राज्यसभा टेलिव्हिजनकडून पहिल्यांदाच एका मालिकेची निर्मिती केली जाणार होती. भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया मालिकेतून समोर आणण्याचे ठरल्यावर त्यासाठी श्याम बेनेगल या नावावर सगळ्यांचे एकमत झाले. या नावाइतका सक्षम आणि निर्णायक असा दुसरा अनुभवी पर्याय नव्हता. बेनेगल संसदेचे माजी सदस्य असल्याने तशीही काही अडचण नव्हती, अनेकविधता असलेल्या देशाला एका सूत्रात गुंफणारे भारतीय संविधान आकारास आणणे हे घटनेच्या निर्मितीकारांसाठी आव्हान होते.
तसेच आव्हान भारतीय राज्यघटना निर्मितीचा जवळपास तीन वर्षांचा कालावधी प्रत्येकी एक तासांच्या दहा मोजक्या भागांमधून समोर आणण्याचेही होते. त्यासाठी निवड, संशोधन आणि इतिहासाच्या संदर्भातील अचूनकता आदी घटकांचा अभ्यास महत्वाचा होता. हे आव्हान बेनेगल यांनी स्वीकारल्यावर कामाला सुरुवात झाली. जावेद अख्तर आणि सिनेक्षेत्राशी संबंधित मंडळी मदतीला होतीच.
भारतीय संविधान हे भारताच्या भविष्याचे प्रतिबिंब आहे. त्यामुळे देशाचे समाजकारण, संस्कृती, इतिहास, लोकशाहीने स्वीकारलेल्या घटनात्मक मूल्यांविषयी सजग असलेल्या श्याम बेनेगल यांची या मालिकेच्या दिग्दर्शनासाठी झालेली निवड हे सगळेच एपिसोड पाहिल्यावर अचूक ठरल्याचे स्पष्ट व्हावे, बेनेगल यांच्यासाठी मात्र ‘भारत कसा आकाराला आला’ या अभ्यासाची संधी होती, म्हणूनच तेही कमालीचे उत्साही होते.
आश्चर्यकारक वैविध्याचा इतिहास, राज्यव्यवस्था असलेल्या देशाच्या घटना निर्मितीकाळात सभागृहात झालेले वाद-विवाद, मत-मतांतरे, कलमकायद्यांची निर्मिती, सदस्यांच्या मतभेदांच्या पलिकडे घटना निर्मितीच्या उद्देशाशी प्रामाणिकता राखणे गरजेचे होते. संसदेच्या रेकॉर्डवर असलेला सगळ्याच चर्चांमधून छाननी करून लोकांवर थेट दिर्घकालीन परिणाम करणार्या दुरुस्त्या, चर्चांना दहा भागांमध्ये प्राथमिकता देण्याचे ठरले, सोबतच संविधानाचा मूळ ढाचा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि एकात्मतेचे मूलतत्व अधोरेखित करण्यासाठी तीन वर्षांचे सखोल संशोधन करण्यात आले.
सत्ता, राजकारणाच्या पलिकडे सक्षम भारताच्या निर्मितीसाठी वाद विवाद करणारे मात्र सक्षम भारताचे एकच उद्दीष्ट मनात असलेल्या सभागृहातील सदस्यांच्या प्रसंगांचे चित्रण हा आनंददायी अनुभव असल्याचे बेनेगल यांनी चित्रपट पूर्ण झाल्यावर सांगितले. जवळपास शंभरहून अधिक घटनादुरुस्त्या झाल्यानंतरही राज्यघटनेच्या पायाला धक्का लागणार नाही, याची काळजी कशी घेतली गेली, हे चित्रित करणे मोठा अनुभव असल्याचे बेनेगल म्हणाले होते.
राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेवर दहा तासांचा चित्रपट साकारताना तो बोजड न होता मनोरंजनाचे संतुलनही राखणे गरजेचे होते. प्रेक्षकांसाठी माहिती, शिक्षण आणि मनोरजंन या तीनही अपेक्षा पूर्ण करण्याची गरज होती.
मुंबईतल्या फिल्मसिटीत संसदेच्या सेंट्रल हॉलचा सेट उभारण्यात आला. दहा तासांच्या चित्रपटासाठी संसदेच्या आवारातही पहिल्यांदाच शूटींग केली जात होती. तीन वर्षांचे संशोधन आणि संदर्भ पडताळणी झाल्यावर बेनेगल आता जवळपास दीडशे कलाकारांच्या घेऊन शुटींगसाठी तयार झाले होते. बेनेगल यांना संविधानाविषयी असलेली आत्मियता त्यांनी ज्या पद्धतीने प्रसंगांची रचना निवड केली आहे, त्यातून स्पष्ट व्हावी.
जगाच्या तुलनेत भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात संविधाना किंवा स्वीकारलेल्या लोकशाहीविषयी पुरेशी सजगता आणि अभ्यास होत नाही, ही खंत बेनेगल यांना होती, ही पोकळी शक्य तेवढी भरून काढण्याचा त्यांचा प्रयत्न कमालीचा यशस्वी झाला. बहुवैविध्यपूर्ण भवताल असलेल्या देशाने स्वतःच्या भविष्याचा मार्ग स्वतःच निवडणे या ऐतिहासीक घटनेचे बेनेगल यांनाही दिग्दर्शकाच्या पलिकडे नागरिक म्हणून कौतूक होते.
बेनेगलांना देशातल्या विविधतेचे एकीकडे कौतूक होते मात्र दुसरीकडे देशात माणसांचे विभाजन करणार्या रुढी, परंपरा, संस्कृती संस्कार, लिंगभेद, आर्थिक तफावत, शोषण, संप्रदाय, धार्मिकतेनुसारची स्तरीय समाजव्यवस्था, भ्रष्टाचार, कुटुंबसंस्था अशा सामाजिक परिस्थितीचेही भान होते. त्यांच्या अंकुर, मंथन, भूमिका…आदी सर्वच कलाकृतींमधून ही बाब ठळकपणे स्पष्ट व्हावी. त्यामुळेच बेनेगल हे खर्या अर्थाने भवतालचा चेहरा कॅमेराबद्ध करणारे दिग्दर्शक आहेत, म्हणूनच चित्रपट, नाट्य, लेखनकर्त्यांना बेनेगल हे चित्रपटाशी संबंधित सर्वच विभागांची शिकवणी असलेले सर्वोच्च विद्यापीठ वाटावे.
श्याम बेनेगल यांच्या कलाकृतींमध्ये भारतातील व्यक्तीमते, व्यवस्था तसेच समाजरचनेतील दोषांचे चित्रण आहे, मात्र त्यासोबत त्याविरोधातील संघर्षही होता, भूमिका किंवा मंथन ही त्याची ठळक उदाहरणे असावीत, हंसा वाडकरांच्या सांगत्ये ऐका पुस्तकावरून ‘भूमिका’ साकारण्यात आला, यातील एका प्रसंगात स्मिता पाटील यांना घराच्या चार भिंतीबाहेर डोकावण्याला अमरिश पुरी मनाई करतात त्यावेळी स्मिता पाटील यांनी केलेले बंड महत्वाचे ठरते, हाच दिग्दर्शनातील सामाईक धागा संविधानातील स्त्री पुरुष समानतेच्या अधिकारांची चर्चा करताना बेनेगल यांच्या दिग्दर्शनातून समोर येतो.
बेनेगल यांना कलाकृतीतून ही कुठल्याही प्रकारची विषमता आणि शोषणाची व्यवस्था बदण्यासाठीच्या पर्यायाचा शोध संविधान चित्रपटातून महत्वाचा ठरला. श्याम बेनेगल यांनी त्यांच्या आधीच्या चित्रपट कलाकृतीतून समोर आणलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना संविधानाच्या दहा भागांतून मिळाली.
