घरसंपादकीयअग्रलेख‘खोक्या’तून बाहेर पडा!

‘खोक्या’तून बाहेर पडा!

Subscribe

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ‘खोके’ हा परावलीचा शब्द झाला आहे. शिवसेनेतून शिंदे गट फुटून सुरत मार्गे गुवाहाटीत जाऊन पोहचला तेव्हा या ‘खोके’ शब्दाचा जन्म झाला. नंतर तर या शब्दाशिवाय शिंदे आणि भाजप विरोधकांच्या प्रतिक्रिया, भाषणे पूर्ण होत नाहीत. ‘पन्नास खोके एकदम ओक्के’ हा नवा ‘वाक्प्रचार’ही जन्मास आला. प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी तर ‘खोके’ शब्दाची भलतीच धास्ती घेतली. ते मध्यंतरी म्हणत की, कुणाच्या विवाह समारंभात गेलो तरी या खोक्यांवरून टोमणे ऐकावे लागतात. याच खोक्यांवरून मध्यंतरी त्यांच्यात आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये जोरदार वाक्युद्ध झालेले पहावयास मिळाले. शिंदे गटातील प्रत्येक आमदाराला पन्नास खोके मिळाले हा विरोधकांचा आरोप आहे. असे आरोप कधी सिद्ध करता येत नाहीत. राजकारणात पैशांचा खेळ चालत असला तरी छुपी देवाण-घेवाण कधीच समजत नसते. त्यामुळे आरोपांपुरते खोके, पेट्या हे शब्द ठीक आहेत. शिंदे विरोधकांचा खोक्यांचा आरोप वारंवार सुरू असताना आता फ्रिजच्या आकाराएवढे कंटेनर भरून खोके कुणाकडे गेले, असा सवाल दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला असून खोके विरुद्ध खोके असे राजकारण सुरू राहील असेच एकप्रकारे संकेत देऊन टाकले आहेत. शिंदे यांचा रोख कुणाकडे, हे सर्वांना समजले आहे. आता ते खोके कुठे गेले याचा शोध शिंदे घेणार आहेत. जबाबदार नेत्यांकडून अशा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहून सामान्यजन कपाळाला हात लावून घेत असतील.
राजकारणात, विशेषत: राजकारणातील उच्च वर्तुळात वावरत असताना नेत्यांनी किमान सभ्य, संयमी भाषा वापरावी हे अपेक्षित आहे. आता मात्र उलट होऊ लागले आहे. हा सर्व आेंगळवाणा प्रकार पाहिल्यानंतर असे वाटते की महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रश्न संपून सर्वत्र आबादीआबाद आहे. महाराष्ट्र राज्याने देशासाठी दीपस्तंभासारखे काम करावे अशी अपेक्षा असते, पण सध्या महाराष्ट्राचे खच्चीकरण कसे होईल हे पाहिले जात आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे धिंडवडे निघत असताना आमचे इथले नेते मिठाची गुळणी घेऊन गप्प असल्याचे केविलवाणे दृश्य दिसते. महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात असताना सत्ताधारी केंद्राला खडे बोल सुनावताना दिसले नाहीत. अर्थात अशी अपेक्षा करणे बालिशपणाचे ठरेल, कारण प्रत्येकाला खुर्ची टिकवायची असल्याने दिल्लीश्वरांचा कोप ओढवून घेणे त्यांना परवडणारे नाही. अलिकडे शिंदे-फडणवीस सरकारने काही चांगले निर्णय घेतलेसुद्धा; पण या सरकारची अवस्था अद्यापही भांबावल्यागत दिसत आहे. बहुमताच्या आकडेवारीत शिंदे आणि फडणवीस यांनी बाजी मारली असली तरी हे सरकार अनेकदा ठोस निर्णय घेताना दिसत नाही. महाराष्ट्रातून पुन्हा उत्तराखंडात परतण्याची इच्छा व्यक्त केलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावण्याचे काम जमेल तसे केलेले आहे. अलिकडे तर त्यांची मजल महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवरायांबाबत बेताल बोलण्यापर्यंत गेली. राज्यपालांना परत बोलवा याकरिता एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे आग्रह धरला नाही. