नक्की कुणाचा पोपट मेलाय!

 

सर्वोच्च न्यायालयाने सुमारे वर्षभर प्रतीक्षेत असलेला निकाल दिल्यानंतर भाजप आणि ठाकरे गट या दोघांनी आमचाच विजय झाला आहे, असे जाहीर करून पेढे वाटले आणि आनंद साजरा केला. यात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे मूळ शिवसेनेतून फिटून निघालेल्या १६ आमदारांचा. कारण ते जर का अपात्र ठरले तर पारडे फिरू शकते, अशी आशा ठाकरे गटाला आहे. त्यामुळेच त्यांनी तो विषय लावून धरला आहे, पण तो विषय सध्या तरी विधानसभा अध्यक्षांच्या गोटात आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतात यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील राजकीय गुंत्याविषयी निकाल दिला आहे. त्यातून लगेच पुढचे मार्ग मोकळे होतील अशी स्थिती नाही. कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी मूळच्या शिवसेनेतून जे काही बंड केले ते अभूतपूर्व असे होते.

आजवर जेव्हा पक्षातून असे बंड झाले तेव्हा ते नेते पक्ष सोडून बाहेेर पडले आणि त्यांनी आपला वेगळा गट किंवा पक्ष स्थापन केला. नाहीतर ते दुसर्‍या पक्षात विलीन झाले, पण शिंदे यांनी मूळ पक्षातून बाहेर न पडता तो पक्ष आपलाच असल्याचा दावा केला. त्यामुळे न्यायविषयक मोठी कोंडी निर्माण झाली आहेे. कारण जेव्हा एखादी घटना घडते आणि पूर्वी तसे कुठले उदाहरण नसेल तर त्या घटनेचा नव्याने विचार करावा लागतो. त्यासाठी नवे नियम तयार करावे लागतात. मोठा कायदेशीर काथ्याकूट करावा लागतो. अशा स्थितीत न्यायालयाने दिलेल्या निकालाचे अनेक कंगोरे असतात. त्यामुळे अर्थ लावण्यातही बराच वेळ जातो. राज्यातील राजकीय पेचप्रसंगाबाबत सर्वोच्च न्यायालयात जी काही न्यायप्रक्रिया चालली आणि न्यायालयाने जो निर्णय दिला तो खरेतर पुढील काळात कायद्याचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरणार आहे. इतके त्याला विविध पैलू आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणीस आणि शिंदे यांचे राज्यातील सरकार पडेल की काय, या शक्यतेने अधिक जोर धरला होता. त्यातच पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवस सुट्टी घेऊन अचानक आपल्या गावी गेले होते. त्यामुळे न्यायालयाचा हातोडा या सरकारवर पडणार असाच अंदाज राजकीय विश्लेषक मांडत होते, पण या निकालानंतर फडणवीस आणि शिंदे यांचे सरकार पडले नाही. त्यांच्या गोटात आनंदाचे उधाण आले. दुसर्‍या बाजूला १६ बंडखोर आमदार अपात्र ठरतील आणि एकनाथ शिंदे यांचा त्यात समावेश असेल. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे सरकार कोसळेल, अशा शक्यतेमुळे ठाकरे गटामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत होता, पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सध्या तरी सरकार पडलेले नाही.

१६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला आहे. आता त्यावरच ठाकरे गटाच्या आशा टिकून राहिल्या आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी त्यांचा सगळ्या बाजूंनी पाठपुरावा सुरू आहे. हा निर्णय केव्हा घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे बोट दाखवून ते कायद्याचे अभ्यासक असल्यामुळे ते योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील, असे सांगितले. त्यामुळे सध्या गाडी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाभोवती फिरत आहे. ती गाडी अशीच फिरत राहणार की काही निर्णय होणार आहे हे सगळ्यांसाठी औत्सुक्याचे झाले आहे.

महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे यांच्या सरकारला जीवदान मिळाल्यामुळे ठाकरे गटाचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. कारण त्यांचे टार्गेट असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या वाणीला विलक्षण धार आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस आणि शिंदे सरकारचा पोपट मेला आहे, असा सातत्यपूर्ण सूर आळवायला त्यांनी सुरुवात केली. त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. दोन्ही बाजूंनी असा तुमचा पोपट मेेला आहे, पण तो मेला आहे, असे तुम्ही मान्य करत नाही, अशी नेमबाजी सुरू आहे.

फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात अशी पोपटपंची सुरू असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आमचाच पक्ष मोठा असा दावा केल्यामुळे ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे. त्यात पुन्हा जागा वाटपावरून आतापासून रस्सीखेच सुरू झाली आहे. खरेतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांंना अजून वर्ष सव्वा वर्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये किती अस्वस्थता आणि अनिश्चितता आहे हे दिसून येते, तर दुसर्‍या बाजूला कर्नाटकमध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मोठी फौज उतरवूनही भाजपचा पराभव झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपवाल्यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येतेे. कारण आतले वारे काही वेगळे आहेत याचाही त्यांना अंदाज आहे. त्यामुळे तुमचा पोपट मेला आहे, असे म्हणण्यात हे राजकीय नेते समाधान मानत असले तरी दोन्ही बाजूंच्या मनात धडकी भरलेली आहे. त्यामुळे नक्की कुणाचा पोपट मेला आहे हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे.