बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अतिशय निर्घृणरीत्या हत्या केल्याच्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. ही हत्या अतिशय अमानवी प्रकारे करण्यात आली तसेच त्याला अनेक कांगोरे आहेत.त्याचा संबंध सत्ताधार्यांपर्यंत पोहचत असल्याचे आरोप विरोधी पक्षांतील नेत्यांकडून होऊ लागले. नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय लावून धरला. त्यावेळी विरोधकांकडून ज्या धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यात येत होते, ते सभागृहात सतत गैरहजर असल्याचे दिसून आले.
विरोधकांच्या आरोपांच्या फैरींना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी ठासून सांगितले की, जे आरोपी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही, तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही सभागृहात आम्ही आरोपींची गय करणार नाही, असे सांगितले, पण अधिवेशन संपल्यावर महाविकास आघाडीतील नेतेच नव्हे तर महायुतीतील आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना लक्ष्य करीत असताना अजित पवार कुठलीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. संतोष देशमुख यांंच्या हत्येचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. त्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी तीन मोर्चे निघाले.
आता मुद्दा असा आहे की, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी सर्व बाजूंनी दबाव येत आहे. सध्या बीड हे केवळ संतोष देशमुख यांच्या हत्येमुळेच नव्हे तर पुढे आलेल्या वाळूमाफिया, राखमाफिया, अनेकांकडे असलेली शस्त्रे, खंडणीबाजांचा हैदोस यामुळे बदनाम झाले आहे. बीडमधील एकूणच माफिया राज आणि संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड याचा हात आहे, असा आरोप आहे. तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. अन्य आरोपी पकडण्यात आले आहेत.
या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी सगळीकडून जोर धरत आहे. या एकूणच परिस्थितीचा विचार करून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना काही महिने बाहेर बसवले, तर त्याने काय साधणार आहे, असा प्रश्न पडतो. कारण यापूर्वीही थेट मंत्र्यांवर विविध प्रकारचेे गंभीर आरोप झाले आणि त्यांचे राजीनामे घेऊन त्यांना बाहेर बसवण्यात आले. त्यावेळी त्या तपासातून काहीही निष्पन्न झालेले दिसले नाही.
याची अनेक उदाहरणे देता येतील. खुद्द अजित पवार याचे उदाहरण आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील सरकारमध्ये अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांनी घेरले आणि विविध पुरावे सादर केले. तेव्हा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन वर्षभर बाहेर बसवले होते, पण पुढे त्या सिंचन घोटाळा तपासातून काय निषन्न झाले ते सगळ्यांनाच दिसले. ज्यांनी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आणि तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला, त्याच भाजपने त्यांना या घोटाळ्यातून आरोपमुक्त केले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर एका तरुणीचे शोषण आणि तिने केलेली आत्महत्या यावरून आरोप झाले. भाजपच्या चित्रा वाघ आणि त्यांच्या सहकार्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे त्यावेळी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचे पुढे काय झाले? तेच संजय राठोड आज महायुतीच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याचे आरोप झाले. त्यावेळी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. काही काळ त्या प्रकरणाची चौकशी झाली.
आज तेच अशोक चव्हाण भाजपसोबत आहेत. इतकेच कशाला १९९५ च्या सुमारास मुंबई महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त गो. रा. खैरनार यांनी त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप केले. त्यावेळी सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. आज जसा धनंजय मुंडे यांच्या विरोधात आगडोंब उसळला आहे, तशीच त्यावेळी स्थिती होती. शरद पवार यांची चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्यात त्यावेळी छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेतला. तेलगीची नार्को टेस्ट झाली.
त्याचे चित्रण वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आले. त्यात त्याने भुजबळ आणि पवार यांची नावे सांगितली. त्याविषयी पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता शरद पवार म्हणाले की,‘जो माणूस शुद्धीत नाही, त्याच्या बोलण्यावर तुम्ही कसा काय विश्वास ठेवता.’ आरोपांनंतर मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांची झालेली चौकशी आणि त्याची निष्पत्ती याचा हा असा ज्ञात इतिहास आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन होणार्या चौकशीतून यापेक्षा काही वेगळे निष्पन्न होईल याची अपेक्षा करावी का?