घरसंपादकीयअग्रलेखग्रामीण भारताची उपेक्षा कधी संपणार!

ग्रामीण भारताची उपेक्षा कधी संपणार!

Subscribe

भारतीय प्रजासत्ताकाचा ७३ वा वर्धापन दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. भारतीय सामरिक शक्तीचे प्रदर्शन परदेशी पाहुण्यांसमोर यानिमित्ताने केले जाते. गेल्या काही वर्षांत भारताची सामरिक ताकद निश्चितच वाढली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातही देशाची बर्‍यापैकी प्रगती झाली आहे. याचेही प्रदर्शन होते. संस्कृतीचे दर्शनही घडविले जाते. देश सर्वच आघाड्यांवर कसा उत्तुंग झेप घेतोय याची माहिती दिली जाते. देशातील जनताही राजपथावरील सोहळा दूरदर्शनवर पाहत असते. यात ग्रामीण भागातील जनताही आहे, मात्र अनेक ठिकाणची ही जनता कपाळाला हात लावत असेल. कारण आजही ग्रामीण भाग उपेक्षित असून पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार याबाबत आबाळ आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही किंवा त्यात अतिशयोक्तीही नाही. देश सर्व क्षेत्रात प्रगती करीत असतानाचे गुलाबी चित्र रंगविण्यात येते, अशी टीका नेहमी होते. देशाच्या स्वातंत्र्य दिनी किंवा प्रजासत्ताक दिनी याची आठवण प्रकर्षाने होते. देशाने प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे एक एक पाऊल टाकले पाहिजे यात वाद नाही, पण ग्रामीण, दुर्गम भाग हा या देशातच असताना त्याची उपेक्षा वर्षानुवर्षे का होतेय याचे उत्तर मिळाले पाहिजे.

देशाच्या अनेक भागात आजही पिण्याचे पाणी मिळत नाही. तात्पुरता देशाचा विचार बाजूला ठेवून फक्त कोकणपट्ट्याचा विचार करूया! ज्या कोकणात मुसळधार पाऊस पडतो तेथे नोव्हेंबर, डिसेंबर उजाडला की पाणीटंचाईचे चटके जाणवायला सुरुवात होते. देशाचे प्रगतीचे चित्र नवलाई वाटावे असे रंगवले जाते तेव्हा कोकणातील दुर्गम भागात महिला डोक्यावर हंडे घेऊन कोसो दूर जाऊन पाणी आणत असतात. दुर्गम भागातील अशा कितीतरी जागा दाखविता येतील की खड्ड्यांतून खरवडून-खरवडून पाणी काढावे लागते. हे अतिरंजित चित्र नाही तर वास्तव आहे. ते सरकारलाही चांगले माहीत आहे. एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसर्‍या बाजूला पाणीटंचाईचे चटके हे अजब दृश्य फक्त आपल्याकडेच दिसू शकते. वाळवंटी देशांनी समुद्राचे पाणी पिण्यालायक केले, तर आपल्याकडे केवळ आणि केवळ कागदी योजना तयार आहेत.

- Advertisement -

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पाणीटंचाईचे भीषण वास्तव प्रगतीच्या कोणत्या व्याख्येत बसते याचे उत्तर वर्षानुवर्षे सत्तेची खुर्ची उबविणार्‍यांनी दिले पाहिजे. गुराढोरांना पाणी मिळत नाही म्हणून पशुधन विकावे लागते. पाणी योजना वाजतगाजत आणल्या जातात. थाटामाटात त्याचे नारळ वाढविले जातात, पण जनतेच्या मुखी किती पाणी लागते हा संशोधनाचा विषय आहे. अशा कितीतरी पाणी योजना दाखविता येतील की त्यांचे उद्घाटनाचे फलक उरले आहेत. देशाच्या अनेक भागात पाणीटंचाईचे चटके जाणवतात. स्वच्छ पिण्याचे पाणी अद्यापही कितीतरी ठिकाणी स्वप्नवत आहे. ग्रामीण भागात मातीमिश्रित पाणी पुरवठा होत असताना त्याचे सोयरसुतक कुणालाही नाही. पाणीटंचाईचे विदारक दृश्य दाखविणारा एखादा रथ राजपथावर दिसला पाहिजे, असे जे उपरोधिकपणे म्हणतात त्याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही.

अलीकडे देशात वेगाने तयार होणार्‍या महामार्गांचे विशेषत्वाने कौतुक होत आहे. दळणवळणासाठी किंबहुना प्रगतीसाठी दर्जेदार आणि प्रशस्त रस्त्यांचे जाळे संपूर्ण देशभर असावे यात शंका नसावी. ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते सोडा, आहेत तेही धड नाहीत. स्वाभाविकच दळणवळणाचा वेग अतिशय मंद आहे. दुर्गम भागात वस्तीपर्यंत पोहचण्यासाठी पायीसुद्धा धडपणे जाता येत नाही अशी रस्त्यांची अवस्था आहे. त्यामुळे वाहन तेथपर्यंत पोहचण्याची बातच दूर! हजारो कोटींचे महामार्ग तयार होत असताना दुर्गम भागात लाख, दोन लाखांचा निधी रस्त्यासाठी मिळणे दुरापस्त असते. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटल्यानंतरही पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांसाठी आंदोलन, निवेदने, निवडणुकीवर बहिष्कार असे मार्ग अवलंबावे लागत असतील तर त्यासारखी लाजीरवाणी बाब नाही. शहरात हजारोंच्या सभा घेऊन ग्रामीण विकासाचे तुणतुणे वाजविणे राज्यकर्त्यांचा आवडता छंद आहे. दुर्गम किंवा आडमार्गाच्या ठिकाणी शिक्षणाची सुविधा नसल्याने तेथील पालक आपल्या मुलांना आजूबाजूच्या गावात शिक्षणासाठी धाडतात.

- Advertisement -

कित्येक किलोमीटर अंतराची पायपीट करून मुले शिकायला येतात. अनेक ठिकाणी जंगली श्वापदांचाही धोका असतो. येण्यासाठी धड मार्ग नाही म्हणून शिक्षण अर्धवट सोडणार्‍या मुलांची संख्या मोठी आहे. काही ठिकाणी तर धोकादायक पद्धतीने नाला, नदी ओलांडून मुले शिक्षणासाठी येतात. याची दृश्ये प्रसारमाध्यमांनी अनेक वेळा दाखविली आहेत. देशाच्या विकासाच्या जेव्हा गप्पा होतात तेव्हा असे दुर्लक्षित भाग आहेत तसेच ते दुर्लक्षित ठेवण्यामागचे इंगित काय, याचे कोडे उलगडत नाही. आपल्याकडे मेडिकल टुरिझमच्या गोष्टी होतात तेव्हा दुर्गम भागातील रुग्ण झोळण्यात टाकून मोठ्या गावाच्या ठिकाणी उपचारासाठी आणला जातो. ग्रामीण, दुर्गम भागात कितीतरी ठिकाणी रुग्णालयाच्या इमारती उभ्या राहिल्या, परंतु त्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नाही. कधी औषधेही संपलेली असतात. गांधीजी म्हणत, विकासाचा मार्ग खेड्यातून जातो, पण जी खेडी दुर्लक्षित राहिली तेथील माणसे काम शोधण्यासाठी शहरात गेली. त्यांच्या सहभागातून शहरांचा विकास होतोय. सक्षम देशाची निर्मिती होत असताना ग्रामीण, दुर्गम भाग दुर्लक्षित राहत असेल तर ते कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी त्यांना भूषणावह नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -