घरसंपादकीयअग्रलेखकुणाची तुतारी वाजणार!

कुणाची तुतारी वाजणार!

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रत्येकजण आपली तुतारी वाजवण्याचा पराकाष्टेचा प्रयत्न करत आहे. यात कुणाची तुतारी वाजणार किंवा कोण कुणाची तुतारी वाजवणार हे येणार्‍या काळात दिसून येईल. कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी चारसो पार जाण्याचे वेध लागलेले आहेत. त्यामुळे देशपातळीवर पक्षाचे कार्यकर्तेही त्या दिशेने कामाला लागलेले आहेत. महाराष्ट्रात तर राजकीय परिस्थिती फारच आव्हानात्मक बनलेली आहे, कारण राजकीय पक्षांचे इतके गट आणि तट पडलेले आहेत आणि त्यांना इतकी विविध प्रकारची निवडणूक चिन्हे मिळत आहेत की, आपण नेमके कुणाला मत द्यायचे, असा प्रश्न मतदार नागरिकांना पडला तर आश्चर्य वाटू नये.

त्यात पुन्हा राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीनंतर त्यांच्या सोयीनुसार अकल्पित अशा युत्या आणि आघाड्या करतात की, आपण जे मतदान केले त्याला काही अर्थ आहे का, असा प्रश्न मतदारांना पडतो. कारण आपण ज्या अपेक्षेने मतदान केलेले असते त्यापेक्षा भलतेच काही घडते. म्हणजे ज्यांना जनमताचा कौल मिळालेला असतो, ते सत्तेत न येता वेगळेच पक्ष त्यांच्या सोयीनुसार युती किंवा आघाडी करून सत्तेत येतात. महाराष्ट्रातील मातब्बर नेते शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. अर्थात, पुन्हा नेहमीप्रमाणे त्यांनी काँग्रेसशी आघाडी करून महाराष्ट्रातील सत्ता मिळवली. पण पूर्वी जसे पवार काही काळानंतर आपला नवा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करत असत तसा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रस कधी काँग्रेसमध्ये विलीन केला नाही. १९९९ साली त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी पुन्हा सलोखा केल्यानंतर आता वेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तरीही पवारांनी आपला पक्ष वेगळा ठेवला.

- Advertisement -

शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोघेही प्रभावी नेते असूनही त्यांना त्यांच्या पक्षाची एकहाती सत्ता महाराष्ट्रात आणता आली नाही. त्याच तुलनेत देशभरातील विविध प्रदेशिक पक्षांनी आपली सत्ता त्यांच्या राज्यात आणून त्यांच्या पक्षाचा प्रमुख नेता मुख्यमंत्री बनला. त्याचे खास उदाहरण म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना सत्तेत येण्यासाठी राष्ट्रीय पक्षांशी युती किंवा आघाडी करावी लागली. शरद पवारांनी काँग्रेसशी आघाडी तर शिवसेनेने भाजपशी युती केली. जनतेच्या हितासाठी आम्ही युती किंवा आघाडी केली हे जरी या पक्षांचे नेते सांगत असले तरी सत्ता मिळवणे हाच त्यामागे मूळ हेतू होता. तसे नसते तर राज्यात आजही राजकीय परिस्थिती निर्माण झाली नसती.

राष्ट्रीय पक्षाला प्रादेशिक पक्षाला मोठे करायचे नसते, त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो, हे प्रादेशिक पक्षांच्या लक्षात येत नाही असे नाही. पण त्यांनाही सत्ता हवीच असते. २०१९ साली महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील परिस्थिती बदलली. भाजपकडे केंद्रात बहुमतातील सत्ता आहे. त्यामुळे त्याच्या आधारे त्यांनी महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यातील सत्ता पुन्हा मिळवली. पण ती मिळवताना भाजपने महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपल्या दावणीला बांधण्यात यश मिळवले. एकनाथ शिंदे यांना आपल्याकडे घेऊन त्यांनी ठाकरे घराण्याला शह दिला तर अजित पवारांना आपल्याकडे घेऊन शरद पवारांचा राज्यातील प्रभाव मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला यश आल्यासारखे वाटत आहे, पण वास्तविकता काय आहे हे समजण्यासाठी काही काळ जावा लागेल.

- Advertisement -

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने मशाल निवडणूक चिन्ह दिले आहे, शरद पवारांना तुतारी हे चिन्ह दिले आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे पुतणे अजित पवार यांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर आता वयाची ऐंशी वर्षे पार केल्यावरही शरद पवारांना नव्याने नव्या पक्षाची उभारणी करावी लागणार आहे. शरद पवारांनी तुतारी या चिन्हाचे रायगड किल्ल्यावर जाऊन शनिवारी अनावरण केले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाचे नेते रायगडावर उपस्थित होते. शरद पवार चाळीस वर्षांनंतर रायगडावर गेले होते.

शरद पवारांनी काँग्रेस सोडल्यावर त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. आता पवारांच्या हातचे घड्याळ गेले. आता त्यांच्याकडे तुतारी आली आहे. रायगडावर जाऊन शरद पवार गटाच्या नेत्यांनी तुतार्‍या फुंकल्या. आता त्यांचा आवाज लोकांच्या कानापर्यंत कसा जातो आणि लोक त्याला कसा प्रतिसाद देतात ते पुढील निवडणुकांमधून दिसून येईल. तसे पाहिले तर सध्या महाराष्ट्रात तुतारी वाजवणारे एकटे पवार नाहीत. सध्या सगळ्याच गटा, तटातील नेते आपापल्या तुतार्‍या घेऊन मैदानात उतरलेले आहे. तिकीटवाटपाच्या वेळी सगळ्यांचीच मोठी कसोटी लागणार आहे. कारण तिथेच सगळी गोम आहे. खरे तर ‘एक तुतारी द्या मज आणुनी’, ही महाराष्ट्रातील क्रांतिकारी कविता आहे. महाराष्ट्रातील सध्याचा राजकीय विस्कळीतपणा पाहिल्यावर नव्या क्रांतीची गरज आहे. आता महाराष्ट्रात कुणाची तुतारी कशी वाजते ते पाहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -