भारतानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यास नकार दिल्याबाबतचा ई-मेल आयसीसीकडून अधिकृतरित्या मिळाल्याची कबुली पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी नुकतीच दिली. भारताच्या नकारामुळं पाकिस्तानातून नाराजीचा सूर उमटला आहे. तसा तो उमटणंही स्वाभाविकच होतं. सोबतच हायब्रीड मॉडेलनुसार स्पर्धा घेण्याची तयारी आहे किंवा नाही, याचं उत्तर द्या, असंही आयसीसीनं पाकिस्तानला विचारलं आहे. या ई-मेलवरून भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.
१९ फेब्रुवारी २०२५ ते ९ मार्च २०२५ दरम्यान रंगणार्या या स्पर्धेचा यजमान देश पाकिस्तानच आहे. प्रस्तावित वेळापत्रकानुसार या स्पर्धेच्या लढती लाहोर, कराची आणि रावळपिंडी शहरात होणं अपेक्षित आहे. खरं तर जेव्हापासून पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद मिळालंय, तेव्हापासून भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमीच असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळं मागील वर्षभरापासून पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि पाकिस्तानचे माजी खेळाडू कधी इशारे देत, तर कधी चिथावणीखोर वक्तव्यं करत भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तानात शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेच्या निमित्तानं ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानात गेलेले भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. एवढं करूनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही, असं आयसीसीला कळवून टाकलं. त्यामुळं पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे.
जोपर्यंत पाकिस्तान सरकार सीमेपलिकडून होणार्या दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम करत राहील, तोपर्यंत पाकिस्तानसोबत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा अशा कुठल्याही प्रकारचे संबंध भारत ठेवणार नाही, अशी केंद्र सरकारची ठाम भूमिका आहे. या भूमिकेला अनुसरूनच उभय देशांमध्ये द्विपक्षीय मालिका घेण्यास आणि पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास बीसीसीआयची तयारी नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारताच्या लढती या पाकिस्ताबाहेरच व्हाव्यात आणि अंतिम सामन्याचं ठिकाणही पाकिस्तानबाहेरच असावं, अशी भूमिका बीसीसीआयनं ई-मेलद्वारे आयसीसीपुढं मांडली आहे.
पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद मिळाल्यावर भारताच्या स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होताच भारत पाकिस्तानात का खेळणार नाही, त्याचं लिखित कारण पीसीबीनं बीसीसीआयकडून मागितलं होतं. पण बीसीसीआयनंदेखील गुगली टाकत आयसीसीला ई-मेल करून पाकिस्तानला या मुद्यावर क्लीन बोल्ड केलं. बीसीसीआयनं आयसीसीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये भारत पाकिस्तानात जाण्यास का तयार नाही, याचं कारण नमूद केलेलं नाही, यावरून पीसीबी आयसीसीला घेरण्याच्या प्रयत्नात आहे. बीसीसीआयच्या पत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी पीसीबीनंही आयसीसीला एक पत्र पाठवलं आहे.
गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येऊन खेळला होता, तेव्हा पाकिस्तानात येऊन क्रिकेट खेळण्यास भारताची काय अडचण आहे, हे आम्हाला कळायला हवं, जेणेकरून आम्हाला त्यावर मार्ग काढता येईल, असा धोशा पीसीबीनं आयसीसीच्या पाठीमागं लावला आहे. एवढंच नाही, तर जोपर्यंत भारत पाकिस्तानात येऊन खेळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानदेखील आयसीसी किंवा आशिया क्रिकेट परिषदेच्या कुठल्याही स्पर्धेत भारतासोबत सामना खेळणार नाही, इथून पुढं आयसीसी किंवा आशिया क्रिकेट परिषदेनं भारत आणि पाकिस्तानला कुठल्याही स्पर्धेच्या गटात एकत्र ठेवू नये, अशी आक्रमक भूमिका पीसीबीनं पत्रातून मांडली आहे.
येत्या २ वर्षात भारतात २ वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहेत. पुढील वर्षी वर्ल्ड कप महिला वनडे क्रिकेट स्पर्धा होईल. तर २०२६ मध्ये भारतात वर्ल्ड कप टी-२० स्पर्धा आहे. याच मुद्यावरून पाकिस्तान क्रिकेट मंडळ बीसीसीआयसह आयसीसीला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. पीसीबीच्या काही पदाधिकार्यांनी तर भारताविना चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचा प्रस्तावही आयसीसीकडं दिला होता.
परंतु, आयसीसीने हे शक्य नसल्याचं सांगत एकतर स्पर्धा हायब्रीड पद्धतीनं होईल किंवा स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानबाहेर होईल, असं स्पष्ट करत पाकिस्तानच्या आक्रमक बाण्याला केराची टोपली दाखवली. चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी देशातील क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी पुढच्या आठवड्यात पाकिस्तानात येण्याची शक्यता होती. त्याआधी आयसीसीनं स्पर्धेचं वेळापत्रक घोषित करावं, यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ आयसीसीवर दबाव टाकत होतं, पण त्याचा आता काहीही उपयोग होणार नाही, असं आयसीसीच्या कडक पवित्र्यावरून दिसत आहे.
भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की हाय व्होल्टेज ड्रामा. क्रिकेटच्या बॅटलफिल्डमधील ही लढत जगातल्या कुठल्याही कानाकोपर्यात होवो, तो सामना बघायला स्टेडियम नेहमीच हाऊसफुल्ल होतं. स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघणं ज्यांच्यासाठी अशक्य असतं असे कोट्यवधी प्रेक्षक कामधंदा बाजूला ठेवून टीव्ही-स्मार्टफोनला चिकटून बसतात. हाय एनर्जीसह हाय टीआरपी, हाय स्पॉन्सरशीप आणि तेवढाच मजबूत पैसा असं हे समीकरण आहे. मागच्या काही वर्षांपासून आर्थिक हलाखीचा सामना करत असलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला अशाच हाऊसफुल्ल लढतीची अपेक्षा आहे.
जेणेकरून पीसीबीच्या तिजोरीतल्या खडखडाटाचं रुपांतर खळखळाटात होईल. त्यामुळंच भारतानं पाकिस्तानात येऊन खेळावं, भारत-पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका व्हाव्यात यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ सातत्यानं हातपाय मारत असतं. आयसीसीलाही भारत-पाकिस्तान सामन्यातून मोठी कमाई होते. भारत-पाकिस्तान या उभय देशांमध्ये आतापर्यंत एकूण १५ टेस्ट मालिका झाल्या असून दोन्ही देशांतील शेवटची मालिका २००७-०८ साली भारतात खेळवण्यात आली होती.
तर दोन्ही देशांमध्ये एकूण १७ वन डे मालिका झाल्या असून शेवटची मालिका २०१२-१३ साली भारतातच झाली होती. याशिवाय अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये ९ जून २०२४ रोजी आणि त्याआधी भारतात झालेल्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपमध्ये १४ ऑक्टोबर २०२३ रोजी भारत-पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांना भिडले होते.
तब्बल एक दशक उलटून गेलं, तरी दोन्ही देशांमध्ये एकही द्विपक्षीय मालिका रंगलेली नाही, त्यामुळं क्रिकेटशौकीनही दर ४ वर्षातून एकदा येणारा वन डे वर्ल्ड कप, दर दोन वर्षांनी रंगणारा टी-२० वर्ल्ड कप आणि आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेनं वाट बघत असतात. आयसीसीकडून दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना जाणीवपूर्वक एकाच गटात टाकण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून दोन्ही संघात एक तरी सामना होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत सांगायचं झाल्यास तब्बल ८ वर्षांनी आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात येत आहे.
आयसीसीला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणार्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतरची ही सर्वांत मानाची आणि मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. १९९८ साली या स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेचं आधीचं नाव आयसीसी नॉक आऊट टुर्नामेंट असं होतं. २००२ पासून ही स्पर्धा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी नावानं आयोजित करण्यात येऊ लागली. आतापर्यंत एकूण ८ वेळा ही स्पर्धा आयसीसीनं आयोजित केली आहे. २०१३ साली ही स्पर्धा बंद करून त्याऐवजी टेस्ट चॅम्पियनशिप खेळविण्याचा आयसीसीचा विचार होता, परंतु ऐनवेळी हा बेत रद्द करत आयसीसीनं चॅम्पियन्स ट्रॉफीच खेळवली.
२०१३ साली इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला पराभूत करत ही ट्रॉफी जिंकली होती, तर २०१७ मध्ये पाकिस्ताननं अंतिम सामन्यात भारताला लोळवत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली होती. आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात भारत पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत झाला होता. आतापर्यंत इंग्लंडनं या स्पर्धेचं तीनदा यजमानपद भूषवलं आहे, तर बांगलादेश, केनिया आणि श्रीलंकेला प्रत्येकी एकदा ही संधी मिळाली आहे.
२००९ साली पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार होती, परंतु त्याआधी श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच क्रिकेट संघांनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळं, ही स्पर्धा पाकिस्तानऐवजी सुरक्षेच्या कारणास्तव २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळविण्यात आली. पाकिस्तानसाठी ही मोठीच नामुश्कीची बाब होती. त्यावेळी आयसीसीनं पाकिस्तानला नुकसानभरपाई म्हणून काही रक्कमही दिली होती.
आयसीसी २००९चा फॉर्म्युलाच यावेळीही वापरू शकेल, असं मानलं जात आहे. त्यातच बीसीसीआयचे सचिव जय शहा येत्या १ डिसेंबर रोजी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. भारत हा जागतिक क्रिकेटमधील प्रबळ आर्थिक ताकद असल्यानं भारताविना स्पर्धा खेळवणं निव्वळ अशक्यप्राय गोष्ट असल्याची जाणीव पाकिस्तानलाही आहे. त्यामुळं हायब्रीड पद्धतीनं स्पर्धेचं आयोजन करायचं की संपूर्ण स्पर्धाच हातातून गमवायची या पेचात अडकलेल्या पाकिस्तानला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र बीसीसीआयनं टाकलेली ही गुगली खेळली काय किंवा न खेळली काय पाकिस्तानची विकेट पक्कीच आहे.