घर संपादकीय अग्रलेख गडकरींचं काय होणार!

गडकरींचं काय होणार!

Subscribe

भाजप हा एका विचारसरणीवर आधारित असलेला पक्ष आहे. त्यामुळे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींभोवती केंद्रित झाला असे म्हणता येणार नाही. भाजप आणि पंतप्रधान हे एकमेकांना पूरक आहेत. भाजपात कधीही एका कुटुंबाची सत्ता नव्हती. सर्व महत्त्वाचे निर्णय संसदीय मंडळ घेत असे, पण रोखठोक बोलणार्‍या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीच भाजपच्या संसदीय मंडळातून गच्छंती करण्यात आली. आता भाजपचे दुकान जोरात, पण नवीन ग्राहकच जास्त, असा स्वपक्षावरच हल्लाबोल करणार्‍या नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत असलेल्या खात्याच्या कारभारावरच कॅगने ताशेरे ओढत अनियमितात असल्याचे म्हटले आहे. त्यावर अर्थातच भाजपमधून कोणत्याही प्रतिक्रिया उमटलेल्या नाहीत.

त्यामुळे नितीन गडकरी यांची राजकीय कारकीर्दच संपण्याचा डाव असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. नितीन गडकरी लोकशाही व्यवस्था मानणारे नेते आहेत. लोकशाहीसाठी देशात विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे, असे स्पष्ट मत असलेल्या गडकरींनी काँग्रेस सशक्त होणे आवश्यक आहे. काँग्रेस दुबळी पडली, तर त्यांची जागा प्रादेशिक पक्ष घेतील. असे होणे लोकशाहीसाठी चांगली बाब नाही. म्हणून निवडणुकीतील पराभवाने हताश न होता काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा जपत काम करावे. पराभव आहे, तिथे विजयही नक्कीच असतो, अशी सडेतोड मते एका मुलाखतीत गडकरी यांनी व्यक्त केली होती. नितीन गडकरी नेहमीच आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व राखूनच असतात. भाजपच्या सर्वोच्च नेत्यांच्या बोलण्याचे कधीही समर्थन करत नाहीत.

- Advertisement -

सध्या भाजपमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये केवळ मोदी-शहांचेच वर्चस्व आहे. असे असतानाही गेल्या काही महिन्यांपासून भाजपमधील राजकीय वाटचालीवर नितीन गडकरी खुलेआम आपले मत मांडत आले आहेत. म्हणूनच की काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ट संबंध असलेल्या गडकरी यांना मोदी-शहा पसंत करत नाहीत. मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात नितीन गडकरींच्या वाट्याला गंगा शुद्धीकरण, जहाज आणि पुनर्बांधणी, रस्ते आणि वाहतूक ही खाती आली होती. आता त्यांच्याकडे फक्त रस्ते आणि वाहतूक हेच खाते देण्यात आले, यावरून मोदी-शहांची गडकरी यांच्यावरील नाराजी स्पष्ट झाली होती, पण सत्ता, मंत्रीपदाची कोणतीही अभिलाषा न बाळगता नितीन गडकरी आपल्याला जे पटते ते उघडपणे बोलून दाखवत असतात, पण तेच त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना आवडत नाही.

गेल्यावर्षी महाविकास आघाडी फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले तेव्हाही नितीन गडकरी यांनी आपली उघड नाराजी व्यक्त केली होती. राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतले पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झाले त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होते, पण आता १०० टक्के सत्ताकारण झाले आहे, असे सांगत राजकारणाची दिशा चुकत असल्याचे आपले रोखठोक विचार त्यांनी मांडले होते. मला खूप वेळा राजकारण कधी सोडावे असे वाटते, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत, असेही विधान करत राजकारणातील घसरलेल्या पातळीमुळे होत असलेली घुसमुट त्यांनी व्यक्त केली होती.

- Advertisement -

आपण राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देतो. आता राजकारण करत नाही जवळपास समाजकारणच करतो. लोकांना सांगतो वाटेल त्याला मत द्या. कटआऊट लावत नाही. कुणाच्या गळ्यात हार घालत नाही. विमानतळावर जाऊन कुणाचेही स्वागत करत नाही. अटल बिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर या दोघांनाच हार घातला आहे, असे सांगणार्‍या गडकरींनी सध्याच्या राजकारणात हार घालावा असा आदर्श गळाच नसल्याचेच जणू सांगून टाकले आहे. गडकरी एकेकाळी सक्रियपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाग घेत असत. आता फारसा हस्तक्षेप करत नाहीत. आपले गुमान ऐकणार्‍या नेतृत्वाला मोदी-शहा आता पुढे आणत आहेत.

‘भाजपचे दुकान जोरात, पण नवीन ग्राहकच जास्त’ अशा शब्दांत स्वपक्षाच्या सद्यस्थितीवर गडकरी यांनी मार्मिक टोलेबाजी करत गडकरी यांनी मनातील सल व्यक्त केली आहे. भाजपमध्ये सध्या जिकडेतिकडे दुसर्‍या पक्षातून आलेले नेते, कार्यकर्ते यांचाच जोर दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आठवडाभरातच आरोपांच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवार यांना भाजपने महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान केेले. दुसरीकडे, आरएसएस, जनसंघ, भाजपचे निष्ठावान जुने कार्यकर्ते मात्र सत्तेपासून दुरावत चालले आहेत.

भाजपमध्ये येणारी नेतेमंडळी सहजपणे येत नाहीत, हे आता लपून राहिलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर लढाई ही शस्त्राने नाही, तर मनाने जिंकली जाते, असे परखड मतदेखील नितीन गडकरी यांनी एका भाषणात व्यक्त केले होते. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान मोदी यांच्या अविश्वास ठरावाच्या भाषणावेळी नितीन गडकरी यांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. मोदी-शहा यांच्या पक्षाचे दुकान चालवण्याच्या पद्धतीमुळे भाजपमधील अनेक निष्ठावन व्यथित झाले आहेत. नितीन गडकरी ही व्यथा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? गडकरी मांडत असलेली व्यथा त्यांचा राजकीय बळी घेईल की काय, अशी भीती त्यांच्या खात्यावर कॅगकडून घेण्यात आलेल्या आक्षेपावरून व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -