महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम राहिला नाही. कालपर्यंत जे मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री झाले, अन् जे उपमुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रात महायुतीला पूर्ण बहुमत आहे, असं असूनही पूर्ण शक्तीचे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. महाराष्ट्राचं बरं-वाईट करणार्या अदृश्य शक्तीलाही गेल्या २० दिवसांत हे घडवून आणता आले नाही.
हा इथल्या माती आणि माणसांचा गुण म्हणावा की अवगुण? ऐरावतही इथल्या मातीत रुतून बसावा, अशी चिवट आणि कसदार ही माती आहे. महाराष्ट्र हा वाळूचा किल्ला नाही, एखादी लाट यावी आणि सर्वकाही ढासळून जाईल. इथल्या गड-किल्ल्यांनी अनेक वादळं अंगावर झेलली, अनेक लाटा लीलया परतवून लावल्या. म्हणून ही माणसं इथली माती आपल्या भाळी लावून लढायला निघतात.
भाजपला एकट्याला इथल्या माणसांनी पूर्ण बहुमत दिले नाही. आजच नाही तर गेल्या तीन निवडणुकांत दिले नाही. म्हणून इथल्या मातीतील माणसांशी जुळवून घेऊन, त्यांना ओंजारून-गोंजारूनच राज्य करावे लागत आहे. महायुती हा शब्द तीन पक्षांना एकत्र केल्यामुळे सार्थकी लागला होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपला तिसर्या सहकार्याची गरज राहिली नाही, असे वाटावे, असेच त्यांचे वागणे सध्या सुरू आहे.
महायुतीमधील एक सहकारी नाराज आहे, हे लपून राहिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोन दिवसांपासून दिल्ली मुक्कामी आहेत. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे आणि कोणाला किती स्थान द्यायचे याची खलबतं होत आहेत. हे सर्व होत असताना शिवसेनेचे नेते आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत नसणं, यातच या सरकारमधील ताळमेळ कसा आहे हे सांगण्यासाठी पुरेसं आहे.
एकनाथ शिंदे हे भाजपची गरज कधीच नव्हते. भाजपची गरज होती, संख्या! विधानसभेच्या बहुमताच्या भोज्याला शिवण्यासाठी जो आकडा लागतो त्यासाठीचे ते एक साधन होते. भाजपचे साध्य हे कायम सत्ता राहिले आहे. त्यासाठी जे-जे काही करावे लागले, आणि त्यासाठी ज्यांचा कोणाचा शिडीसारखा वापर करावा लागेल तो करण्याची तयारी या पक्षाने कायम दाखवली आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंह यादवांना एकटी भाजप हातही लावू शकत नव्हती. तेव्हा त्यांनी कांशीराम यांची बसपा आणि त्यांच्या नेत्या मायावती यांना सोबत घेतले.
बसपा आणि भाजपच्या युतीने भाजपचे काहीही बिघडले नाही, मात्र बसपा आणि मायावती यांचा मतदार हा भाजपकडे सरकला. मायावती यांना त्यांच्या विचारधारेच्या ३६० अंशांच्या कोनात बदल करावा लागला. बहुजन समाज पक्षाचे चिन्ह हत्ती, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचे चिन्ह होते. त्यांनी स्वीकारलेल्या विचारधारेचे प्रतीक असलेले हे चिन्ह कांशीराम यांनी मोठ्या मेहनतीने मिळवले आणि टिकवले. मात्र भाजपच्या वळचणीला गेलेल्या मायावती यांनी हाथी नही गणेश हैं, ब्रम्हा विष्णू महेश हैं, म्हणत त्या विचारधारेलाच हरताळ फासली.
अवघ्या दहा-पंधरा वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असलेल्या मायावती यांचा आज लोकसभा आणि उत्तर प्रदेश विधानसभेतून सुपडा साफ झाला आहे. जोपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्वबळावर उभे राहता येत नव्हते, तोपर्यंत त्यांनी तिथे बसपा आणि इतर पक्षांची मदत घेतली. भाजपला महाराष्ट्रात हेच शिवसेनेसोबत करायचे होते, मात्र उद्धव ठाकरेंनी वेळीच हे मनसुबे ओळखले. आता तिच वेळ एकनाथ शिंदेंवर आली आहे का, असे म्हणणे घाईचे होईल. मात्र सावधानतेचा इशारा नक्कीच आहे.
भाजपने २०१४, २०१९ आणि आता २०२४ मध्ये सलग तीन निवडणुकांमध्ये शतकी आकडे गाठले आहेत. १२२, १०५ आणि १३२ अशी त्यांची कामगिरी राहिली आहे. १९९५ नंतर शंभरपेक्षा जास्त जागा जिंकणारा महाराष्ट्रात कोणताच पक्ष नव्हता. भाजपने शंभरी गाठली होती, मात्र त्यांना तिन्ही वेळा स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. २०१४ मध्ये त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र २०१९ साली पुन्हा एकत्रित शिवसेनेसोबत त्यांची युती होती.
तर २०२४ मध्ये शिवसेनेच्या मोठ्या गटाचे आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाची साथ त्यांना होती, त्यामुळे १३२ चा चमत्कार भाजप करू शकली हेही विसरता येणार नाही. अजित पवार यांची राष्ट्रवादी ही कायम सत्तेत राहिलेल्या शिलेदारांची आहे. त्यामुळे अडीच वर्षही ते सत्तेबाहेर राहू शकले नाहीत. अजित पवार आणि फडणवीस यांची मैत्रीदेखील अधिक गहिरी असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे.
भाजपला स्वबळावर सत्ता मिळत नाही, हे लक्षात आल्यामुळेच त्यांनी २०१९ मध्ये मित्र बदलण्याची तयारी सुरू केली होती. राष्ट्रवादीसोबत त्यांचे सूत जुळत आले होते, त्यातूनच दीड दिवसाचे सरकार अस्तित्वात आले होते. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात आणि त्यातही चार ते पाच विविध भौगोलिक विभागात विभागलेल्या राज्यात एकहाती सत्ता मिळणे कठीण. त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्याची रणनीती तयार केली गेली.
राष्ट्रवादीचा १९९९ पासूनचा आलेख पाहिला तर या पक्षाला २००४ साली मिळालेल्या ७१ जागा सोडल्या तर ४० ते ५५ दरम्यान कायम जागा मिळत राहिल्या आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही अजित दादांच्या राष्ट्रवादीला ४१ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १०, दोन्ही मिळून ५१ पर्यंतच राष्ट्रवादी पोहचली. भाजप स्वबळावर शंभरी गाठत असताना त्यांना बहुमताच्या भोज्याला शिवण्यासाठी राष्ट्रवादीच्या ४० ते ५० जागांची मोठी मदत पुढील काळात होणार, हे लक्षात घेऊनच २०१९ ला फासे टाकण्यात आले. मात्र अडकले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे यांना खरी शिवसेना आणि शिवसैनिकांचे बळही या निवडणुकीत मिळाले. मात्र भाजपला जे हवे होते, ते त्यांना राष्ट्रवादीच्या साथीने यंदाच्या निवडणुकीत मिळाले आहे आणि पुढील निवडणुकीतही मिळत राहील याची शाश्वती आहे. त्यामुळेच सध्या शिंदे हे महायुतीमध्ये वेगळे पडलेले दिसत आहेत. मात्र त्यांना असे वेगळे राहून फार काळ चालणार नाही. त्यांच्यासोबतच्या आमदारांनाही चालणार नाही.
त्यामुळेच पाच डिसेंबरला राजभवनावर शपथविधीसाठी शेवटचे नाव गेले ते एकनाथ शिंदेंचे होते. जरीही उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक नसले तरी त्या पदाला मिळणारा मान हा मोठा आहे. अजूनपर्यंत शिंदे हे भाजपला वर्ज्य नाहीत हेही लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांच्या साथीमुळेच भाजपच्या बाहूत १३२ चे बळ आहे. त्यामुळे शिंदेंना जास्त दिवस नाराज ठेवून महायुतीचा गाडा चालणार नाही. गृहखाते नाही मिळाले तरी, त्याची भरपाई करणारी खाती ते घेतील एवढे नक्की.