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर या दोघांच्याही प्रतिक्रिया सारवासारव केल्यासारख्या होत्या. परिणामी जनतेला सरकारची भूमिका आवडलेली नाही. राज्यापुढे अनेक प्रश्न असताना ते सोडविताना सरकार कष्ट उपसतेय हेही कुठे दिसत नाही. अनेकदा मंत्री भलतेसलते बोलून स्वत:च्या अंगावर राळ उडवून घेत आहेत. खोक्यांवरून विरोधक वारंवार डिवचत असताना त्यांच्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटात अहमहमिका सुरू आहे की काय असे वाटावे! मध्यंतरी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना त्यांनी कारण नसताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत विधान करून टीकेचा आग्यामोहोळ उठवून दिला. राजकीय नेत्यांनी संयम ठेवूनच बोलले पाहिजे. किंबहुना, याचे भान प्रत्येक नेत्याला हवे आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेत्यांना महापुरुषांबाबत सबुरीने बोलण्याचा सल्ला दिला ते योग्यच आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य काय असेल, हे न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होईल. न्यायालयातील प्रकरणे झटपट निकाली निघतील अशी सुतराम शक्यता नाही कारण दोन्ही बाजूंनी निष्णात आणि नामवंत वकिलांची फौज बाजू मांडण्यासाठी तैनात आहे. त्यामुळे कायद्याचा किस काढला जाईल हे नक्की आहे, मात्र जे काही दिवस आपल्या हाती आहेत त्याचा योग्य वापर करून जनहिताचे निर्णय तातडीने घ्यावेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. त्याला रंगणार्‍या राजकीय आखाड्यांचे देणेघेणे नाही. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत असेपर्यंत ‘खोके’ ‘ओक्के’ हे आरोप होतच राहणार आहेत, पण या आरोपांना प्रत्येकवेळी उत्तर देण्यात मुख्यमंत्री आणि मंत्री वेळ घालवणार असतील तर ते योग्य ठरणार नाही. परवाच्या आसाम दौर्‍यावरूनही विरोधकांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकारी मंत्री, आमदारांना डिवचले आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही प्रत्युत्तर दिले. शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, बेरोजगारी यासह अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी बोलावे ही अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यात विकासाचे मुद्दे गौण असतील. मुख्य फोकस आरोप-प्रत्यारोपांवरच असेल हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही. विरोधकांनीही आता राज्याच्या प्रश्नावर बोलावे ही अपेक्षा आहे. अनेकदा त्यांच्याकडूनही ताळतंत्र सोडले जात आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सुरू असलेली धुमश्चक्री पाहिल्यानंतर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सत्ताधारी विरुद्ध विरोधकांतील राजकारण तेव्हा खिलाडीवृत्तीने घेतले जात असे. विरोधक सत्ताधार्‍यांना आणि सत्ताधारी विरोधकांना सन्मान देत असत. आता तसे होत नाही. काही तरी खुसपट काढून टीकेचे आसूड ओढत राहणे हेच चालले आहे. महाराष्ट्रात जे काही चाललेय ते सुखावणारे चित्र नाही. राजकारणात येऊ इच्छिणार्‍या तरुण पिढीला यातून नेमका कोणता बोध घेता येणार, तेच कळेनासे झाले आहे. नेतृत्त्व क्षमता असलेले तरुण राजकारणातील बजबजपुरी पाहून लांब राहात असल्याचे लक्षात घेतले पाहिजे. यातून नेते मंडळींच्या घराणेशाहीला आयतेच बळ मिळतेय. राजकारणात आदर्श घ्यावा असा एकही नेता शिल्लक राहिलेला नाही. राजकारण जर खोक्यांभोवतीच फिरत राहणार असेल तर मग सारा आनंद आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत खोकेच कानावर आदळणार असतील तर राज्याची प्रगती कशी होणार, याची ब्ल्यू प्रिंट सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेसमोर ठेवावी. खोक्यात जनतेला स्वारस्य नाही. त्यामुळे नेत्यांनी खोक्यांतून लवकर बाहेर पडायला हवे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -