वणवा पेटला…विझवणार कोण?

महाराष्ट्रात राजकीय वणवा पेटलेला असताना राज्याच्या काही भागात विशेषत: कोकण पट्ट्यातील जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कोकणाला वणवे नवीन नाहीत, परंतु त्याचे प्रमाण वाढत चालल्याचे लक्षात येते. वणवा लागल्यानंतर तो विझविण्यासाठी सक्षम यंत्रणा वन खात्याकडे नाही. परिणामी हवेत वाढणारा उष्मा आणि जोरदार वारा असला की जंगलाचा बरासचा भाग या वणव्यामुळे अल्पावधीत बेचिराख होतो. एकीकडे जंगल संपत्ती किंवा वनसंपदा वाचली पाहिजे म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडायचे आणि दुसरीकडे आगीचे लोट जंगल संपत्ती आपल्या कह्यात घेत असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहणे हा विरोधाभास आहे.

वणव्यांपासून जंगल वाचवा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वन्यप्रेमी, पर्यावरणवादी आणि प्रसारमाध्यमे शासनाच्या कानीकपाळी ओरडून सांगत असले तरी शासनाला त्याचे गांभीर्य समजत नाही असेच दिसून येते. जर गांभीर्य असते तर प्रभावी वणवाविरोधी यंत्रणा सर्वत्र उपलब्ध झाली असती. दरवर्षी वणव्यांमुळे जंगलांचे प्रचंड नुकसान होत आहे. तेथील वन्यजीवांची होरपळ होते. अनेक वन्यजीवांना प्राणाला मुकावे लागत आहे. तथाकथित विकास पर्यावरणाच्या मुळावर उठला असताना पेटणार्‍या जंगलांमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत असल्याची तक्रार पर्यावरणवादी करत असतात. पर्यावरणाचा मुद्दा गांभीर्याने घेतला गेला नसल्याने संपूर्ण जग त्याचे परिणाम भोगत आहे. आता पर्यावरणावर ऊठसूठ बोलणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखा प्रकार झाला आहे. त्यामुळे जंगलांचे संवर्धन झालेच पाहिजे, किंबहुना ती तातडीची गरज ठरल्याचे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

वणवा लागण्याची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. मोठी झाडे पडताना होणारे घर्षण, आकाशातून कोसळणारी वीज, अतिउष्णतेमुळे कोरडे गवत अथवा पाने पेटणे, गवत किंवा पाने कुजताना होणार्‍या प्रक्रियेमुळे मिथेनसारखा ज्वलनशील वायू तयार झाल्यामुळे जंगलात आग लागू शकते. घनदाट जंगलात झाडाच्या फांद्या एकमेकांवर घासल्या गेल्यामुळेही ठिणग्या पडून वणवा लागत असल्याचे सांगितले जात होते. ही शास्त्रोक्त कारणे असली तरी अलीकडे वणवा जाणूनबुजून लावला जात असल्याची बाब समोर आली आहे. काही विघ्नसंतोषी किंवा माथेफिरू जंगलातील पालापाचोळा पेटवून वणव्याची मजा पाहतात, तर काही जण जंगलात आग लावून तेथून साग आणि अन्य किमतीवान लाकूड चोरण्याचा उद्योग करतात.

अनेकदा वणव्यांमागे जंगल माफिया असल्याचे म्हटले जाते. या माफियांमुळे अनेक ठिकाणची वनसंपदा धोक्यात आली आहे. वन खात्याकडे आजही पुरेसे मनुष्यबळ नाही. स्वाभाविक हाताशी आधुनिक यंत्रणा असणे शक्य नाही. जंगलात फिरणार्‍या वन कर्मचार्‍यांकडे शस्त्रास्त्रेही नसतात. सगळा कारभार रामभरोसे आहे. त्यामुळे वणव्यासारखी घटना घडली की तेथे वन कर्मचारी वेळेत पोहचतील याची खात्री नाही. अनेकदा कर्मचार्‍यांना वणवा पसरू नये म्हणून हातात झाडाच्या फांद्या घेऊन आग विझवावी लागते. या हास्यास्पद प्रकारावरून शासनावर बर्‍याचदा टीका झाली आहे. आज प्रगत राष्ट्रांमध्ये वणवे विझविण्यासाठी हेलिकॉप्टर, विमानांचा वापर करतात. त्यातून पाण्याचे फवारे, इतर रासायनिक द्रव्ये आगीवर सोडतात. आपण विज्ञानामध्ये भरारी घेतल्याचे म्हणतो तर अशी आधुनिक यंत्रणा आपल्याकडे नसावी हे पटण्याजोगे नाही. आजमितीला कोकण असो वा अन्य प्रदेश असो जंगलांची जी ओरपणी सुरू आहे, त्यामागचे कारण केवळ शासनाने जंगल संपत्तीची पुरेशी काळजी घेतली नाही हेच आहे. मध्यंतरी ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प सोडण्यात आला. याचे ऑडिट झाले पाहिजे. जंगलामध्ये वृक्ष लागवडीसाठी खड्डे खणण्याच्या नावाखाली प्रचंड मोठा भ्रष्टाचार होत असतो, पण तेथे आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय अशी परिस्थिती आहे. लोकप्रतिनिधी एकमेकांच्या उकाळ्या-पाखाळ्या काढण्यात व्यस्त असतात. जंगल संपत्ती वाचविण्यासाठी ते जोरकसपणे प्रयत्न करताना दिसत नाहीत. कधीतरी याबाबत बोलेले म्हणजे जबाबदारी संपली असे होत नाही.

गेल्या काही वर्षांपासून वणव्याबाबत जनजागृतीची मोहीम वन खात्याने हाती घेतली असली तरी अचानक लागणारा वणवा स्थानिक जनता आटोक्यात आणू शकेल असे मानणे चुकीचे आहे. जंगलांबाबत काळजी घेण्याचे जनतेला आवाहन केले जाते, पण माफियाच जर जंगलं पेटवून देत असतील तर ही जनता काय करणार, हाही सवाल आहे. गावांतून घर बांधायला जागा शिल्लक नसल्याने डोंगरांच्या पायथ्याशी वस्त्या वाढू लागल्या आहेत. अनेकदा असे होते की जंगलात भडकलेला वणवा या वस्तीत घुसून नुकसान करीत आहे. यात पाळीव गुरेढोरे दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील खालापुरात जंगलात लागलेला वणवा एका गॅरेजपर्यंत येऊन पोहचला आणि त्याने तेथे उभा असलेला ट्रक ‘गिळंकृत’ केला. वणव्यांमुळे माकडांसोबतच अन्य हिंस्त्र प्राणीही मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. वणव्याच्या घटना वारंवार घडत आहेत, लक्ष द्या, म्हणून स्थानिक जनता ओरडत आहे, परंतु तेथे लक्ष नाही. अशीच परिस्थिती अनेक भागात आहे. डोंगर जेव्हा आगीच्या विळख्यात सापडतो तेव्हा हवेतील उष्णता वाढत असल्याचा अनुभव अनेक गावांना येत असतो. राजकीय वणव्यात अडकलेल्या लोकप्रतिनिधींनी या वणव्यांना प्रतिबंध घालण्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात यावर आवाज उठला तर अधिक उत्तम!