Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
HomeसंपादकीयओपेडBook Review in Marathi : जगभरात मराठी रुजविण्याची मराठीजनांची जिद्द!

Book Review in Marathi : जगभरात मराठी रुजविण्याची मराठीजनांची जिद्द!

Subscribe

सातासमुद्रापार असलेल्या परदेशस्थ मराठी माणसांच्या कार्याचा, मायबोली मराठी आणि संस्कृतीसंवर्धनासाठी परिश्रमपूर्वक राबविलेल्या उपक्रमाचा, त्यांच्या जिद्दीचा आणि आपला वारसा जपण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा धांडोळा ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकातून मेघना साने यांनी घेतलेला आहे. मेघना साने यांचा जगभरातील गोतावळा पाहून आपणही आवाक् होतो. जगभरातील मराठी माणसांशी, उद्योजक, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि त्यांच्याशी साधलेला संवाद या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी माणसांपर्यंत पोहोचवला आहे.

– प्रदीप जाधव

स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्याचबरोबर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही अपवाद वगळता प्रत्येकालाच कामधंदा, नोकरी-व्यवसाय करावाच लागतो. रोजगार हा शारीरिक, बौद्धिक, शैक्षणिक पात्रतेनुसार मिळत असतो. आज आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करणार्‍यांची संख्या अधिक आहे. भारतात लोकसंख्येच्या विस्फोटाच्या तुलनेत पुरेशी रोजगार निर्मिती होत नाही.

परिणामी काम करण्याची पात्रता, क्षमता असूनसुद्धा आटापिटा करूनही काम मिळत नाही. काम नाही तर दाम नाही, दाम नाही तर पोट भरू शकत नाही अशी अवस्था आहे. आपल्या शैक्षणिक कुवतीनुसार रोजगार मिळत नाही म्हणून नाईलाजस्तव आपल्या मायभूमीला सोडून उत्तम अर्थार्जनासाठी, पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतातून जगभरात लोक विशेषत: तरुण स्थलांतर करीत असतात.

महाराष्ट्रातील मराठी माणूस जगाच्या विविध देशांमध्ये गेला, मात्र त्याने आपलं मराठीपण जपलेलं आहे. स्थिरस्थावर झालेल्या लोकांनी आपल्या माणसांचा शोध घेत एकत्र येऊन तिथे आपली मराठी संस्कृती वृद्धिंगत केली आणि मराठी शाळा सुरू केल्या आहेत. वर्षातून एकदा एकत्र येऊन महाराष्ट्रातील सण, उत्सव, संमेलने साजरी करतात.

त्या कार्यक्रमांना महाराष्ट्रातून दिग्गज साहित्यिक, कलाकारांना बोलावतात आणि अमृताशी पैजा जिंकणार्‍या आपल्या मराठीचा आनंद घेत असतात. काही ठिकाणी रेडिओ, दूरचित्रवाणी, मराठी वृत्तपत्रेसुद्धा तिथे पुरवली जातात. मराठीच्या अस्मितेपोटीच हा सगळा अट्टाहास केला जातो. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी जगभरातून मराठी भाषेविषयी असणारे प्रेम हे शाश्वत, चिरकाल टिकणारं आहे.

जगभरात मराठी भाषिक त्या-त्या प्रांतात एकत्र येत विविध कार्यक्रम करीत असतात. या कार्यक्रमांना लेखिका, निवेदिका, साहित्यिका मेघना साने यांनी कार्यकर्त्या, प्रमुख पाहुण्या, मुलाखतकार अशा वेगवेगळ्या रूपाने भेटी दिल्या. परदेशात मराठी शाळा स्थापन करण्यासाठीची चळवळ कशी झाली असेल? त्यांनी वर्ग कुठे चालवले असतील? त्यांचा अभ्यासक्रम कसा निर्माण केला असेल? या कुतूहलापायी त्या शाळांतील शिक्षकांपर्यंत जाऊन पोहचल्या.

