शिवसेनेत बंड पुकारून पक्षावर दावा सांगत एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. खरी शिवसेना ही आपलीच आहे, असे सांगत न्यायालयीन लढाई लढत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाचे नाव आणि धनुष्य बाण हे चिन्ह मिळवले. ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली, त्या शिवसेनेची परिस्थिती अशी होईल, त्यांच्याच मुलाकडून शिवसेना काढून घेतली जाईल, याची कुणी कल्पनाही केली नसेल, पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात कल्पनेपलीकडच्या गोष्टी घडताना लोकांना दिसत आहेत. ते पाहून लोकांवर तोंडात बोटेच नाही तर अख्खा हात घालून आपलेच तोंड बंद करून बसायची पाळी आलेली आहे. शिंदे आणि ठाकरे हे दोन गट वेगळे झाल्यानंतर ठाकरे यांच्या बाजूने शिंदे गटाला विविध नावांनी टीकेचे लक्ष्य करण्यात येत आहे. शिवसेनेत शिंदे यांनी केलेले बंड हे वेगळ्या प्रकारचे आहे. त्यांनी शिवसेनेवरच दावा केला, त्यामुळे उद्धव ठाकरे यांची मोठी पंचाईत झाली. शिंदे हे जेव्हा आपल्या समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीला गेले तेव्हा त्यांनी तिथे सांगितले होते, आमच्या मागे महाशक्तीचा हात आहे. अर्थातच, ही महाशक्ती म्हणजे भाजप होती, हे पुढे सिद्ध झाले. कारण हे जे परिवर्तन घडून आले आहे, त्यामागील सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहेत, असे मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आपल्या पहिल्या भाषणात सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर न पडताच सगळा पक्ष आपल्या ताब्यात घेण्याची व्यूहरचना तयार करण्यामागे भाजपचे डोके होते, हे सिद्ध झाले.
आमची शिवसेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे, असा शिंदे यांचा दावा आहे, तर दुसर्या बाजूला आमचीच शिवसेना ही मूूळ शिवसेना आहे, असा उद्धव ठाकरे यांचा दावा आहे. त्यामुळेच यांनी नव्या दमाने राज्यभर दौरे सुरू केले आहेत. आपल्या हातात आता काही नाही, असे ते समोर जमणार्या लोकांना सांगतात. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला मोठी गर्दी जमते. त्या गर्दीकडे बोट दाखवून ते म्हणतात, ही आहे माझी ताकद. पण केवळ गर्दी ही काही निवडणूक जिंकण्याची कसोटी होत नाही. कारण समोर जमणार्या गर्दीचे मतांमध्ये रुपांतर होतेच असे नाही. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेदेखील आपल्या भाषणांतून म्हणायचे, माझे भाषण ऐकायला इतकी गर्दी करता, पण मतदानाच्या वेळी जाता कुठे? त्यामुळे बरेचदा गर्दी ही फसवी असते, हे विसरून चालत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोकांची सहानुभूती आहे, यात शंका नाही. कारण त्यामुळे अंधेरी पूर्व येथे झालेल्या पोटनिवडणुकीत प्रचंड तयारी करूनही भाजपने आपला उमेदवार ऐनवेळी मागे घेतला, कारण त्यांना पराभवाची नामुष्की टाळायची होती. उद्धव ठाकरे यांना लोकांची सहानुभूती असली तरी अनेक आमदार आणि खासदार, नगरसेवक शिंदे यांच्या बाजूला गेले आहेत. त्यामुळे निवडणुका लढवण्यासाठी पदाधिकार्यांची फौज लागते, ती उद्धव ठाकरे यांच्याकडून कमी झालेली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत लोकांची सहानुभूती असली तरी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेली हातमिळवणी हेदेखील लोकांना खटकले आहे. कारण त्या हातमिळवणीतून त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या वैचारिक विरोधकांशी सत्तेसाठी हातमिळवणी केली, हे दिसून आले. जर उद्धव यांनी अशी तडजोड न करता ते ऐकटे राहिले असते आणि एकनाथ शिंदे यांनी बंड करून ते भाजपसोबत गेले असते, तर ठाकरे यांच्या बाजूने मोठे समर्थन राहिले असते. कारण त्यामुळे सत्तेसाठी कुठलीही तडजोड न करणारा एक निष्ठावान नेता, अशी त्यांची प्रतिमा उभी राहिली असती.
उद्वव ठाकरे भाजप आणि शिंदे यांच्यावर त्यांच्या दौर्यातून जोरदार टीकास्त्रे डागत आहेत. 25 वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही. मग, काँग्रेसबरोबर गेल्यावरही शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत बसवून हिंडवण्यासाठी केली नाही, असे उद्वव ठाकरे रविवारी जळगाव येथे झालेल्या सभेत म्हणाले. २०१४ साली जेव्हा शिवसेना-भाजप यांची युती तुटली तेव्हा, भाजपसोबत २५ वर्षे युतीत राहून शिवसेना सडली, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, पण त्याच भाजपसोबत त्यांनी २०१९ साली विधानसभेत पुन्हा युती कशासाठी केली असा प्रश्न लोकांना पडतो. आता ते म्हणत आहेत, आम्ही आता काँग्रेससोबत असलो तरी आमची काँग्रेस होणार नाही. प्रश्न शिवसेनेची काँग्रेस होण्याचा नाही. पण जेव्हा आपण सत्तेसाठी आपल्या वैचारिक विरोधकांशी हातमिळवणी करतो, तेव्हा आपले स्थान आपण डळमळीत करत असतो. हिंदुत्वाच्या रक्षाणासाठी शिवसेनेने भाजपशी युती केली होती, आता काँग्रेसशी आघाडी करताना तेच भाजपवाले त्यांना नकोस झाले. ज्यांच्याशी शिवसेनेचा कायम उभा वाद होता, ते आता त्यांचे मित्र झाले. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकांमुळे त्यांच्यासमोर आता स्वत्व टिकवण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे. खरी शिवसेना कुठे गेली, हाच सर्वसामान्य मराठी माणसाला प्रश्न पडलेला आहे.