Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
Homeसंपादकीयअग्रलेखBeed Crime : बीडवर आकांचा ठेका?

Beed Crime : बीडवर आकांचा ठेका?

Subscribe

गुंडगिरी, दादागिरी, खंडणी, खूनखराबा, लूटमार अशी चर्चा सुरू झाली की लगेच बिहारचे नाव डोळ्यांसमोर यायचे. इतका बिहार बदनाम झाला होता. बिहारची प्रतिमा आता खूप बदलल्याचे बोलले जाते, मात्र ती जागा आता बीडने घेतली, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही अशी सध्याची स्थिती आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृणरित्या हत्या झाल्यानंतर ज्या काही घटना समोर आल्यात त्यावरून बीड जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली आहे.

बीडमध्ये गुंडगिरीची मुळे किती घट्ट रुजली आहेत याचे दाखले रोज समोर येत आहेत. या भयानक गुंडगिरी, हत्याकांडांमुळे बीडचा वेगळा राजकीय चेहरा महाराष्ट्राला दिसू लागला आहे. सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडचा क्रूर चेहरा महाराष्ट्रासमोर आला.

खंडणी, गुंडगिरी, थेट पोलिसांशी संबंध यामुळे वाल्मिक कराडचे हात किती वर पोहचलेत याची बीडकरांना जाणीव झाली होती आणि याच वाल्मिकच्या खांद्यावर हात ठेवत आपली राजकीय पोळी भाजून घेणारे कोण हेही अवघ्या महाराष्ट्राने दोन-अडीच महिन्यांत पाहिले आहे. बीडमधील राखेचे राजकारण, त्यासाठी पाडलेल्या मुडद्यांची चर्चा आणि हेच गाडलेले मु़डदे आता वर येऊ लागल्याने गुंडांची झालेली पळापळ सर्वांना उघडपणे दिसू लागली आहे.

वाल्मिक कराडप्रमाणेच आता दुसरे नाव आले आहे ते सतीश भोसले उर्फ खोक्या याचे. त्याच्यावर वसुली, खंडणीचे आरोप आहेत. त्याचा पैशांचा माज माध्यमांमुळे सर्वांनी पाहिला आहे. गंभीर बाब म्हणजे वाल्मिक कराडचे नाव चर्चेत आले तेव्हा त्याच्याशी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव जोडले गेले. तसे आरोप आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनीही केले होते.

कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष उल्लेख केला होता, मात्र खोक्याचे प्रकरण उघडकीस आले तेव्हा तो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली. धस यांनीही ते नाकारले नाही, शिवाय तो असले काही करीत होता हे माहीत नसल्याचे थेट सांगून टाकले. असे असले तरी जबाबदारी नाकारता येणार नाही. ज्या संदीप क्षीरसागर यांनी भ्रष्टाचाराविरोधात जोरदार आवाज उठवला त्यांनी पुढे तहसीलदारांना धमकी दिल्याची क्लिप व्हायरल झाली. ती धमकी त्यांनीच दिली की त्यांच्या आवाजाचा कुणी गैरवापर केला हा भाग वेगळा.

बीड जिल्हा यापूर्वीही बदनाम झाला होता. 2010 मध्ये डॉ. सुदाम मुंडे याच्यामुळे परळीतील गर्भपात प्रकरण खूप चर्चेत आले होते. या मुंडेने बेकायदा गर्भपाताचे अक्षरश: दुकान उघडले होते. एवढेच नाही तर गर्भपात केल्यानंतर विल्हेवाट कशी लावायची म्हणून तो पाडलेले गर्भ कुत्र्याला खायला घालायचा. त्याला अटक झाली, तुरुंगात गेला. त्यानंतर जामिनावर बाहेरही आला, मात्र पुन्हा त्याने तेच धंदे सुरू केल्यामुळे आता तो जेलमध्येच आहे.

बीडच्या बदनामीला आणखी एका प्रकरणाने मोठा हातभार लावला होता. पाच-सहा वर्षांपूर्वी बीडमध्ये गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. महिलांना वेगवेगळे आजार असल्याचे सांगून पैसे उकळण्यासाठी गर्भाशय काढण्याचे प्रकरण खूप गाजले होते. एक-दोन नव्हे तर तब्बल 4 हजार 600 हून अधिक महिलांची गर्भाशये काढल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी चौकशीसाठी सात सदस्यांची चौकशी समिती स्थापन झाली होती.

असेच आणखी एक प्रकरण आहे ते बीड जिल्ह्यातील परळीमधील राखमाफियांचे. 1971 मध्ये परळीत औष्णिक विद्युत केंद्र सुरू झाले. त्यातून राख बाहेर पडू लागली. याचा स्थानिकांना खूप त्रास होत होता आणि आहे, मात्र या राखेतून चांगल्या दर्जाची वीट तयार होते हे लक्षात आल्यावर परळीत राखमाफिया तयार झाले. या वीटनिर्मितीसाठी एकाला टोल द्यावा लागत असे. परळीत हजाराहून अधिक वीटभट्ट्या बांधल्या गेल्या. या सर्वांचा कुणीतरी आका होता. हा टोल कोण वसूल करीत होता याची माहिती बीडमधील जनतेला आहे.

विशेष म्हणजे बीडमध्ये हे सर्वकाही खुलेआम सुरू असताना याची बाहेरच्या जिल्ह्यात किंवा मुंबईसारख्या शहरात किंवा अगदी विधिमंडळात कधी चर्चाही झाली नाही. ज्या बीडने गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा उपमुख्यमंत्री आणि खंबीर गृहमंत्री दिला, त्या बीड जिल्ह्यामधील दादागिरी-गुंडगिरी-हत्याकांडांची एकेक प्रकरणे बाहेर येत आहेत आणि त्यातून बीडचा राक्षसी चेहरा समोर येत आहे हे पुरोगामी महाराष्ट्राचे अपयश म्हणावे लागेल.

बीडमध्ये हे सर्व अनेक वर्षांपासून सुरू होते आणि आता हे समोर येऊ लागले आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. आता देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मुत्सद्दी मुख्यमंत्री आणि कणखर गृहमंत्र्यांकडे राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. त्यांनी बीडमधील गुंडगिरीचे मूळ उखडून टाकून त्यांच्या आकांना कायमचे जेरबंद करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनात आणले तर त्यांना अशक्य काहीच नाही.