सातासमुद्रापार असलेल्या परदेशस्थ माणसांच्या कार्याचा, त्यांच्या मायबोली आणि संस्कृतीसंवर्धनासाठी परिश्रमपूर्वक राबविलेल्या उपक्रमाचा, त्यांच्या जिद्दीचा आणि आपला वारसा जपण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा धांडोळा ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकातून मेघना साने यांनी घेतलेला आहे. मेघना साने यांचा जगभरातील गोतावळा पाहून आपणही आवाक् होतो. जगभरातील मराठी माणसांशी, उद्योजक, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि त्यांच्याशी साधलेला संवाद या पुस्तकाच्या माध्यमातून मराठी माणसांपर्यंत पोहोचवला आहे.

मेघना साने यांचा ‘कोवळी उन्हे’ हा एकपात्री प्रयोग जगभर गाजतो आहे. कथा, काव्य, नाटक, बालनाट्य, प्रवासवर्णन, हायकू त्याचबरोबर विविध वृत्तपत्रे, दिवाळी अंकांमध्ये विपुल लेखन त्या करीत असतात. आतापर्यंत त्यांची वेगवेगळ्या विषयांवरची 13 पुस्तके प्रकाशित आहेत. अभिनयातही त्यांचा वावर आहे. मराठी रंगभूमीवरील ‘तो मी नव्हेच’ या अजरामर नाटकात त्यांनी प्रभाकर पणशीकर यांच्यासोबत सतत पाच वर्षे सुनंदा दातार ही भूमिका साकारली.

‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकातही त्यांनी महत्त्वाची भूमिका केली आहे. अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि टीव्हीवरच्या मालिकांमधून त्या आपल्याला दिसत असतात. रेडिओ विश्वास या इंटरनेट रेडिओच्या मुलाखतकार ही त्यांची विशेष ओळख. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकाला यंदाचा कोमसाप आणि मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचा संकीर्ण वाङ्मयाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.

मेघना साने आपल्या मनोगतात लिहितात, मराठी जनांची एवढी मोठी संमेलने परदेशात होतात हे ऐकून त्यावर लिहावेसे वाटले. महाराष्ट्रात एखादे संमेलन आयोजित करण्यासाठी जेवढे कष्ट करावे लागतात त्यापेक्षा कितीतरी पटीने तेथील मंडळींना या उपक्रमासाठी वेळ व पैसे खर्च करावे लागतात. निरनिराळ्या शहरांतील मंडळी एकत्र येऊन मराठी कार्यक्रमांचा आनंद घेतात. महाराष्ट्रातील काही मराठी व्यक्तींची नावेही सातासमुद्रापार पोहचली आहेत, त्यांचेही कार्य मला लोकांसमोर ठेवावेसे वाटले. म्हणूनच हा लेखन प्रपंच. सातासमुद्रापार मराठी माणूस आपली भाषा आणि संस्कृती यांचं जतन करतोय.

महाराष्ट्रात एकामागून एक मराठी शाळा बंद होत असताना अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया येथे मात्र मराठी शाळा चालविण्यासाठी सुशिक्षित नागरिक विनावेतन काम करीत आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. अमेरिकन मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धन या लेखात त्या लिहितात, अमेरिकेत मराठी शाळा आणि त्यासाठी खास अभ्यासक्रम वगैरे असतो हे ऐकून माझे कुतूहल जागृत झाले. अधिक माहितीसाठी मी विद्या जोशी यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्याकडून महाराष्ट्र मंडळाच्या स्थापनेपासून माहिती मिळाली.

1960 ते 70 च्या दशकात कॅनडा, अमेरिका येथे महाराष्ट्रातील लोक नोकरी किंवा धंद्यानिमित्त जाऊन वस्ती करू लागले, स्थायिक होऊ लगले, पण महाराष्ट्रातील वातावरणात वाढल्यामुळे ते मराठी भाषा आणि संस्कार विसरू शकत नव्हते. त्यांना आपल्या भाषिक समूहाला भेटण्याची आणि आपल्या भाषेत व्यक्त होण्याची गरज भासू लागली. आपले संस्कार टिकवणे महत्त्वाचे वाटू लागले. मग मराठी वंशाच्या लोकांना एकत्र करण्यासाठी आणि एकमेकात संवाद घडवून आणण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र मंडळे स्थापन केली.

