घरसंपादकीयस्मृतिस्थळावर तरी सुबुद्धी सुचावी!

स्मृतिस्थळावर तरी सुबुद्धी सुचावी!

Subscribe

धनुष्यबाण कुणाचा यावरून सगळे घोडे अडून बसले आहे. कारण ज्याच्या हाती धनुष्यबाण त्याचे शिवसेनेवर खरे वर्चस्व असे मानले जात आहे. शिवसेनेतील दोन गट सध्या धनुष्यबाणावरून लढत आहेत. उच्च, सर्वोच्च न्यायालय, राज्य, केंद्रीय निवडणूक आयोग अशा विविध ठिकाणी खरी शिवेसना कुठल्या गटाची हे सिद्ध करण्यासाठी कायद्याचा, कलमांचा, आजवर या संबंधित झालेल्या राजकीय घडामोडींचा किस पाडला जात आहे.

धनुष्यबाण कुणाचा यावरून सगळे घोडे अडून बसले आहे. कारण ज्याच्या हाती धनुष्यबाण त्याचे शिवसेनेवर खरे वर्चस्व असे मानले जात आहे. शिवसेनेतील दोन गट सध्या धनुष्यबाणावरून लढत आहेत. उच्च, सर्वोच्च न्यायालय, राज्य, केंद्रीय निवडणूक आयोग अशा विविध ठिकाणी खरी शिवेसना कुठल्या गटाची हे सिद्ध करण्यासाठी कायद्याचा, कलमांचा, आजवर या संबंधित झालेल्या राजकीय घडामोडींचा किस पाडला जात आहे. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी जे बंड घडवून आणले आहे, त्यामुळे सगळ्याच यंत्रणा बुचकळ्यात पडल्या आहेत, कारण शिंदे यांच्या बंडाचा जो प्रकार आहे, त्याला समांतर असे आजवर दुसरे उदाहरण नाही, त्यात पुन्हा शिवसेनेचा वारसा हक्क हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, तर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची जास्त संख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. आजवर राजकीय पक्षांमध्ये बंडे झाली त्यामध्ये बंड करणारा नेता आपल्या समर्थकांना घेऊन बाहेर पडला. त्यानंतर त्याने आपला स्वत:चा पक्ष तरी स्थापन केला, किंवा तो अन्य कुठल्या तरी पक्षात सहभागी झाला, पण शिंदे हे आपल्या समर्थक आमदार, खासदार, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेतून फुटून बाहेर पडले नाहीत, तर त्यांनी वेगळ्याच प्रकारचे बंड केले. त्यांनी खरी शिवसेना आपलीच असा दावा केला. त्या अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारसरणी आपल्याशी जुळणारी नाही, किंबहुना विरोधी आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून ज्या पक्षांच्या विरोधात आपण लढलो, झगडत राहिलो, त्या पक्षांसोबत आपण आघाडी करत आहोत. त्यामुळे आपल्याला जरी मुख्यमंत्रीपद मिळाले असले तरी पक्षाची पुढील वाटचाल अवघड असणार आहे, याची कल्पना उद्धव ठाकरे यांना असावी, पण त्यावेळी त्यांनी भाजपने जो आपल्याला शब्द दिला होता, तो पाळला नाही, असे सांगत त्यांना धडा शिकवण्यासाठी टोकाचे पाऊल उचललेले आणि शरद पवारांच्या जाळ्यात ते अलगद अडकले.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शरद पवारांनी आपल्या पक्षाला राज्यातील सत्तेचा वाटा मिळवला, पण मुख्यमंत्रीपद मिळवलेले उद्धव ठाकरे एका विचित्र कोंडीत सापडले होते. याची त्यांना कल्पना असूनही ते काही करत नव्हते. पुढे त्यांचे परिणाम जे व्हायचे ते झाले. आपल्या साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळत आहे, म्हणून शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते सुरुवातीला गप्प बसले, त्यात पुन्हा तो काळ कोरोना महामारीचा होता. सगळेच जण जीव वाचवण्याच्या मागे लागलेले होते. त्यामुळे शिवसेनेत आतमध्ये काय धुमसत आहे ते बाहेर कळत नव्हते, पण जसा कोरोना ओसरला तसे ज्या गोष्टी दबून राहिलेल्या होत्या, त्या बाहेर आल्या. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे भाजपची हातातोंडाशी आलेली सत्ता गेली. त्यामुळे जसे भाजपला धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. तसेच काहीही करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सत्ता घालवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी अडीच वर्षे सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शेवटी शिवसेनेतील अनुभवी नेते एकनाथ शिंदे यांची नाराजी भाजपच्या पथ्यावर पडली. त्यामुळे भाजपला उद्धव ठाकरे यांच्यावर सूड उगवता आला. त्यांच्याच पक्षातील नेता घेऊन आपल्या पक्षाचा सहभाग असलेले सरकार स्थापन करता आले. त्यामुळे तुमच्या नाकाखालून आम्ही सरकार घेऊन गेलो ते तुम्हाला कळलेदेखील नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना ऐकवून दाखवले. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपचा फायदा झाला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, पण शिंदेंनी खरी शिवसेना आपलीच, आम्हीच खरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहोत, असा दावा केला आहे. तर दुसर्‍या बाजूला शिंदेंकडे ठाकरे हे आडनाव नाही, कारण पक्षाची घटना ही ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली होती. त्यामुळे मोठा पेच निर्माण झालेला आहे.

- Advertisement -

अंधेरी पूर्व येथे झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या या दोन गटांमुळे निवडणूक आयोगही पेचात पडला, कारण एकाच पक्षावर दोन गट दावा करत असताना मतदान कसे घ्यायचे असा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे या दोन गटांना वेगळी नावे आणि वेगळी निवडणूक चिन्हे द्यावी लागली. शिंदे यांच्यासह १६ आमदारांंना पात्र किंवा अपात्र ठरवण्याचा मुद्दा न्यायालयात आहे. त्याचसोबत शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हावरून दोन्ही बाजूंचा व्युक्तिवाद ऐकून घेऊन त्यांना येत्या ३० जानेवारीपर्यंत आपले म्हणणे लेखी मांडण्यास सांगितले आहे. शिंदे यांनी विजयी बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा केल्यामुळे हा वाद अतिशय गुंतागुतीचा झालेला आहे. त्यामुळे न्यायालयाने सुरुवातीपासूनच दोन्ही बाजूंना आम्हाला तुमचे म्हणणे लेखी द्या, असे सांगितले आहे. शिवसेनेचे जन्मदाते संस्थापक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. दोन्ही गट बाळासाहेब आमचेच म्हणून शिवतीर्थावर यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतील. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेवर आज जे अभूतपूर्व संकट आलेले आहे, ते दूर करण्यासाठी स्मृतिस्थळावर नतमस्तक होणार्‍या दोन्ही गटांच्या नेत्यांना बाळासाहेबच सुबुद्धी देतील अशी अपेक्षा आहे. कारण कायदेशीर मार्गाने हा गुंता सुटणे खूपच अवघड आहे, असेच आजवरचे युक्तिवाद पाहिल्यावर दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -