Eco friendly bappa Competition
घर संपादकीय अग्रलेख महामार्गाचे प्रेम आताच का?

महामार्गाचे प्रेम आताच का?

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो काही गोंधळ सुरू आहे ते पाहिल्यानंतर डोक्याला झिणझिण्या आल्याशिवाय राहणार नाहीत. कोण कुणाचा मित्र आणि कोण शत्रू तेच समजत नाही. अधूनमधून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाशी गुफ्तगू करणारे राज ठाकरे दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील कोलाड नाक्यावर भाषण करताना इतर पक्षांसह या दोन पक्षांवरही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बरसले! निमित्त होते मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचे! लोक सारखं सारखं त्याच त्याच उमेदवारांना निवडून का देतात, असा ठाकरे यांचा सवाल होता. सध्या कोकणातील बहुतांश आमदार आणि खासदार सत्तेत आहेत. तरी महामार्गाचे काम होत नसल्याबद्दल राज ठाकरे यांचा आक्षेप आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची पुरती दशा झालेय याबद्दल बिलकूल शंका नाही. गेल्या १३ वर्षांपासून या मार्गाच्या रुंदीकरणासह काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मार्ग सुस्थितीत आणण्याच्या बाबतीत रोज वेगवेगळे वायदे दिले जात आहेत. हा मार्ग चार ते पाच वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असताना तप उलटून गेले आहे. या मार्गाची शोचनीय अवस्था पाहिल्यानंतर प्रवाशांना संताप येणे स्वाभाविक आहे, पण असा संताप राजकारण्यांनाही येऊ लागला आहे. राज ठाकरे कोलाडच्या सभेत तावातावाने बोलत असताना अनेकांच्या मनात एकच प्रश्न येत असेल की गणेशोत्सव तोंडावर आल्यावरच तुम्हाला हा महामार्ग का आठवतो? एरव्ही प्रवासी खड्ड्यांतून जीवघेणा प्रवास करतायत त्याचं काय?

- Advertisement -

चौपदरीकरणाला सुरुवात होण्याच्या पूर्वीपासून मुंबई-गोवा महामार्ग कायम चर्चेत राहिला आहे. या मार्गाचा दर्जा टुकार असल्याने पावसाळा सुरू झाला की खड्डे पडणार आणि गणेशोत्सव जवळ आला की संबंधित यंत्रणांना ते दिसणार हे ठरून गेलेले आहे. त्यात मंत्री, पालकमंत्री, इतर अधिकारी यांच्या दौर्‍याचे फार्स पार पडतात. गणेशोत्सव काळात या मार्गावर नेहमीपेक्षा कैक पटीने वाहतूक वाढते हे खरे आहे, पण एरव्ही वाहतूक होते त्याचा विचार कुणी करीत नाही. कोकणात औद्योगिकीकरण वाढण्याबरोबर पर्यटनही चांगलेच बहरले आहे. परिणामी छोट्या वाहनांपासून अवजड वाहनांची संख्या मोठी असते. त्यामुळे हा मार्ग वर्षाचे बाराही महिने सुस्थितीत असला पाहिजे आणि त्यानंतर सुरू झालेले चौपदरीकरणाचे काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींनी कधीही सामूहिकरित्या पाठपुरावा केला नाही हे वास्तव आहे.

गणपती जवळ आले की या महामार्गाच्या दर्जाबद्दल राजकीय, विशेषत: विरोधी, नेत्यांची पोपटपंची सुरू होते. राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच हा मार्ग वेळेत पूर्ण झाला पाहिजे असे केंद्र आणि राज्य सरकारला ठणकावून सांगितले असते, तर ते कोकणी जनतेसाठी हिरो ठरले असते. आता त्याच त्याच उमेदवारांना निवडून का देता, असे विचारण्यात काही अर्थ नाही. राज ठाकरे बोलले म्हणून कोकणी माणसाचे मतपरिवर्तन होईल अशी बिलकूल परिस्थिती नाही. या महामार्गाच्या बाजूला असलेल्या जमिनी विकू नका असा सल्ला त्यांनी दिला आहे, परंतु शेतीत काही राम उरला नाही अशी शेतकर्‍यांची मानसिकता झाल्याने ते जमिनी विकत आहेत याची राज ठाकरे यांना चांगलीच कल्पना असेल. असलेल्या शेतजमिनीत उत्पन्न घेण्यासाठी शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी राज ठाकरेंसह त्यांची मनसे आग्रही राहिली असती, तर ते शेतकर्‍यांच्या गळ्यातील कदाचित ताईतही बनले असते. प्रचारकी थाटातील सभेत भावनेला हात घालून कोकणातील प्रश्न सुटणार नाहीत.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पत्रकारांचा लवाजमा घेत कोकणातील दौरे वाढले आहेत. या महामार्गाने केंद्र आणि राज्याच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगलेली असताना ती या दौर्‍याच्या निमित्ताने जगाला दाखविण्यात खरं तर काही अर्थ नाही. आता त्यांनी गणेशोत्सवापूर्वी एक लेन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे, पण या लेनच्या दर्जाबद्दल रायगडमधील काहींनी शंका घेतली आहे. झालेले काम तकलादू आहे आणि अवजड वाहतूक त्यावरून सुरू झाली की त्याचे खरे स्वरुप दिसेल असे म्हटले जाते, मात्र शासनाने महिनाभर या मार्गावरून अवजड वाहतूकच बंद करण्याचे फर्मान काढले आहे. सण, उत्सवाच्या कालावधीत अवजड वाहतूक बंदी ही खरी तर शासनासाठी लाजीरवाणी बाब आहे. धाडकन एखादा निर्णय वाहतूकदारांच्या तोंडावर फेकायचा हा तुघलकी कारभार आहे.

एकीकडे औद्योगिकीकरणाचे तुणतुणे वाजवायचे आणि दुसरीकडे उद्योगाचा आत्मा असलेल्या वाहतुकीच्या मुळावरच घाव घालायचा हे अजिबात योग्य नाही. राज ठाकरे यांनी यावरही बोलले पाहिजे. वाहतूकदारांसह कारखानदारांचे दररोज हजारो कोटींचे नुकसान होत आहे. सण किंवा उत्सवात अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचा प्रकार फक्त कोकणातच होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम खर्‍या अर्थाने पूर्ण होण्यास अजून दोन वर्षे लागतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर या मार्गाबद्दल कदाचित कुणीही बोलणार नाही. प्रवासाचा वेळ कैक पटीने वाढलेला असला तरी कुणाला त्याचे काही पडलेले नाही. नेत्यांनी, मंत्र्यांनी या महामार्गावर फिरून उगाचच चमकोगिरी करण्यापेक्षा तो लवकर कसा पूर्ण होईल ते पहावे. त्यांच्या दौर्‍यामुळे इतर वाहतूक वेठीला धरली जात असल्याने प्रचंड नाराजी असल्याची जाणीवही असूदेत!

- Advertisment -