नॉर्थ अमेरिकेत अनेक महाराष्ट्र मंडळे आहेत. त्यातील शिकागो महाराष्ट्र मंडळ हे सर्वात जुने असून 1969 साली स्थापन झाले. त्यानंतर इतर महाराष्ट्र मंडळे स्थापन झाली. त्यात अधिकाधिक मराठी लोक सहभागी होत आहेत. तेथे 1 मे रोजी सर्व मराठी विद्यार्थ्यांना घेऊन ‘महाराष्ट्र दिन’ थाटात साजरा होतो. मराठी माणूस सातासमुद्रापलीकडे गेला तरी नाटकाचा वेडा आहे. शिकागोमधील मंडळींना नाटकाचे भारी वेड आहे.

नाटकाचे आयोजन किंवा नाट्यसंगीताचा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ दरवर्षी करीत असते. नाटक हे आपल्या संस्कृती संवर्धनातील एक उपक्रम आहे असे ते मानतात. 1990 पासून सिडनी मराठी मंडळाचे सभासद झालेले मूळचे महाराष्ट्रातील वसईचे नेपोलियन आल्मेडा ऑस्ट्रेलियातील मराठी जगात हळूहळू सामावून गेले. नाटकांचे दिग्दर्शन करू लागले आणि ऑस्ट्रेलियातील मराठी रंगभूमीच्या कक्षा त्यांनी अधिक विस्तृत केल्या.

अमेरिकेतील मराठी शाळांचे प्रेरणास्थान सुनंदा टुमणे या आहेत. त्यांच्याविषयीच्या विशेष लेखात मेघना साने लिहितात, शाळा नेमक्या कधी सुरू झाल्या, त्यांचा अभ्यासक्रम कसा ठरला? मराठी भाषेला अमेरिकेच्या शालेय शिक्षणात काय स्थान आहे? मराठी शिकल्यामुळे अमेरिकेतील मूळ मराठी वंशाच्या मुलांचा काही फायदा होतो का? होत असेल तर कोणता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी कॅनडामधील मिसिसांगा येथील सुनंदा टुमणे यांच्यापर्यंत पोहचले.

त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर कळले की त्यांच्या प्रयत्नाने आणि प्रेरणेने तेथील मराठी शाळांना शिस्तबद्ध स्वरूप प्राप्त झाले. मराठी भाषेचे बाळकडू मूळ मराठी मुलांना सहज देता आले. न्यू जर्सी येथील मराठी शाळा आणि मराठी माणसांविषयी त्या लिहितात, अमेरिकेत राहून या मंडळींनी त्यांची भाषा आणि राहण्याची पद्धत फक्त अनुसरली, पण त्यांची संस्कृती स्वीकारली नव्हती. अमेरिकेत जन्मलेल्या मराठी वंशाच्या मुलांच्या भाषेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

त्यासाठी स्नेहल वझे यांनी पुढाकार घेऊन शनिवार-रविवारच्या सुट्टीत आपल्या आणि मैत्रिणीच्या मुलांना एकत्र आणून आपल्या घरातच खेळीमेळीच्या वातावरणात मराठी शिकवायचे ठरवले आणि या उपक्रमाला यश आले. यातूनच पुढे शाळा आकाराला आली. हीच आजची न्यू जर्सीमधील मॉर्गनविल मराठी शाळा. आपल्याच मराठी कर्तृत्ववानांची ओळख करून त्यांचा योग्य गौरव मेघना साने यांनी पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. सुप्रसिद्ध लेखिका अनुराधा नेरूरकर यांची प्रस्तावना असून जगभरात या पुस्तकाला मागणी आहे.

=लेखिका -मेघना साने =प्रकाशक -ग्रंथाली, मुंबई =पृष्ठे -144, मूल्य -200 रुपये