भवताल घेरून असलेला समाजाचे भान नागरिक म्हणून असायला हवे, यातून आपल्याला काय हवे, काय नको, आपल्या समाजाला आपल्याला कुठे न्यायचे आहे, आपल्या प्रवासाचा मार्ग योग्य आहे का, म्हणजेच माणूस म्हणूनही आपल्या दुसर्या माणसांप्रती असलेल्या जबाबदार्यांचे भान असायला हवे यासाठी बेनेगल आग्रही होते. व्यक्तीची प्रतिष्ठा कमी करणार्या घटकांपासून सावध असण्याला त्यांनी महत्व दिले, त्यासाठी राज्यघटना हे आपल्या अभिव्यक्ती आणि वर्तनाचे फ्रेमवर्क असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
बेनेगल यांना प्रश्न पडत होते, समाज आणि व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टींमुळे ते अस्वस्थ होत असतानाच येणार्या पिढ्यांवर त्यांचा विश्वास होता, म्हणूनच संविधानावरील भागांची निर्मिती करत असताना त्यांनी घटना दुरुस्त्यांचा उपयोग करून कुठल्याही समकाळात येणार्या पिढ्या घटनेचा पाया न बदलता योग्य ते काळानुसार नियमांमध्ये बदल करू शकतील, असा त्यांना विश्वास होता. राज्यघटनेच्या लवचिकतेचे त्यांना कौतूक होते.
सकारात्मक समाज बदलाचे सर्वात मोठे माध्यम म्हणूनही त्यांना राज्यघटना महत्वाची वाटत होती. घटनेतील समतेच्या तत्वाचा त्यांच्यावर सर्वात मोठा प्रभाव होता. आदर्शवादी राजकीय किंवा सामाजिक व्यवस्थेविषयी त्यांची मते वास्तवाशी फारकत घेणारी स्वप्निल जगात रमणारी नव्हती, परंतु बदल आणि परिवर्तन येत्या पिढ्यांच्या समकाळात आवश्यक आहे.
यातील सकारात्मक आशावाद बेनेगल यांच्यासाठी महत्वाचा होता, घटनादुरुस्तीविषयी त्यांनी व्यक्त केलेले मत म्हणूनच या आशावादाच्या कसोटीवर महत्वाचे आहे. हाच आशावाद घटनाकांरांनीही व्यक्त केला होता, त्याचा प्रभाव बेनेगल यांच्या जडण घडण, विचार आणि कलाकृतीतून समोर येत जातो. राज्यघटनेतील मूलभूत अधिकार, राष्ट्रध्वजमान्यता, मार्गदर्शक तत्वे या महत्वाच्या प्रसंगांना त्यांनी संविधान चित्रपटात म्हणूनच महत्व दिले.
श्याम बेनेगल यांच्या कलाकृतींची शीर्षके जरी वाचली तरी, निखळ माणूसपण, अभिव्यक्ती आणि स्वतंत्र असा विचार हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अभिन्न अंग असल्याचे स्पष्ट व्हावे. अंकुर, निशांत, मंथन, नेताजी सुभाषचंद्र बोस, मंडी, सूरज का सांतवाँ घोडा, कलियुग, सरदारी बेगम, आरोहन, मम्मो, जुबैदा अशा कित्येक कलाकृतींनी हिंदी पडद्याला समृद्धच केले नाही तर हिंदी चित्रपटांना वेगळ्याच उंचीवर नेले या उंची कायम राखणारे ‘अर्धसत्य’कार गोविंद निहलानी श्यामजींच्याच तालमीत शिकले.
अमरिश पुरी, अमोल पालेकर, स्मिता पाटील, नसिरुद्दीन शहा आदी अनेक कलावंतांना घडवण्यात श्यामजींचा मोलाचा वाटा होता. श्यामजींच्या चित्रपटात काम करायला मिळणे म्हणजे संपूर्ण कलावंत म्हणून मान्यता मिळण्यासारखी स्थिती होती. सत्तरच्या दशकात ज्या काळात व्यावसायिक सिनेमांचे महत्व वादातीत होते, या काळात श्यामजींनी ‘सत्यदेव दुबे यांच्या साथीने ‘अंकुर’ बनवण्याचे धाडस केले, चित्रपटाच्या अखेरीस लहान मुलाने तत्कालीन सामाजिक व्यवस्थेवर फेकलेला दगड पुढे नागराज मंजुळेतल्या जब्यानं फँड्रीमध्ये हातात घेतला.
