– संदीप वाकचौरे
विद्वान लोकांनी न्याय व वेदांत याकडे जेवढे लक्ष दिले तेवढे उपयोगी कलाकौशल्यांकडे दिले असते आणि ते श्रमाला जोडले असते, तर त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या असत्या. हे उद्गार होते मराठी पत्रकारितेचे जनक बाळाशास्त्री जांभेकर यांचे. शिक्षण म्हणजे केवळ अक्षराची ओळख. त्यापलीकडे शिक्षणाचा विचार असतो. शिक्षण श्रमाशी जोडले गेले असते तर वर्तमानात असणारे अनेक प्रश्न निश्चित सुटले असते. श्रमाचे आणि मानवी जीवनाचा विकास यांच्यात एक प्रकाराचे नाते आहे. दुर्दैवाने त्यावेळी श्रमापासून दुरावलेल्या शिक्षणाची नाळ वर्तमानातही जोडली गेली नाही. श्रमापासून मुक्ती म्हणजे शिक्षण अशीच वर्तमानात धारणा बनत चालली आहे. शिक्षणाची प्रक्रिया ही केवळ बुध्दिविकासाची वाट चालत आहे. त्यामुळे श्रमाकडे झालेल्या दुर्लक्षाने समाजात विषमता वाढत आहे. त्यातूनच अनेक समस्यांचा जन्म झाला आहे. मुळात विद्या हे बळ आहे. त्या दिशेने आपण चालण्याचा प्रयत्न केला तर समाजाला सहजतेने परिवर्तनाची वाट सापडणे शक्य झाले असते.
विद्या म्हणजे केवळ साक्षरता नाही हेही कायम लक्षात घेण्याची गरज आहे. दुर्दैवाने शिक्षणाकडे साक्षरतेच्या पलीकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. पत्रकारितेची वाट चालताना बाळशास्त्री जांभेकर यांनी शिक्षणाचे मोल अनेकदा अधोरेखित केले होते. पत्रकारितेची वाट समृद्धपणे चालायची असेल तर आपल्याला शिक्षणाचा विचार करण्याची गरज अधिक आहे. शेवटी माणसांचे प्रबोधन करायचे असेल तर तो प्रबोधनाचा विचार करण्याएवढी सक्षमता माणसांच्या मस्तकात यायला हवी. परिवर्तनाची वाट शिक्षण आणि पत्रकारितेच्या वाटेनेच जाते हे लक्षात घ्यायला हवे.
मध्ययुगीन असलेली सरंजामशाही मानसिक मनोवृत्तीचे दर्शन लोकांच्या जीवनात घडते होते. ती मनोवृत्ती बदलण्याची गरज अनेक विचारवंताना वाटत होती. समाजात सुधारणा घडवून आणायची असेल तर समाज सुधारणेसाठी शिक्षणासारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही. त्यांनी आपल्या ‘दर्पण’ वर्तमानपत्रामध्ये यासंदर्भाने सातत्याने विचार रूजवण्याचा प्रयत्न केला होता. इंग्रज अधिकारी लॉर्ड बेकल यांनी म्हटले होते की, विद्या हे बळ आहे. विद्येच्या बळाची जाणीव लोकांमध्ये झाली नाही. आपल्याकडे विद्येचा प्रसार आणि प्रचार करताना त्यात कायम विषमता राहिली. आपल्याला शिक्षणाचे मोल समजले नाही, अशी खंतही ते व्यक्त करतात. त्यांनी दर्पणच्या माध्यमातून शिक्षणाचे मोल नमूद करीत शहाणपणाची वाट चालण्याचा प्रयत्न व्हावा म्हणून पेरणी केली होती.
लोकांमध्ये विद्येचे मोल सांगताना त्यांनी लोकजागृती, लोकशिक्षण आणि लोकप्रबोधन यावर सातत्याने भर दिला होता. लोकांना आपल्या पारंपरिक विचारांपासून दूर सारायचे असेल, चुकीच्या दिशेचा प्रवास बदलायचा असेल तर शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्याची गरज आहे. दर्पण म्हणजे आरसा. आरसा नेहमीच जसे आहे तसेच दाखवतो. बाळशास्त्री जांभेकर यांनी लोकांच्या मानसिकतेचे विश्लेषण करून त्यामागील कारणांची अनेकदा मीमांसा केली आहे. आपल्या सामाजिक व्यवस्थेच्या दोषांवर नेमके बोट ठेवत त्यांनी केवळ पाश्चात्यांचे अनुकरण करण्याची गरज अधोरेखित केली नाही. मुळात त्यांनी विवेकाची वाट चालत नेमकेपणाने समाजाला योग्य वाटेवर चालण्यासाठी दिशा दाखवली. भारताच्या स्त्री शिक्षणाचा विचारही जांभेकरांनी केला होता. स्त्रियांच्या वेदनांच्या मागे शिक्षणाचा अभाव हे एक कारण त्यांनी नोंदवले होते. त्यांनी त्या काळात प्रबोधनाची वाट चालताना विज्ञाननिष्ठेची दृष्टी प्रदान केली होती. समाजातील अन्याय, अत्याचाराला आळा घालायचा असेल तर शिक्षणाचे विचार रूजवण्याची गरज आहे.
समाजात शहाणपण आणि विवेकी वाट चालण्यासाठी विचारमंथन घडावे यासाठी त्यांनी सतत विचाराची पेरणी केली होती. कालबाह्य रूढी, परंपरांवर जांभेकरांनी कठोर शब्दात प्रहार केले. पाश्चात्यांच्या शिक्षण विचाराचे मोल ते जाणत असले तरी आपल्यातील मूल्यनिष्ठेची वाट त्यांनी कधीच सोडली नाही. जे जे वाईट असेल त्यावर अत्यंत कडक शब्दांत टीका करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. त्या काळात त्यांच्या विवेकी वाटा अनेक सनातनी प्रवृत्तीच्या लोकांना पसंत नव्हत्या. मुळात शिक्षण घेऊन त्यांना एक प्रकारची दृष्टी निर्माण झाली होती. समाजाच्या विकासात काय महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन त्यांनी नेहमीच विवेकाची वाट धरली. त्यामुळे त्यांना अनेकदा अपप्रचाराला बळी पडावे लागले होते.
त्या काळी लोकांनी म्हटले होते की बाळशास्त्री जांभेकर हे पाव-बिस्किटे खातात आणि ग्लासाने पाणी पितात, अशी अफवा पसरवण्यात आली होती. त्यांच्या या वैज्ञानिक दृष्टीमुळे तत्कालीन अनेक पारंपरिक आचार्यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी त्यांच्याशी दोन हात करीत न्याय्य मार्गाची वाट चालणे पसंत केले होते. मुळात शिक्षणात ती शक्ती असते. शिक्षणाचा विचार जेव्हा केला जातो तेव्हा शिक्षण माणसाच्या मस्तकात शक्ती पेरत असते. ज्या काळात समाजाची मानसिकता मध्ययुगीन सरंजामशाही स्वरूपाचीच मानसिकता होती. त्या काळात त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी, प्रबोधनासाठी घेतलेली भूमिका वर्तमानातही तोंडात बोट घालायला लावणारी आहे. त्यांनी त्या काळात विधवा पुनर्विवाहाचा विचार केला होता. स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्यता व गुलामगिरीचे निर्मूलन झाले पाहिजे ही धारणा ठेवत लेखन केले.
बाळशास्त्री हे केवळ पत्रकार, संपादक होते असे नाही तर ते मुळात शिक्षक होते. त्यांनी 8 भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले होते. त्याचबरोबर भाषा, विज्ञान, इतिहास, भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्म यांसारख्या अनेक विषयांमध्ये त्यांनी पारंगतता प्राप्त केली होती. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी शिक्षक म्हणून आपल्या कामाला आरंभ केला होता. शिक्षक म्हणून आवश्यक असलेले अनेक गुण त्यांच्या ठायी होते. त्या काळात त्यांचे एडिंबरो रिव्हू रॉयल एशियाटिक सोसायटीसारख्या नामवंत पत्रिकांमधून शोध निबंध प्रकाशित झाले होते. त्याचबरोबर त्यांच्या सामाजिक सुधारणांचा विचार केला तर बाळशास्त्री जांभेकर जगाच्या कितीपट पुढे होते हे सहजतेने लक्षात येईल. वर्तमानातही जो विचार प्रतिपादन करणे, भूमिका घेणे अवघड वाटते असे विचार त्या काळात समाजात मांडणे आणि सुधारणावादी भूमिका घेणे हे किती महत्त्वाचे पाऊल होते हे सहजतेने लक्षात येईल. शिक्षक म्हणून काम करणार्या माणसाने जगाच्या कितीपुढे विचार करण्याची गरज असते हे द्रष्टेपण लाभण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक शिक्षणाचा सखोल विचार केलेला दिसून येतो.
आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भाषा अभिजात होत असताना तिचा विकास घडावा, समृद्ध व्हावी, जगातील ज्ञान आपल्या भाषेत यावे आणि येथील सामान्य मराठी माणूस ज्ञानसंपन्न व्हावा यासाठी प्रयत्नांची गरज आहे. डॉ. स्टीव्हन्स यांनी त्यावेळी म्हटले होते की, आधुनिक ज्ञानाची ओळख होण्यासाठी सुशिक्षित भारतीयांना इंग्रजी शिक्षण देणे आवश्यक आहे. त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. इंग्रजी भाषेतून मिळवलेले ज्ञान आपल्या देशातील बांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी मराठीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
इंग्रजी भाषेतील ज्ञान प्रतिपादनाची क्षमता मराठी भाषेमध्ये आणण्यासाठी मराठी भाषेचा विकास करणे आवश्यक आहे. त्याकाळी मराठी भाषेच्या संदर्भाने करण्यात आलेला विचार वर्तमानातही पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. या स्वरूपाचे प्रयत्न झाले तर भाषेचे मोल उंचावते आणि समाजात ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करीत माणसांमध्ये विवेक, शहाणपणाची वाट चालणे सहज शक्य होते. आज मातृभाषेतील शिक्षणाची चळवळ चालवण्यासाठी प्रयत्न होत आहेत, मात्र ती भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्या दृष्टीने विचार केला तर मराठी भाषा ज्ञानभाषा होण्याबरोबर ती शिक्षणाची महत्त्वाची भाषा बनेल. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांचा हरवत चाललेला श्वास पुन्हा गतीने सुरू होईल.