अवकाळी अटळ, दूरदृष्टीची गरज!

संपादकीय

विधिमंडळाच्या अधिवेशनात सातत्याने शेतकर्‍यांचा प्रश्न गाजतोय, तर दुसरीकडे सरकारही कुचकामी निर्णय घेऊन शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी अवकाळी पावसानेही शेतकर्‍यांना हतबल करण्याचा ‘उद्योग’ सुरूच ठेवला आहे. बुधवारी रात्रीपासून पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे असणार आहेत. नेमेचि येतो मग पावसाळा… या उक्तीप्रमाणे नेमेचि येते मग अवकाळी… असे म्हणायची वेळ यामुळे आली आहे. गेल्या दशकभरात हा पाऊस अवकाळी राहिला नसून नियमित झाला आहे.

बदलत्या हवामानामुळे अवकाळीची तीव्रता आणि परिणाम प्रकर्षाने जाणवत आहेत. उत्पादन वाढीसाठी कितीही नियोजन केले तरी अनियमित पावसामुळे शेतकर्‍यांचा फज्जा उडत आहे. गेल्या तीन वर्षात केवळ अवकाळी पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई, रायगड, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, वर्धा, अकोला, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, अमरावती यांसह राज्यातील इतरही काही ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी विजा कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे सर्वाधिक नुकसान आंबा आणि द्राक्षबागांचे झाले. दोन्हीही पिके काढणीला आलेली असतानाच पाऊस पडला. वातावरणातील बदलामुळे आंब्याचा मोहोर गळाला आहे, तर द्राक्षाची मणीगळ झाली आहे. काढणीला आलेली पिकेच नाहीत, तर रब्बी हंगामातील पिकांचेही या पावसामुळे नुकसान झाले आहे.

ज्वारी पिकावर शक्यतो किडीचा प्रादुर्भाव नसतो, पण यंदा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. मका, केळी आणि पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, बाजरी, कांदा व काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाले. अनेक पिके भुईसपाट झाली. शेतमालाला बाजारपेठेत उठाव कमी आहे. त्यातच पिकाच्या भरोशावर असलेला शेतकरी अवकाळीमुळे हताश झाला आहे. शेतकर्‍यांचे तारणहार असलेल्या राज्य सरकारकडूनच शेतकर्‍याला आता काय ती आशा आहे. कर्जमाफीप्रमाणे शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई मिळाल्यास मोडकळीस आलेले संसार सावरू शकतील. कागदी घोडे न नाचविता प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून वेळीच मदतीचा हात दिला तरच बळीराजा हिमतीने पुन्हा उभारी घेऊ शकेल. खरिपाचा हंगाम अतिपावसामुळे हाती आला नाही. पुरेसे पाणी जमिनीत आणि विहिरीत असल्याने शेतकर्‍यांची सगळी मदार रब्बीवर होती, पण घोंगावत आलेल्या पावसाने अवघ्या काही तासांत ही उरलीसुरली आशाही संपुष्टात आणली. त्यामुळे पिकांचे आणि त्या अनुषंगाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे असा अवकाळी पाऊस हा वर्षभर कायम राहणार असल्याने पिके जोपासायची कशी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. निसर्गाच्या लहरीपणाचे मोठे संकट शेतकर्‍यांसमोर राहणार आहे, तर याच्या व्यवस्थापनासाठी अधिकच्या खर्चाचा भारही सहन करावा लागणार आहे. हवामानशास्त्र आताशी कोठे जरा अंदाज बरोबर सांगत आहे, पण यामध्ये मोठे काम होणे बाकी आहे. यंत्रणा सुधारल्या आहेत, पण त्या शेतकर्‍यांपर्यंत अजून म्हणाव्या तशा पोचल्या नाहीत. त्या पोचल्या तर कदाचित काही नुकसान तरी कमी करता येईल, पण तेही २ ते ५ टक्के इतकेच. तेही ठोस असे काही नाही. या पावसाने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत. रोगट हवामानामुळे महाराष्ट्रभर साथीच्या आजारांनी उच्छाद मांडला आहेे. त्यातच आता कोविडच्या नव्या व्हेरिएंटची भर पडली आहे. त्यामुळे चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. तयार मालाला मिळणारा मातीमोल भाव, त्यातच पडणारा अवकाळी पाऊस आणि आता वेगवेगळ्या साथीच्या आजारांचे थैमान यामुळे शेतकरीराजा अस्वस्थ झाला आहे.

खरेतर दूरदृष्टीने शेती केल्यास नक्कीच अशा अचानक आलेल्या संकटावर शेतकरी मात करू शकतो. जी कंदवर्गीय पिके आहेत जसे बटाटे, बीट, गाजर ही पिके घेतल्यास नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. काही शेतकरी मल्चिंग करतात. शेडनेट, पॉलिहाऊस उभारतात. यामुळे गारपीट तसेच अतिवृष्टी आणि त्यांचा परिणाम जवळपास एक महिन्यापर्यंत संभाव्य नुकसान टाळू शकतो. महत्त्वाचे म्हणजे पारंपरिक पिकांशिवाय बदलत्या हवामानास जे पीक बळी पडत नाही ती पिके शेतकर्‍यांनी घेतली पाहिजेत. सध्या मान्सूनच्या पॅटर्नमध्ये लक्षणीय बदल झाला आहे.

शेतजमिनीमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे बाष्पीभवनाच्या स्तरांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन वातावरणामध्ये भोवरे तयार होतात. त्या भोवर्‍यांमध्ये बाष्प अडकते. त्यातून अवकाळी पाऊस पडतो. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अतिरेकी शोषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. परिणामी तापमान वाढू लागले आहे. उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळत आहे आणि हवामान चक्र खंडित होत आहे. ते लाखो वर्षे इतर नैसर्गिक घटकांवर अवलंबून होते. म्हणजेच गरमी असेल तेव्हा पाऊस पडेल आणि हिवाळा इतका दीर्घ असेल की उन्हाळी हंगामाचा कालावधी मर्यादित होऊ लागेल. एकूणच अवकाळीला रोखणे अशक्य असले तरी अवकाळीमुळे होणारे नुकसान टाळणे शक्य आहे. त्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे हा सन्माननीय तोडगा ठरू शकतो.