घरसंपादकीयअग्रलेखअधिवेशनाची ‘दिशा’ कोणती?

अधिवेशनाची ‘दिशा’ कोणती?

Subscribe

राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सोमवारी सुरू झाले, पण त्याआधी धुमसणारा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्न, थोर पुरुषांचा अवमान आणि ओघाने राज्यपाल हटाव भूमिका तसेच परराज्यात जाणारे उद्योग यांचे सावट या हिवाळी अधिवेशनावर असेल, अशी शक्यता होती. त्यातच दोनच दिवसांपूर्वी म्हणजे शनिवार १७ डिसेंबरला महाविकास आघाडीने ‘महामोर्चा’ काढला होता. तसे पाहिले तर, अधिवेशनाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून झाली. इतरही मुद्दे निघाले, पण ते लावून धरले गेले नाहीत. त्यामुळे केवळ १२ दिवस का होईना, पण अधिवेशन सुरळीतपणे चालेल आणि सर्वसामान्यांच्या म्हणवून घेणार्‍या सरकारकडून सर्वसामान्यांच्या प्रश्नांची काही प्रमाणात का होईना तड लागेल, असे वाटू लागले. मुळात कोरोनाच्या कारणास्तव अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यात आला. कोरोनाचा धोका कमी झाल्याने सण-उत्सव दणक्यात साजरे करा, असे जनतेला सांगणार्‍या शिंदे-फडणवीस सरकारने विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी मात्र पूर्वीसारखा वाढवला नाही.

पावसाळी अधिवेशन अवघे ६ दिवस चालले, तर आताचे अधिवेशन दुप्पट म्हणजे केवळ १२ दिवस चालणार आहे. पहिला दिवस शांततेत पार पडल्यानंतर दुसर्‍या दिवशी, मंगळवारी नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंडाचे प्रकरण विरोधकांनी पुढे आणले. ८३ कोटी रुपयांचा हा भूखंड अवघ्या २ कोटींना दिल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा लावून धरणार असल्याचे जाहीर केले, मात्र प्रत्यक्षात तसे काही झालेले दिसले नाही. दोन्ही सभागृहांमध्ये विविध विषयांच्या चर्चा सुरू राहिल्या. सुदैवाने काही चांगले निर्णय जाहीर करण्यात आले, मात्र बुधवारी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी नवी दिल्लीत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला.

- Advertisement -

सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह १४ जून २०२०ला त्याच्या राहत्या घरी आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे सीबीआय तपासात स्पष्ट झाले होते, तर दिशा सालियनचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला. दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असल्याचे सीबीआय तपासात समोर आले आहे. नशेत असताना तोल गेल्याने टेरेसवरून पडून तिचा मृत्यू झाल्याचे सीबीआयने म्हटले आहे, मात्र या प्रकरणातील संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या मोबाईलमध्ये ‘एयू’ नावाने नंबर सेव्ह असून सुशांतच्या मृत्यूपूर्वी तिला या नंबरवरून ४४ कॉल आले होते. एयू म्हणजे आदित्य उद्धव असे बिहार पोलिसांच्या चौकशीतून समोर आले असल्याचा दावा खासदार राहुल शेवाळे यांनी केला. त्याचे पडसाद गुरुवारी विधिमंडळात उमटले. विधानसभेत आमदार नितेश राणे व अमित साटम, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती मान्य केली आणि विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) याचा तपास होईल, असे जाहीर केले.

सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूचा संबंध जोडला गेला आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. खासदार राहुल शेवाळे यांनी मांडलेला तर्क खुद्द रिया चक्रवर्तीने यापूर्वीच खोडून काढला आहे. ‘तो नंबर माझी मैत्रीण अनाया उदास हिचा आहे. त्यामुळे तो एयू नावाने सेव्ह केला आहे. मी आदित्य ठाकरे यांना कधी भेटलीदेखील नाही आणि त्यांचा नंबरदेखील माझ्याकडे नाही,’ असे रिया चक्रवर्तीने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे! तिच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या राजकारणावरून उद्विग्न झालेल्या दिशाच्या आई-वडिलांनी थेट राज्य महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली. दिशाने आत्महत्या केली असून तिच्या मृत्यूनंतर घाणेरडे राजकारण थांबवा अन्यथा आम्हालाही आत्महत्या करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता, पण सद्सद्विवेक बुद्धी, नैतिकता गुंडाळून राजकारणाचा खालचा स्तर गाठणार्‍यांना त्याच्याशी कोणतेही सोयर-सुतक नसल्याचे आजच्या विधिमंडळातील प्रकारावरून स्पष्ट झाले.

- Advertisement -

दिशा सालियन प्रकरणाची आता एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे जाहीर झाल्यावर खासदार राहुल शेवाळे यांचीही एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने बलात्कार, लैंगिक शोषण आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. ११ वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे, परंतु पोलीस तसेच शासकीय पातळीवर आपल्या तक्रारीची कोणीही दखल घेत नसल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले. जुलै महिन्यातील हे प्रकरण आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात पावसाळी अधिवेशन झाले. त्यात या प्रकरणाबद्दल कोणी ‘ब्र’ देखील काढला नाही, पण या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियन मृत्यूप्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप होत असतानाच एसआयटी चौकशी जाहीर करण्यात आली. त्यावरून खवळलेल्या विरोधकांनी महिला अत्याचारप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांचीदेखील एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली आणि उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी तसे निर्देश सरकारला दिले.

‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ हा न्याय राहिला, तर संपूर्ण जग आंधळे होईल’ या महात्मा गांधी यांच्या विचाराचा विसर सध्या या राजकारण्यांना पडला आहे, एवढेच जाणवते. या सर्व शोध-प्रतिशोधाच्या राजकारणात सर्वसामान्यांचे प्रश्न बाजूला पडले आहेत. सत्तेवर येताच अनेक विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. त्यातील एका स्थगितीबाबत मुंबई उच्च न्यायालयानेच काम रोखण्यास मनाई केली आहे. त्यामुळे इतर कामांना दिलेल्या स्थगितीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होते. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच या १२ दिवसांत विविध मागण्यांसाठी ६० हून अधिक मोर्चे निघणार असल्याचे स्पष्ट झाले होते. म्हणजेच, दिवसाला किमान पाच मोर्चे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या गरीब, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी अशा घटकांच्या या मोर्चाला कोण मंत्री किंवा आमदार सामोरा गेला आणि त्यांनी पोटतिडकीने त्यांचे प्रश्न किंवा मागण्या सोडविण्याचा प्रयत्न केला, हे काही या चार दिवसांत दिसले नाही. त्यामुळे हे अधिवेशन नेमके कोणासाठी चालवले जात आहे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी की केवळ गुन्ह्याचा तपास निश्चित करण्यासाठी? या अधिवेशनाची दिशा कोणती?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -