Wednesday, March 26, 2025
27 C
Mumbai
HomeसंपादकीयओपेडBook Review : जातीभेदाच्या फटीतून उगवणारा प्रेमाचा अंकुर!

Book Review : जातीभेदाच्या फटीतून उगवणारा प्रेमाचा अंकुर!

Subscribe

साहित्यातील कथा, कविता, कादंबरीच्या माध्यमातून समाजातील विकृतीवर बोट ठेवल्याने डोळ्यांवरची झापडं उघडण्यास मदत होते. भरत काळे यांची ‘जात्यांत’ अशीच कादंबरी, ज्यात निखळ प्रेमाबरोबरच संस्कार कृतज्ञता, परोपकाराची जाणीव, शिकवण अधिक स्पष्ट करते. ही कादंबरी काल्पनिक असली तरी वास्तवाशी निगडित आहे. जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची महत्त्वाकांक्षा जोपासल्यानंतर सर्व सुख प्राप्त करून यशस्वी आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडते आणि आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते. याचाही प्रत्यय कादंबरीतून येतो.

-प्रदीप जाधव

जातीयता, विषमता मानवी विकास प्रक्रियेतील अडथळा समजला जातो. त्याचा सामाजिक एकात्मता अखंडतेबरोबरच सामाजिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो.जातीयतेने पोखरलेल्या समाजात समन्वयाचा अभाव असतो. कायद्याने यावर निर्बंध असल्याने पुरोगामी आधुनिक महाराष्ट्रात ही तीव्रता मात्र कमी होत आहे. समतावादी आणि जातीअंताच्या चळवळी अधिक जोमाने काम करतात. त्याचाही दृश्य स्वरूपाचा हा परिणाम आहे. आजच्या आंतरजातीय विवाह पद्धतीमध्ये मुली आणि मुलाकडचे दोन्ही पालक एकत्र येऊन संमतीने निर्णय घेऊन दोन्हीकडच्या दोन्ही पद्धतीने सामंजस्यने विवाह करतात.

या अभिनव पद्धतीने दोन जात समूहांतील मतभेद कमी होऊन जातीय सलोखा वाढला आहे. ग्रामीण भागातील मानसिकतेत मात्र तितकासा बदल झाला नाही. त्यासाठी शिक्षण, संवाद आणि साहित्यातून प्रबोधन व्हायला हवं. शिक्षणाबरोबरच साहित्यातून समाजाचे वैचारिक भरणपोषण निश्चित होते. साहित्यातील विचारांचा समाजावर सकारात्मक परिमाण होत असतो. समाजातील वाईट रूढी, प्रथा, परंपरा, रितीरिवाज, चालीरीती बदलण्याची ताकद साहित्यात आहे.

साहित्यातील कथा, कविता, कादंबरीच्या माध्यमातून समाजातील विकृतीवर बोट ठेवल्याने डोळ्यांवरची झापडं उघडण्यास मदत होते. भरत काळे यांची ‘जात्यांत’ अशीच कादंबरी, ज्यात निखळ प्रेमाबरोबरच संस्कार कृतज्ञता, परोपकाराची जाणीव, शिकवण अधिक स्पष्ट करते. ही कादंबरी काल्पनिक असली तरी वास्तवाशी निगडित आहे. जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची महत्त्वाकांक्षा जोपासल्यानंतर सर्व सुख प्राप्त करून यशस्वी आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडते आणि आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते.

याचाही प्रत्यय कादंबरीतून येतो. जांभूळ आख्यान, वेडी माणसं, ती फुलराणी या प्रचंड गाजलेल्या नाटकांबरोबरच मराठी, हिंदी, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करणारे अभिनेते भरत काळे यांच्या ‘मै जिंदगी का साथ निभाते चला गया’ या आत्मकथानंतरची पहिलीच कादंबरी. त्यांना नाटक, चित्रपट क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

अशरीरी, निस्सिम, अगाध प्रेम काय असतं याचा पदोपदी अनुभव कादंबरी वाचताना येतो. स्थूलमानाने कादंबरीचा विषय बघितला तर कादंबरीचा नायक सत्यवान तांबे, एक मागास समजल्या जाणार्‍या समाजातील तरुण आणि सई ही उच्चवर्णीय समाजातील तरुणी यांच्यातील जीवापलीकडचं प्रेम. इयत्ता चौथीत शिकताना वडिलांचे छत्र हरपल्यामुळे, पोट भरण्याचं काहीच साधन नाही, तेव्हा सत्यवानाची आई पोपटराव पाटलांना म्हणते, आमच्या मालकांनी तुमच्याकडून साठ रुपयांचे कर्ज घेतलंय.

ते फेडायचे आहे. तेव्हा एक विनंती करायला आली होती. पाटील, ‘माझ्या सत्यवानाला तुमच्या पायावर घालते. तुमची सगळी कामे करेल तो. गोठा साफ करेल, जनावरांना चारा देईल, पाणी दाखवील. दुसरी इतर कामेही करेल. फक्त त्याची शाळा बुडू देऊ नका. गरिबावर एवढी कृपा करा.’ सत्यवान फक्त साठ रुपयांच्या कर्जापोटी पोपटराव पाटलांकडे कामे करून शाळा शिकतोय. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला उन्नतीचा मार्ग सापडणार नाही याची त्याला जाणीव आहे.

पाटलाची मुलगी सई हीदेखील त्याच्याच वयाची आणि त्याच्याच वर्गात शिकत आहे. सत्यवान मुळात हुशार, तो सईला अभ्यासात मदत करतो आणि वाढत्या वयाबरोबर दोघांमध्ये अबोध प्रीतीचे धागे विणले जातात. दोघांनाही समाज जीवनाचं भान आहे. दोघेही प्रेमाचा प्रत्यक्ष उल्लेख न करताही मौनाच्या भाषेतून एकमेकांच्या मनीचे गूज जाणतात.

सईचं सत्यवानवर जीवापाड प्रेम असलं तरी एक घरगडी आणि खालच्या जातीचा असल्याने दोघांनाही त्यांच्या मर्यादा माहीत होत्या. बर्‍याचदा संमती असूनसुद्धा समाजातील लोक काय म्हणतील या लोकभावनेपोटी मनातील भावना दाबल्या जातात. पोपटरावांनी सईचं लग्न करून दिलं, परंतु तिचं मन मात्र सासरी काही रमत नव्हतं. दरम्यानच्या काळात सत्यवान काम करीत शिकला. मुंबईला आला.

मंत्रालयात नोकरीला लागला. नोकरी करीत त्याने शिक्षण सुरू ठेवलं आणि पुढे यूपीएससी पास होऊन मोठ्या पदावर गेला, पण तो पोपटराव आणि पाटलीणबाईंचे उपकार कधीच विसरला नाही. आई-वडिलांसारखं त्यांनी त्याला प्रेम दिलं. सईच्या वडिलांचे निधन झालं. पोपटराव पाटलांच्या इच्छेनुसार सत्यवानने अग्नी दिला. सत्यवान आता स्थिरस्थावर झाल्यावर त्यानेही लग्न केलं.

सईची मुलगी सत्यवतीला शिकवण्यासाठी सत्यवानने मुंबईला आणली. तिचं शिक्षण पूर्ण करून दिलं. सत्यवानला मुलं झाली. त्याच्या दोन्ही मुली परदेशात राहायला गेल्या. त्याच दरम्यान सई आजारी झाली. तिलाही त्याने आपल्या सरकारी बंगल्यावर आणून तिच्या औषधोपचाराचा खर्च केला. तिचा नवरा बलवंतराव मात्र तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही हे लक्षात आल्यानंतर सत्यवानाने सगळा खर्च उचलत आपल्या घरीच सईकरिता केअरटेकर ठेवली.

सईच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यानंतर सईची मुलगी सत्यवती आणि बलवंत यांची किडनी जुळत असतानासुद्धा सत्यवान सत्यवतीला म्हणाला, तू लहान आहेस. तू किडनी देऊ नको. बलवंत मात्र हुलकावणी देऊन गावी निघून गेला. अशा वेळेस सत्यवानाने आपल्या मैत्रिणीला आपली किडनी दान केली आणि बलवंतला अट घातली की, मी किडनी दान केली हे सईला कधी कळता कामा नये.

सत्यवानची पत्नी सुगंधा हे सर्व पाहत होती, परंतु निखळ प्रेम पाहून तिलाही गहिवरून आलं. ती सत्यवानाला म्हणते, भल्याभल्यांना जमणार नाही असं काम तुम्ही करीत आहात याची मला पूर्ण जाणीव आहे. भरपूर पैसे देऊन किडनी विकत मिळू शकते माहीत आहे, पण असले बेकायदा कृत्य तुम्ही करणार नाही. सईच्या वडिलांना तुम्ही जो शब्द दिलात आणि पाळत आहात त्याला सिंहाची छाती लागते.

तुम्हा दोघांचे बालपणीचे प्रेम निष्पाप आणि निष्कलंकित आहे हे कळायला शब्दांचे दाखले नकोत, का कुणाचे साक्षी पुरावे नकोत. तुमच्या आणि सईबद्दल मला नितांत आदर आहे. तुम्हा दोघांचे नितांत प्रेम जातीभेदामुळे पूर्णत्वाला पोहचू शकले नाही ही एक मोठी शोकांतिका आहे. जशी घट्ट दुधाला जाडसर साय येते ना तसे तुमच्या आधीच्या घट्ट प्रेमाचे रूपांतर निर्व्याज मायेत झाले आहे.

सईची मुलगी सत्यवती विशाल नावाच्या मुलाबरोबर जो खालच्या जातीचा आहे, त्यासोबत आंतरजातीय विवाह ठरवते. त्याला मात्र सई पाठिंबा देते. कारण तिला आलेला अनुभव, झालेला पश्चाताप आपल्या मुलीला होऊ नये असे तिला वाटते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्यवान सत्यवतीला आपल्या मुलीसारखीच मानतो आणि तिच्या लग्नाची तयारी करतो. दरम्यानच्या काळात स्वत:च्या पत्नीचं निधन झालं.

त्या धक्क्यातून तो सावरत नाही तोपर्यंत सत्यवती विशाल नावाच्या मुलाला घरी आणते. ओळख करून देताना सांगते की, हा माझा होणारा नवरा आहे आणि तो मागासवर्गीय आहे. सत्यवान त्याचं स्वागत करतो आणि लग्नाच्या दिवशी सत्यवतीच्या हातात एका फ्लॅटची चावी देऊन सांगतो की, मी माझ्या कर्तव्यातून मुक्त झालो. परोपकाराची भावना ठेवून सत्यवान अतिशय प्रेमळ आयुष्य जगतो. इथे सद्भावना, माणुसकीला पाझर फुटतो.

या कादंबरीमध्ये सईबरोबर सत्यवती, विशाल यांचा संदर्भ अशा पद्धतीने आहे की त्यांच्यावर स्वतंत्र कादंबरी होऊ शकते. सई सत्यवान आणि विशाल यांची विचारधारा माणुसकी आणि प्रेम शोधते. जातीयता विषमता मिटवण्यासाठी आज पुरोगामी विचारांची समाजाला फार मोठी गरज आहे. त्याचा आदर्श कादंबरीच्या रूपाने समाजासमोर लेखकाने उभा केला आहे. अभिनेते, लेखक व दिग्दर्शक मोहन साटम आपल्या अभिप्रायातून लिहितात की, भरत काळे यांची ही कादंबरी मराठी साहित्याचा उत्तम नमुना ठरणार आहे. सुरेश देशपांडे यांची प्रस्तावना कादंबरीचा आशय अधिक स्पष्ट करते.

=लेखक – भरत काळे
=प्रकाशक – प्रतिभा प्रकाशन, इस्लामपूर
=पृष्ठे – ३०३, मूल्य – ४०० रुपये