घरसंपादकीयअग्रलेखकर्नाटक निवडणुकीत काय होईल?

कर्नाटक निवडणुकीत काय होईल?

Subscribe

देशभरातील राजकारणात प्रचंड चढ-उतार सुरू असतानाच कर्नाटक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राष्ट्रीय राजकारणात एकीकडे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आणि त्यांची रद्द झालेली खासदारकी यावर जोरदार चर्चा चालू आहे, तर दुसरीकडे भाजपचे बहुमताचे सरकार असणार्‍या कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. येत्या १० मे रोजी कर्नाटकमध्ये २२४ जागांसाठी मतदान होईल आणि त्यानंतर १३ मे रोजी कर्नाटकी जनतेचा स्पष्ट कौल काय आहे हे मतमोजणीतून स्पष्ट होईल. कर्नाटक विधानसभेची एकूण सदस्यसंख्या २२४ आहे.

या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणार्‍या ८० हून जास्त वयाच्या मतदारांची संख्या तब्बल १२.१५ लाख इतकी आहे. ही मंडळी कोणाला मतदान करतात यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. २०१८ साली कर्नाटक विधानसभेचा निकाल त्रिशंकू होता. २००८ सालीदेखील राज्यात कोणालाही बहुमत मिळाले नव्हते. यावेळी निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात खरी चुरस आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भाजपला पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करता येईल, असा दावा केला आहे, तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी काँग्रेस तयार असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही पक्षात जेडीएसनेदेखील मैदानात दावेदारी ठोकली आहे.

- Advertisement -

महत्वाचे म्हणजे अनेक ओपिनियन पोल करणार्‍या संस्थांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आपले पोल जाहीर केले आहेत. लोक पोल संस्थेने यंदा सत्तांतराचा अंदाज वर्तवला आहे. या पोलनुसार राज्यात काँग्रेसचा झेंडा विधानसभेवर फडकेल. काँग्रेसला तब्बल ११६ ते १२३ जागा मिळतील, असा अंदाज लावण्यात आला आहे, तर भाजपला ७७ ते ८३ जागा मिळतील, असे लोक पोल सर्व्हेतून दिसते. जेडीएस २१ ते २७ दरम्यान असेल. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या वाट्याला १ ते ४ जागा येतील. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास काँग्रेसला ३९ ते ४२ टक्के, भाजपला ३३ ते ३६ टक्के आणि जेडीएसला १५ ते १८ टक्के मते मिळतील. सत्तांतराचा छातीठोकपणे दावा करणार्‍या लोक पोलने हा सर्व्हे करताना ४५ हजार लोकांची मते विचारात घेतली आहेत. यासाठी ४५ दिवस चाचपणी करण्यात आली. पॉप्युलर पोल्सच्या सर्व्हेनुसार कर्नाटकात सर्वच पक्षांची दमछाक होणार आहे. त्यातून कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही.

म्हणजे बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी यंदा भाजपसह काँग्रेसला मोठे परिश्रम घ्यावे लागतील. अर्थात या दोनच पक्षात चुरस असेल, असा दावा सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. सर्व्हेमध्ये भाजपला ८२ ते ८७ तर काँग्रेसलादेखील ८२ ते ८७ जागांवर विजय मिळेल, मात्र बहुमतासाठीचा ११३ चा आकडा कोणालाही गाठता येणार नाही. २०१८ साली काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करणार्‍या एचडी कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षाला ४२ ते ४५ जागा मिळू शकतील. या सर्व्हेच्या मते मध्य आणि किनारपट्टी भागात भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील. मध्य कर्नाटकमधील २७ पैकी १७ ते १९ जागा भाजपला, ७ ते ९ जागा काँग्रेसला, ८ ते ९ जागा जेडीएसला मिळतील. कोस्टल म्हणजेच किनारपट्टी भागातील १९ पैकी १२ ते १४ जागा भाजपच्या वाट्याला, काँग्रेसला ५ ते ७ जागा मिळण्याची शक्यता आहे. २८ जागा असलेल्या बंगळुरू क्षेत्रात खरी चुरस असणार आहे. येथे काँग्रेसला १४ ते १६ जागा मिळू शकतील, तर भाजपला १२ ते २४ जागा मिळण्याची शक्यता आहे. जेडीएसला येथे फक्त २ जागा जिंकण्याची संधी असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे.

- Advertisement -

या निवडणुकीत भाजपसमोरचे मोठे आव्हान म्हणजे पक्षीय पातळीवर असलेला समन्वयाचा अभाव. खरे तर, भाजप हा सरकार आणि पक्ष यांच्यातील समन्वयासाठी ओळखला जातो, पण कर्नाटकमध्ये परिस्थिती उलट आहे. येथे सरकार आणि पक्ष यांच्यात असमन्वय असल्याने निर्णय प्रक्रियेत आणि त्याहीपेक्षा निर्णयांची अंमलबजावणी करताना मोठे अडथळे येतात. दुसरी बाब म्हणजे आपल्यावरील भ्रष्टाचाराचे डाग पुसून काढण्यासाठी भाजपला मोठे परिश्रम घ्यावे लागतील. कारण गेल्या काही वर्षांत भाजपवर भ्रष्टाचारासंदर्भातील अनेक आरोप झाले आहेत. भाजप आमदाराच्या मुलाला लाच घेताना नुकतेच रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी भाजप आमदारालाही अटक करण्यात आली. या मुद्यावर विरोधक भाजपला सळो की पळो करतील हे निश्चित.

भाजपप्रमाणेच काँग्रेससमोरही अडचणींचा डोंगर उभा आहे. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी काँग्रेसच्या पाठिंब्यावर जेडीएसचे सरकार सत्तेवर होते. दक्षिण कर्नाटकातील हा संपूर्ण भाग वोक्कलिंगा समाजाचा बालेकिल्ला मानला जातो. जे मुळात जेडीएसशी संबंधित आहेत. अशा स्थितीत जेडीएसचा वाटा मिळण्यावर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे लक्ष लागलेले असेल. शिवाय काँग्रेसला एकसंध ठेवण्यासाठी सक्षम नेतृत्वाचा अभाव कर्नाटकात दिसतो. सध्या डी. के. शिवकुमार यांचा अपवाद वगळला तर नेत्यांची मोट बांधून ठेवणारा शोधूनही सापडत नाही. त्याचा फटका काँग्रेसला बसू शकतो. या परिस्थितीतून सावरण्याची ताकद पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातच आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत काय चमत्कार घडवतात हे बघणेदेखील औत्सुक्याचे ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -