धक्कादायकच आहे. केरळ राज्य तसं पाहिलं तर संपन्न राज्य म्हणून गणलं जातं. याराज्यातील प्रत्येक कुटुंबातील एखाद-दुसरी व्यक्ती परदेशात नोकरीला आहे. मुंबईसारख्या अनेक बड्या रुग्णालयांमध्ये काम करणार्‍या नर्सेसमध्ये सर्वांधिक केरळमधील नर्सेस पहायला मिळतात. पर्यटनाने केरळला समृध्द केलेलं आहे. असं असतानाही आर्थिक उन्नतीसाठी एका बोगस बाबांच्या नादी लागून दोन नरबळी दिले जातात, ही बाब चिंताजनकच आहे. सिंग दाम्पत्याला झटपट पैसा हवा होता. तर रोजलीला आणि पदमाला या दोन महिलांना पैशाच्या मोहानेच आपला जीव गमावला. केरळ वरवर समृध्द वाटत असलं तरी एक वर्ग अद्यापही आर्थिकदृष्ठ्या पिछडा असल्याचे वास्तव समोर आले आहे. या नरबळीनंतर आता राजकारणही तापू लागलं आहे. आपल्या देशात कोणतीही घटना घडली की, त्याला राजकीय रंग देण्याची प्रथा पडू लागली आहे.

सत्ताधार्‍यांवर तोंडसुख घेण्यासाठी विरोधक संधी शोधतच असतात. महाराष्ट्रात सध्या राजकीय संघर्षातून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपातून राजकारण कुठल्या थराला जाऊ पाहतंय, हे दाखवून दिलं आहे. केरळमधील घटनेनंतर आता मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना भाजपने टीकेचं लक्ष्य केलं आहे. केरळमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून डाव्यांचं राज्य आहे. भाजपला केरळमध्ये पाहिजे तसा अजूनतरी जनाधार मिळताना दिसत नाही. त्यामुळे भाजपने नरबळीप्रकरणी सत्ताधार्‍यांवर आसूड ओढायला सुरुवात केली आहे. केरळमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजाचा वरचष्मा आहे. केरळ राज्यात हिंदू अल्पसंख्याक मानला जातो. केरळमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लीम समाजात कधीही जातीय संघर्ष झालेला नाही. पण, हिंदू-मुस्लीम आणि हिंदू-खिश्चन समाजात अनेकदा संघर्ष झाले आहेत. त्यामुळे भाजपने नरबळी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनाच केलेलं लक्ष्य आश्चर्य वाटण्यासारखं नाही. अशी काळजाचा थरकाप उडवणारी घटना भाजपप्रणित राज्यात घडली असती तर विरोधकांनी हेच केलं असतं. पण, अशा घटनांकडे राजकारणापलीकडे पाहून पुन्हा असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.