आजचा नागराज किंवा तत्कालीन दिग्दर्शक अभिनेत्यांनाही श्यामजींच्या कलाकृतीतून काहीना काही गवसलेलेच आहे. अंकुरमध्ये शबाना आझमीने साकारलेल्या लक्ष्मीच्या भूमिकेसाठी श्यामजींची पहिली पसंती वहिदा रेहमान यांना होती, मात्र बेनेगल हे नाव चित्रपटक्षेत्रात नवे असल्याने वहिदाजींनी नकार दिला ज्याची नंतर त्यांना खंत वाटली असावी.
सत्यजीत रे, मृणाल सेन, तपन सिन्हा, सत्यदेव दुबे, गोविंद निहलानी, अमोल पालेकर या दिग्दर्शकांनी हिंदी आणि भारतीय सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानात श्याम बेनेगल या नावाला आजही पर्याय नाही. जब्बार पटेलांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ बनवायला घेतल्यावर त्यासाठी सल्लागार म्हणून श्यामजींनी काम पाहिले. खर्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांचे नाव सर्वोच्च श्रेणीत यावे.
भारतीय समाजमनाला पडद्यावर साकारण्याची हातोटी श्यामजींची होतीच, देहविक्रीसारख्या अती संवेदनशील विषयाची ‘मंडी’ पडद्यावर आणून बेनेगलांनी कमाल केली होती. हा इतका टोकदार, गडद आणि तीव्र विषय त्यांनी ब्लॅक कॉमेडीतून समोर आणताना त्याच्या आशयसूत्र आणि विषयाच्या गांभीर्याला जराही धक्का लागला नाही. श्याम बेनेगल यांचा कॅमेर्याने भारतीय समाजातील विसंगती परिणामकारकतेने टिपल्या सोबतच त्याविरोधात उठावही केले. हे करत असताना त्यांच्या कॅमेर्याला राज्यघटनेच्या चौकटीचे भान होते.
त्यामुळेच त्यांचे पडद्यावरील ‘बंड’ गुन्हेगारी किंवा हिंसेचे गैरलागू समर्थन करणारे झाले नाही. श्याम बेनेगल यांच्या जवळपास सर्वच कलाकृतींमधली माणसे ही डार्क ग्रे शेडमध्येच आढळतात. ही माणसं माणूसपणाच्या मर्यादेत आहेत, त्यामुळे ती प्रचलित अर्थाने सिनेमातील नायक किंवा नायिका नाहीत. आपल्या कॅमेर्याने त्यांनी माणसांचा हा शोध सुरूच ठेवला.
व्यावसायिक प्रवाहापेक्षा वेगळा विचार करून त्याशी प्रामाणिकता आयुष्यभर कायम ठेवणे सिनेइंडस्ट्रीसारख्या रुपेरी क्षेत्रात कठिण असते, अनेकांनी सुरुवात समांतर कलात्मक किंवा वेगळ्या धाटणीच्या सिनेमांपासून केली मात्र पुढे व्यावसायिक सिनेनिर्मितीत रमले, अशी नावे बरीच असताना श्याम बेनेगल यांनी मात्र मागील पाच दशके आपल्या कलाकृतीतून आपल्या अभिव्यक्ती, आपल्या म्हणण्याला ठामपणे कायम ठेवले. त्यांच्या चित्रपटांची भाषा अस्सल भारतीय माणसांची होती आणि आहे, जोपर्यंत ही भाषा आणि भारतीय माणूस आहे तोपर्यंत श्याम बेनेगल हे नावही कायम असणार.